एर्लांगर, जोसेफ : (५ जानेवारी १८७४—६ डिसेंबर १९६५). अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिक व संशोधक. १९४४ च्या वैद्यक व शरीरक्रियाविज्ञानाच्या (सजीव आपल्या क्रिया व कार्ये कशा पार पाडतात याच्या अभ्यासाच्या) नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाला. कॅलिफोर्निया विद्यापीठाची बी. एस. ही पदवी १८९५ साली त्यांनी मिळविली. १८९९ मध्ये जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाची एम. डी. ही पदवी मिळविल्यानंतर ते १९०६ पर्यंत त्याच विद्यापीठात साहाय्यक व नंतर प्राध्यापक होते. १९०६ मध्ये विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या वैद्यक विद्यालयात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुढे १९१० पासून सेंट लूइस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करून १९४६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

तंत्रिका तंत्रातून (मज्जासंस्थेतून) संवेदनावहन कसे होते ते पहाण्यासाठी एर्लांगर यांनी ऋण किरण दोलनदर्शकाचा [ऋण किरण नलिकेच्या साहाय्याने दोलन गती दृश्य स्वरूपात दाखविणाऱ्या उपकरणाचा, → इलेक्ट्रॉनीय मापन] प्रथम उपयोग केला. त्यांच्या संशोधनापूर्वी तंत्रिका-संवेदना विद्युत् प्रवाहाच्या योगाने एका तंत्रिका तंतूमधून दुसऱ्या तंतूत प्रविष्ट होते असे मानीत. काही लोकांच्या मते संवेदना काही रासायनिक विक्रियेमुळे प्रवाहित होते. एर्लांगर व हर्बर्ट गॅसर यांनी या दोन्ही मतांचा समन्वय साधला. रक्तपरिवहनाचा व रक्तदाबाचा वृक्कस्त्रावावर (मूत्रपिंडाच्या स्त्रावावर) काय परिणाम होतो त्याबद्दलही एर्लांगर यांनी संशोधन केले.

तंत्रिका तंतूंमधून संवेदनावहन कसे होते यासंबंधीच्या संशोधनाबद्दल एर्लांगर यांना गॅसर यांच्याबरोबर १९४४ चे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. १९२२ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ते सेंट लूइस येथे मृत्यू पावले.

ढमढेरे, वा. रा.