स्तन : पृष्ठवंशी ( पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांमधील एका वर्गात नवजात अर्भकाला मातेकडून पोषण मिळण्यासाठी स्तन ही ग्रंथी विकसित झालेली आहे. स्तनी किंवा सस्तन प्राणी या नावाने ओळखल्या जाणार्‍या या वर्गात व्हेल ( देवमासा ) व डॉल्फिन हे जलचर, वटवाघूळ हा पंखधारी वृक्षनिवासी, घोडा व गायबैलांसारखे सर्व खूर असणारे शाकाहारी, उंदरा-सारखे कृंतक ( कुरतडणारे ), वाघ-सिंहासारखे मांसाहारी शिकारी प्राणी आणि नरवानर गणातील मानवासह सर्व फलाहारी किंवा मिश्र आहारी प्राणी अशा विविध सजीवांचा समावेश होतो. ⇨ काटेरी मुंगीखाऊ आणि बदकाच्या चोचीसारखे तोंड असणारा ⇨ प्लॅटिपस यांसारखे अपवादात्मक सस्तन प्राणी सोडल्यास इतर सर्व सस्तन प्राण्यांच्या भ्रूणांची वाढ मातेच्या गर्भाशयात होत असते. मातेकडून अपरेद्वारे ( वारेमधून ) या भ्रूणांचे पोषण होत असते. गर्भाशयातून बाहेर आलेल्या अर्भकास काही काळ हे पोषण देण्याचे कार्य स्तनाद्वारे चालू राहते.

  मानवी स्त्री स्तनाची बाह्य व अंतर्गत रचना : (१) स्तनाग्र, (२) स्तनाग्र--परिवलय, (३) लसीका ग्रंथी, (४) महावक्ष स्नायू, (५) बरगड्या, (६) वक्षःस्थळ भित्ती, (७) वसा-ऊतके, (८) दुग्धग्रंथी, (९) दुग्धवाहिन्या. नवजात अर्भकाची पचन संस्था ( दात, जठर, आंत्र इ. अवयव ) आणि चयापचयी यंत्रणा यांची पुरेशी वाढ होऊन स्वतंत्रपणे अन्नग्रहण करून ते पचविण्याची क्षमता निर्माण होईपर्यंत स्तनातील दुधावर असे प्राणी अवलंबून असतात. पोषक द्रव्यांबरोबर काही रोगप्रतिकारक घटकही प्रतिपिंडांच्या रूपात मातेकडून अर्भकास मिळत असतात. मानवी अर्भकात ही प्रक्रिया — स्तनपानाद्वारे — सु. ६ महिने चालू राहते. या काळात मातेच्या आहारातील पोषक घटक, औषधी द्रव्ये, घातक पदार्थ इत्यादींचे अंतरण ( किंवा स्रवणे ) तिच्या दुधात होत असल्यामुळे अर्भकावर त्याचे बरे-वाईट परिणाम होणे सहज शक्य असते. यांखेरीज मातेमधील जंतुसंक्रामण दुधावाटे बालकाकडे जाऊ शकते (  उदा., एचआयव्ही ) परंतु अशा संक्रामणजन्य विकारांची शक्यता फार कमी असते.

