योग वासिष्ठ : संस्कृत भाषेतील विख्यात असा एक तत्त्वज्ञानपर पुराणग्रंथ. वसिष्ठांनी रामाला केलेला योगाचा उपदेश या ग्रंथात अंतर्भूत असल्यामुळे त्याला योगवासिष्ठ असे नाव प्राप्त झाले आहे. रामायणकार वाल्मीकींनीच या ग्रंथाची रचना केली, अशी परंपरागत समजूत असल्यामुळे या ग्रंथाला उत्तररामायण असेही म्हणतात परंतु या समजुतीला प्रत्यक्ष वाल्मीकी रामायणात आधार मात्र नाही. आर्य रामायण, वासिष्ठ महारामायण, मोक्षोपायसंहिता इ. नावांनीही हा ग्रंथ ओळखला जातो. त्याला बृहद्योगवासिष्ठ असेही म्हणतात. कारण त्याची श्लोकसंख्या ३२ हजार इतकी प्रचंड असल्यामुळे इ. स. नवव्या शतकात काश्मीरच्या गौड अभिनंद या पंडिताने लघुयोगवासिष्ठ या नावाने सहा हजार श्लोकांत केलेला त्याचा संक्षेपही प्रसिद्ध आहे. प्रत्यक्षात मूळ ग्रंथाच्या निर्णयसागर प्रतीमध्ये बत्तीस हजार श्लोक आढळत नसून २९,२८९ इतकेच श्लोक आढळतात. या ग्रंथाचा योगवासिष्ठसार या नावाचा केवळ २२५ श्लोकांचाही एक संक्षेप आढळतो.

योगवासिष्ठाचा रचनाकाल इ. स. च्या पाचव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत असल्याचे दर्शविणारी भिन्नभिन्न मते विद्वानांनी मांडली आहेत. या ग्रंथाची सध्याच्या स्वरूपातील रचना विशिष्ट अशा एकाच काळात झालेली नसून, काळाच्या ओघात त्याच्या मूल स्वरूपामध्ये बदल होत होत त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले असावे आणि त्यामुळे त्याच्या रचनाकालाविषयीच्या या विविध मतांत अंशतः तथ्य असावे, असे काही विद्वानांना वाटते. डॉ. माईणकरांनी याविषयी विशेष संशोधन करून या ग्रंथाच्या विकासाच्या पुढीलप्रमाणे तीन अवस्था दर्शविल्या आहेत : वसिष्ठांचा आज उपलब्ध नसलेला वसिष्ठकल्प नावाचा अद्वैतपर ग्रंथ, ही आजच्या योगवासिष्ठाची पहिली अवस्था असावी. मोक्षोपाय (मोक्षाचे साधन) ही या ग्रंथाची दुसरी अवस्था असून त्यावेळी त्यात बौद्ध मताचा अंतर्भाव होऊन त्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. वासिष्ठरामायण वा बृहद्योगवासिष्ठ ही एखाद्या ज्ञानकोशासारखी सर्वसंग्राहक अशी या ग्रंथाची तिसरी बृहद अवस्था होय. पहिली अवस्था सूत्रकालातील, मानता येईल, दुसरी अवस्था इ. स. तिसऱ्या-चौथ्या वा सातव्या शतकातील व तिसरी अवस्था बाराव्या शतकाच्या प्रारंभीची असावी. या ग्रंथाची निर्मिती बंगालमध्ये झाली असे एक मत आढळत असले, तरी ती काश्मीरमध्ये झाली हे मतच अधिक मान्य झालेले आहे.

हा ग्रंथ रामायणकार वाल्मीकींनी रचल्याच्या परंपरागत समजुतीला ‘तो गीतोत्तर काळातील आहे’ असे म्हणून लो. टिळकांनी विरोध केला आहे. भाषा, आशय इ. दृष्टींनी विचार करता हा रामायणकारांचा ग्रंथ नव्हे, असेच इतर अभ्यासकांनाही वाटते. वाल्मीकी नावाच्या दुसऱ्याच कोणा कवीने तो लिहिला असावा, असेही एक मत आढळते. ब्रह्मानंद नावाच्या कोण्या एका पंडिताच्या शिष्याने तो लिहिला असण्याची शक्यता डॉ. माईणकरांनी मांडली आहे.

