ली बो : (इ.स. ७०५-७६२). श्रेष्ठ चिनी कवी. जन्म सेचवान येथे. स्वैरपणे आयुष्य जगणारा हा कवी देशात ठिकठिकाणी भटकला. त्याला त्याच्यासारखेच पाच मद्यासक्त कवी भेटले आणि ते पर्वतमय प्रदेशात राहू लागले. तेथे त्यांनी भरपूर मद्यपान केले, तसेच विपुल कविता लिहिल्या. पुढे सम्राट थांगच्या दरबारी ली बो ह्याला कवी म्हणून आश्रय मिळाला. सम्राटाची त्याच्यावर फार मोठी मर्जी होती. परंतु पुढे सम्राटाची त्याच्यावर नामर्जी झाली आणि त्याला राजवाडा सोडून जावे लागले. पुढे एका जलप्रवासाच्या प्रसंगी, मद्याच्या धुंदीत असताना त्याने पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब मिठीत घेण्याचा प्रयत्नल केला आणि त्यात तो बुडून मरण पावला.

यूरोपीय स्वच्छंदतावादी कवींचा समानधर्मी म्हणून त्याच्याकडे पश्चिमी साहित्यविश्वाचे लक्ष वेधले गेले. जे हाताळताना अधिकात अधिक स्वातंत्र्य मिळेल, असेच काव्यघाट त्याने आपल्या रचनांसाठी निवडले. प्रगल्भ विचारांपेक्षा मुक्त कल्पनाशक्ती आणि उत्कट भावना त्याने आपल्या कवितांत ओतली. सामाजिक किंवा ऐतिहासिक विषयांपेक्षा आत्मपरतेत रमणाऱ्या कविता त्याने अधिक समर्थपणे लिहिल्या. त्याच्या कवितेतील प्रतिमासृष्टीही संपन्न आहे.

कुलकर्णी, अ. र.