  सस्तन प्राण्यांमधील स्तनांची संख्या आणि त्यांची छाती किंवा पोटा-वरील जागा यांत काहीशी विविधता आढळते. मानवी स्तन मात्र दोनच असून छातीच्या पिंजर्‍यावरील वरच्या भागात असलेल्या महावक्ष स्नायूच्या पातळीवरील त्वचेखालील अधस्त्वचीय ऊतकात (समान रचना व कार्य असणार्‍या कोशिकांच्या समूहात ) ते आढळतात. पुरुषांमध्ये आणि लहान मुलींमध्ये त्यांची जागा चौथ्या किंवा पाचव्या बरगडीच्या पातळीवर दिसणारी स्तनागे्र आणि त्याच्या भोवतालचे स्तनाग्र-परिवलय ( बोंडी ) यांच्यामुळे सहज लक्षात येऊ शकते. बाल्यावस्था संपून मुलगी यौवनावस्थेत पदार्पण करते तेव्हा पोष ( पिट्युटरी ) ग्रंथींमधून निर्माण होणार्‍या उत्तेजक हॉर्मोनांच्या प्रभावामुळे अंडकोशांची वाढ होऊ लागते. अंडकोशांमध्ये निर्माण होणार्‍या ⇨ स्त्रीमदजन ( इस्ट्रोजेन ) हॉर्मोनाचा परिणाम सर्व शरीरभर दिसू लागतो. त्यात स्तनाग्र, त्याचे परिवलय आणि त्वचेखालील स्तनाचे ऊतक ( दुधाच्या ग्रंथी, वाहिन्या आणि त्यांच्या आसपासची वसा-ऊतके ) यांची वाढ प्रामुख्याने प्रथम लक्षात येते. स्तनाग्रकलिका दिसू लागल्यावर सु. दोन वर्षांनी रजोप्राप्ती (रजःस्रावाचा प्रारंभ ) होते.

प्रौढावस्थेत पूर्ण वाढ झालेल्या स्तनात १५ — २० स्वतंत्र खंडांमध्ये दुग्धग्रंथी विभागलेल्या आढळतात. त्यांच्यातील दूध दुग्धवाहिन्यांमध्ये येऊन अशा सर्व वाहिन्यांची मुखे स्तनाग्रात उघडावीत अशी रचना विकसित झालेली असते. सर्व ग्रंथी आणि दुग्धवाहिन्या वसा-ऊतकात लपेटलेल्या असतात. छातीच्या स्नायूंवरील संयोजी ऊतकांमध्ये जाऊन मिळणारे हे बंध स्तनाच्या ऊतकांना आधार देतात. स्तनाच्या पृष्ठभागावरील त्वचे-पेक्षा स्तनाग्र-परिवलयाची त्वचा अधिक गडद असते तिच्या खालच्या थरांमध्ये घामाच्या आणि स्निग्ध स्रावाच्या ( त्वक् स्नेहाच्या ) ग्रंथी आणि केसांची मुळे ( केशपुटके ) आढळतात. स्तनाचा आकार, आकारमान आणि बाह्य स्वरूप यांमध्ये विविधता आढळते. त्याचप्रमाणे वय, ऋतुचक्र, गर्भिणी अवस्था, प्रसवोत्तर काल, रजोनिवृत्ती इत्यादींमुळे त्यात बराच फरक पडतो.

  गर्भधारणा झाल्यानंतर अंडकोशातील नवीन विकसित झालेला पीत-पिंड आणि गर्भाच्या पोषणासाठी निर्माण झालेली वार ( अपरा ) यांमध्ये निर्माण होत असलेले प्रगर्भरक्षी ( प्रोजेस्टेरॉन ) हॉर्मोन स्तनातील दुग्धग्रंथींना दुधाच्या निर्मितीसाठी तयार करते. या काळात स्तनांचा आकार वाढून त्वचा ताणली जाते. दुग्धग्रंथींच्या वाढीमुळे अस्वस्थता व काहीशा वेदनाही होतात. स्तनाग्राचा आकार वाढतो व परिवलयाचा रंग अधिक गडद होतो. अखेरच्या काही दिवसांत पोष ग्रंथींमधून स्रवणार्‍या प्रोलॅक्टिन या हॉर्मोना-मुळे काहीसा पातळ असा स्राव स्तनाग्रातून बाहेर येतो. हे हॉर्मोन दुधाच्या  निर्मितीस प्रारंभ करून प्रसूतीनंतर त्यास उत्तेजना देत राहते. अपत्य जन्माच्या वेळी पोष ग्रंथीमधून ऑक्सिटोसीन हे हॉर्मोनही स्रवू लागते. गर्भाशयाच्या आकुंचनास प्रवृत्त करून प्रसूतीच्या क्रियेस प्रारंभ करणारे हे हॉर्मोन स्तनांतील दुग्धवाहिन्यांवरही क्रिया करते. त्याच्या प्रभावामुळे या वाहिन्यांचे आकुंचन होऊन स्तनाग्रातून प्रथम जलयुक्त स्राव, नंतर पिवळसर घट्ट चीक आणि प्रसूतीनंतर १-२ दिवसांनी दूध बाहेर येऊ लागते. माता अर्भकास अंगावर पाजते त्यावेळी स्तनाग्र चोखण्याच्या क्रियेमुळे प्रतिक्षेपी क्रिया घडून ऑक्सिटोसिनाचे स्रवणे व त्यामुळे दूध बाहेर येणे अशा घटना होत राहतात. त्यामुळे स्तन मोकळे होऊन स्तनपानास साहाय्य होते. यास पान्हा फुटणे असे म्हणतात. दुधाच्या निर्मितीस उत्तेजित करणारे प्रोलॅक्टिन हे हॉर्मोनही दुग्धकालात ( प्रसूतीनंतर सहा महिने ते एक वर्ष ) पोष ग्रंथीकडून सतत पुरविले जात असते.