वैराग्य, मुमुक्षू, उत्पत्ती, स्थिती, उपशम व निर्वाण (पूर्वार्ध व उत्तरार्ध) अशा सहा प्रकरणांत हा ग्रंथ विभागलेला आहे. स्वतः ग्रंथकाराने ग्रंथाचा उल्लेख इतिहास म्हणून केलेला असला, तरी आत्मज्ञान हाच त्याचा प्रमुख विषय आहे. उपनिषदांतील अद्वैतवाद आणि महायान बौद्धांचा विज्ञानवाद या दोहोंचा या ग्रथात समन्वय आढळतो. तसेच त्यात ज्ञानकर्मसमुच्चयावरही भर दिलेला आहे. तो तत्त्वज्ञानपर असला तरी त्याची मांडणी शास्त्रीय स्वरूपाची नसून एखाद्या काव्यग्रंथासारखी आहे. शिवाय, त्याचे स्वरूप सर्वसंग्राहक असल्यामुळे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील विविध मतांचा आणि तत्त्वज्ञानबाह्य इतर अनेक विषयांचाही त्यामध्ये अंतर्भाव आढळतो.

भगवद्‌गीतेप्रमाणेच हा ग्रंथ विविध मतांच्या समन्वयाची भूमिका घेणारा आहे. गीतेइतके त्याला यश मिळालेले नसले, तरी त्याचा भारतीय जनमानसावर मोठा प्रभाव पडला आहे. विशेषतः तत्त्वज्ञानासारखा अवघड विषय काव्याच्या स्वरूपात मांडून रंजक बनविल्यामुळे तो लोकप्रिय झाला आहे. उपमा, दृष्टांत, प्रसाद वगैरे गुण, आख्याने इत्यादींमुळे त्याची सरसता वाढली आहे.

भारतीय व परदेशी भाषांतून या ग्रंथाची व त्याच्या काही अंशांची भाषांतरे, रूपांतरे इ. झाली आहेत. मराठीत या ग्रंथावर अनेक टीका झाल्या असून ज्ञानेश्वरांच्या नावावरील योगवासिष्ठाचा अपवाद वगळता, इतर बहुतेक टीका योगवासिष्ठसार या संक्षेपाच्या आधारे लिहिण्यात आल्या आहेत. ज्ञानेश्वरांच्या नावावरील योगवासिष्ठ त्यांनीच लिहिले की नाही, याविषयी मतभेद आहेत. वामन पंडित, रंगनाथ मोगरे, साधु माधवदास, चिन्मयदत्त, शिवराम पूर्णानंद, हरिदास शांतानंद, हरिदास आचरेकर, आत्माराम, हंसराज, भट्टज शिवराम, माधवस्वामी इत्यादींचे योगवासिष्ठावरील मराठी ग्रंथ असून त्यांपैकी काही अजून हस्तलिखित स्वरूपात आहेत. चिपळूणकर आणि मंडळीने १९३५ साली त्याचे मराठी भाषांतर प्रकाशित केले असून त्याची इतरही काही मराठी भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.

संदर्भ : 1. Atreya. B. L. The Philosophy of the Yogavasisshtha, Adyar, 1936.

2. Mainkar, T. G. The Vasishtha-Ramayana, A Study, Sangli, 1955.

३. तुळपुळे, शं. गो. माधवस्वामी-कृत योगवासिष्ठ, भाग १, पुणे, १९५८.

४. परांजपे, य. वि. योगवासिष्ठ आणि संतवाङ, पुणे, १९५५.

५. पावगीशास्त्री, रघुनाथ भास्कर, योगवासिष्ठातील तत्त्वज्ञान, सुरस गोष्टी सुभाषिते, पुणे, १९५१.

साळुंखे, आ. ह.