  स्तनपान नियमितपणे देणार्‍या मातेमध्ये पोष ग्रंथीतील ऑक्सिटोसीन व प्रोलॅक्टिन यांच्या स्रावाला प्रेरणा मिळत असताना त्याच ग्रंथीतून निर्माण होणारी आणि मासिक ऋतुचक्र निर्माण करणारी हॉर्मोने मात्र दबलीजातात. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ( एफएसएच ) आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन ( एलएच ) या दोन्ही हॉर्मोनांचे अशा रीतीने दमन झाल्यामुळे अंड-कोशातील अंड परिपक्व होण्याची आणि अंडमोचनाची शक्यता कमी होते. परिणामत: गर्भाशयाचा आतील पटल वाढणे, प्रगर्भरक्षी हॉर्मोनामुळे त्यात गर्भाच्या रोपणास अनुकूल असे बदल होणे व नंतर ऋतुस्राव होणे किंवा गर्भ राहणे इ. सर्व प्रक्रिया टळतात. अशा प्रकारे स्तनपानामुळे अप्रत्यक्ष रीत्या गर्भनिरोधक परिणाम घडून येतो परंतु ही शक्यता खात्रीलायक नसते. प्रसूतीनंतर सहा महिन्यांचे आत बाळाला निव्वळ स्तनपान चालू असेल आणि पाळी अजिबात आली नसेल तर दिवस राहण्याची शक्यता केवळ २% एवढीच असते. अनियमित अथवा कमी वेळा अर्भकाला पाजणार्‍या मातेमध्ये काही महिन्यांतच ऋतुचक्र पुन्हा सुरू होते. स्तन-पानामुळे स्तनांतील दुग्धग्रंथी व वाहिन्यांमध्ये झालेले बदल सर्वच मातां-मध्ये हळूहळू संपतात. त्यानंतर स्तनांचा आकार कमी होऊन, टिकून राहिलेली वाढ मुख्यत: वसा-ऊतकामुळेच झालेली असते. ऋतुनिवृत्तीनंतर स्तनांमधील दुग्धग्रंथी, वसा-ऊतक, परिवलय व स्तनाग्र या सर्वांची वाढ थांबून आकारमान कमी होऊ लागते. ऋतुचक्रामध्ये आढळणारी लक्षणे ( वेदना, स्पर्श-असह्यता, जडपणा इ.) त्यानंतर जाणवत नाहीत.

दुग्धस्रवण व स्तनपान यासंबंधीची सविस्तर माहिती मराठी विश्व-कोशा तील ‘ दुग्धस्रवण व स्तनपान ’ या स्वतंत्र नोंदीत दिली आहे.  

विकार : स्तनांमध्ये वेदना होणे, स्तनाग्रातून द्रव पदार्थ स्रवणे, गाठींचे अस्तित्व जाणवणे किंवा स्तनपानात अडचण येणे यांसारख्या लक्षणांमुळे काही तरी विकार असल्याची — विशेषतः कर्करोगाची  शंका आणि भीती स्त्रियांना वाटत असते. त्यामुळे वैद्यकीय तपासणी आणि चाचण्या घेऊन तिचे निरसन करणे आवश्यक असते. कर्करोगाखेरीज इतर प्रकारची अर्बुदे ( गाठी ), संक्रामणजन्य किंवा जंतुरहित विद्रधी अथवा हॉर्मोनांच्या कार्यप्रणालीमधील दोष यांमुळे अशी लक्षणे निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. 

  मासिक पाळीच्या आधी काही दिवस जाणवणारी अस्वस्थता, ताण आणि स्तनातील वेदना वा स्पर्श-असह्यता ही हॉर्मोनजन्य लक्षणे असतात. त्यांच्यासाठी वेदनाशामक औषधे, मनःस्थिती शांत करणारी शामके यांसारख्या लक्षणानुवर्ती उपायांचा अवलंब केला जातो. अधिक तीव्र लक्षणे किंवा दीर्घकाळ वेदना असल्यास हॉर्मोनांचा प्रभाव रोखणारी औषधे वापरता येतात. गर्भिणी अवस्थेतील अनेक लक्षणे तात्पुरती असतात. प्रसूतीनंतर ती आपोआप कमी होतात. प्रसूतीनंतरच्या काळात दुधाचा पूर्ण निचरा न झाल्यास ते साठून गाठी होऊ शकतात किंवा जंतुसंसर्ग होऊन स्तनशोथ ( दाहयुक्त सूज ) होतो. अशा प्रसंगी पंपाच्या साहाय्याने दुधाचा वरचेवर निचरा करणे, प्रतिजैविकांनी संक्रामणाचे निर्मूलन करणे आणि आवश्यक वाटल्यास मोठा छेद घेऊन विद्रधीमधील पू काढून टाकणे हे उपाय परिणामकारक ठरतात. अर्भकाचे स्तनपान तात्पुरते थांबविले जाते. तसेच दूध साठण्यामागील कारणांचा शोधही आवश्यक असतो उदा., अर्भकामधील दोष, स्तनाग्रावर भेगा पडणे किंवा इजा होणे, मातेच्या आहारातील उग्र पदार्थामुळे अर्भकास दूध न आवडणे इत्यादी.

स्तनातील कर्कविहीन गाठींमध्ये पोकळ द्रवयुक्त अशा पुटी ( द्रवार्बुदे) आणि तंतुमय व ग्रंथिल अशा दोन्ही प्रकारच्या ऊतकांचा समावेश असलेली ग्रंथितंत्वार्बुदे यांचा समावेश होतो. कधीकधी दोन्ही प्रकारची अर्बुदे एकाच वेळी उपस्थित असतात. सुईने द्रव काढणे या उपायांनी लक्षणे कमी होतात. अधिक उपद्रव न देणार्‍या गाठींकडे दुर्लक्ष करता येते. दुग्धवाहिन्यांमध्ये वाढणार्‍या लहान अर्बुदांमुळे ( अंकुरार्बुदांमुळे ) रक्तासारखे लालसर पाणी स्तनाग्रातून पाझरते. छोट्याशा शस्त्रक्रियेने अशी अर्बुदे काढून टाकता येतात. सर्व प्रकारच्या गाठींवरील उपचारात काढलेल्या द्रवाचे किंवा अर्बुदाचे सूक्ष्मदर्शकीय परीक्षण करणे आवश्यक असते. 


स्तनात आढळणार्‍या सु. ९०% गाठी कर्करोगाच्या नसतात. उर्वरित १०% गाठींमध्ये कर्काची शक्यता असते. एखाद्या स्त्रीमध्ये असे कर्कार्बुद निर्माण होण्याची संभाव्यता ठरवताना अनेक धोकादायक घटकाचा सहभाग लक्षात घेतला जातो. उदाहरणार्थ ६० वर्षांपेक्षा अधिक वय, मातेला अशाच प्रकारचा विकार असण्याचा इतिहास, शरीराची पुष्टता ( स्थूलता ), वयाच्या बाराव्या वर्षाआधी ऋतुदर्शन किंवा ५० — ५५ वर्षांनंतर ऋतुनिवृत्ती, तिसाव्या वर्षानंतर पहिले मातृत्व किंवा मातृत्वापासून पूर्णपणे वंचित असणे, संततिप्रतिबंधासाठी किंवा ऋतुनिवृत्तीच्या लक्षणांसाठी १० वर्षांपेक्षा अधिक काळ स्त्रीमदजन हॉर्मोन ( इस्ट्रोजेनयुक्त ) गोळ्या घेणे, एकदा कर्क-रोगाची  गाठ उद्भवून तिच्यावर उपचार केलेला असणे इत्यादी. या घटकां-पैकी कोणत्याही एका घटकास कर्करोगाचे कारण असे निर्विवादपणे म्हणता  येणार नाही. स्तनकर्काचे जनुक असे नाव दिलेला आनुवंशिकता घटक कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांमध्ये आढळलेला असून त्याचेही महत्त्व लक्षात घेणे इष्ट ठरते.

स्तनातील कोणत्याही प्रकारच्या ऊतकामध्ये कर्काची निर्मिती होऊ शकते. परंतु सर्वाधिक प्रमाण — जवळजवळ ९० प्रतिशत  —  दुग्धवाहिन्यांमध्ये प्रारंभ होणार्‍या कर्काचे आहे. हा कर्क ऋतुनिवृत्तीच्या आधी किंवा नंतर उद्भवू शकतो तसेच एखाद्या विशिष्ट भागापुरता मर्यादित असतो आणि फारसा आक्रमक नसल्याने काढून टाकण्यास सुलभ असतो. याउलट दुधाच्या ग्रंथींमध्ये सुरू होणारा कर्क ऋतुनिवृत्तीच्या आधीच एखाद्या नियमित तपासणी दरम्यान लक्षात येतो. आसपासच्या ऊतकांवर किंवा दुसर्‍या स्तनात आक्रमण करण्याकडे त्याची प्रवृत्ती असते आणि लवकर लक्षात न आल्यास तो काढणे अधिक गुंतागुंतीचे असते. कर्कविकार कोणत्याही प्रकारचा असला, तरी कधीकधी तो पूर्णपणे लक्षणहीन ( प्रारंभी ) असल्याने त्यासाठी विशेष जागरूकता आवश्यक असते. स्तनात वाढणारी आणि छातीच्या पिंजर्‍याला घट्ट चिकटल्यामुळे सहज न हलणारी कठीण अशी गाठ नेहमीच शंकास्पद ठरते. स्तनाच्या आकारात जाणवणारा फरक, सूक्ष्म खळगे पडलेली त्वचा, सूज, व्रण, स्तनाग्राभोवतालची त्वचा कठीण असणे, स्तनाग्राचा आकार बदलणे, ते आत ओढले जाणे, त्यातून द्रव पाझरणे, वेदना यांसारखी कोणतीही लक्षणे स्तनकर्कात आढळू शकतात.

  निदाननिश्चितीसाठी सौम्य क्ष-किरण वापरून केलेले स्तनचित्रण, स्तनाच्या आसपासच्या क्षेत्रातील — विशेषत: काखेमधील — लसीका ग्रंथींची वाढ झालेली आहे का याचे निरीक्षण, द्रवयुक्त अर्बुदाची शक्यता पाहण्या-साठी श्राव्यातीत ध्वनिकी चित्रण आणि स्तनातील द्रवाचा किंवा ऊतकाचा नमुना घेऊन त्याची ऊतक परीक्षा हे मार्ग उपयोगी ठरतात. कर्काची निश्चिती झाल्यावर त्याची आक्रमकता पडताळण्यासाठी आसपासचे क्षेत्र, दुसरा स्तन आणि दूरस्थ इंद्रिये ( उदा., मेंदू , अस्थी, फुप्फुसे ) यांमध्ये काही चिन्हे आहेत का, याचा शोध घेतला जातो. त्यानंतर शस्त्रक्रियेने कर्कार्बुद काढण्याबद्दल निर्णय घेतला जातो. विकाराच्या व्याप्तीनुसार केवळ गाठ काढून टाकणे किंवा त्याबरोबर आसपासच्या लसीका ग्रंथी काढणे, स्तनातील इतर ऊतक अंशत: किंवा पूर्णत: काढणे यांसारखी सुयोग्य शस्त्रक्रिया केली जाते. स्तनांच्या वाढीवर प्रभाव करीत असल्यामुळे उत्तेजित करणार्‍या स्त्रीमदजन हॉर्मोनाची क्रिया रोखणारी रोधक औषधेही आता उपलब्ध आहेत. यांशिवाय इतर प्रकारांच्या कर्करोगांप्रमाणेच कर्करोधक औषधे, किरणो-त्सारी चिकित्सा आणि लक्षणानुवर्ती उपचार यांचा अवलंब केला जातो. तरुण अथवा मध्यमवयीन स्त्रियांमध्ये स्तनाचा फार मोठा भाग अथवा संपूर्ण स्तन काढून टाकणे, आवश्यक असल्यास स्तनाची पुनर्रचना करण्याची  शस्त्रक्रिया करता येते. सिलिकॉन अथवा अन्य पदार्थापासून तयार केलेल्या सुयोग्य आकाराच्या व मापाच्या कोशाचे आरोपण अशा शस्त्रक्रियेने केले जाते. रुग्णाच्या शरीराच्या अन्य भागांतून काढलेल्या ऊतकाचाही अशा आरोपणात उपयोग करता येतो.

पुरुषांच्या स्तनाचा कर्करोग क्वचित आढळतो. स्त्रियांच्या १% इतकीच वारंवारता असल्यामुळे त्याची संभाव्यता दुर्लक्षित राहून कधीकधी तो निदानाच्या वेळेस प्रगत अवस्थेत आढळतो. लक्षणे, निदान आणि उपचार फारसे निराळे नसतात. टेस्टोस्टेरॉनासारख्या पुरुषविशिष्ट हॉर्मोनाची क्रिया रोधणारी औषधे अथवा वृषणावरील शस्त्रक्रिया यांचाही समावेश अशा उपचारात होऊ शकतो. वृद्धावस्थेत किंवा यकृताच्या विकारांवर पुरुषाच्या  स्तनाची ( कर्कविरहित ) वाढ अनेकदा आढळते. शरीरातील स्त्री-पुरुष विशिष्ट हॉर्मोनांच्या प्रमाणांतील संतुलन बदलल्यामुळे ही वाढ उद्भवते. यकृतावरील उपचारांखेरीज अन्य उपचारांची आवश्यकता नसते. वाढ फारच त्रासदायक ठरल्यास शस्त्रक्रियेने काही भाग काढून टाकता येतो.

स्तन आणि लैंगिक क्रिया : जीवशास्त्रीय दृष्ट्या स्तनांचे मुख्य कार्य अर्भकाचे पोषण हे असले तरीही मानवामध्ये स्तन (विशेषत: स्त्रीचे) आणि लैंगिक उद्दीपन यांचा अन्योन्य संबंध आहे. कामोद्दीपनाच्या अवस्थेमध्ये स्तनांमधील रक्तप्रवाह वाढतो, ते पुष्ट होतात आणि स्तनाग्रे तरारून ताठर होतात. कामपूर्तीनंतर काही मिनिटांत हे बदल दिसेनासे होऊन स्तन पूर्ववत होतात.

मोठे आणि गोलाईदार स्तन हे पुरुषांच्या दृष्टीने कामोद्दीपक असले तरीही स्त्रियांच्या कामप्रेरणा, कामोद्दीपन, कामपूर्ती वगैरे भावना स्तनांच्या आकाराशी निगडित नाहीत असे लक्षात आले आहे.

 पहा : कर्करोग पोष ग्रंथि प्रसवोत्तर परिचर्या भ्रूणविज्ञान.

 संदर्भ : 1. Berkow, R. Ed., Merck Manual of Medical Information, 1997. 

            2. Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, 1996. 

            3. Peters, M. BM Association A-Z Family Medical Encyclopedia, 2004. 

            4. Thibodeau, G. A. Patton, T. Anthony’s Textbook of Anatomy and Physiology, 1994.

            5. Warwick, R. Williams, P. Eds., Gray’s Anatomy, 1986.                             

श्रोत्री, दि. शं. अभ्यंकर, शंतनू