गायबगळा: पक्षी वर्गातल्या आर्डीइडी कुलातला हा पक्षी असून ह्याचे शास्त्रीय नाव बुबुल्कस आयबिस  आहे. यूरोप आणि आशियातील उष्ण प्रदेश आणि संबंध आफ्रिकेत हा आढळतो. भारत, श्रीलंका आणि ब्रह्मदेशात आढळणारा गायबगळा ही या पक्ष्याची एक प्रजाती असून हिचे शास्त्रीय नाव बुबुल्कस आयबिस कॉरोमँडस  आहे.

गायबगळा

हा पक्षी साधारणपणे कोंबडीएवढा असून त्याची लांबी ५१ सेंमी. असते. शरीर सडपातळ व पांढऱ्या शुभ्र रंगाचे असते. मान व पाय लांब असतात पायांचा रंग काळा असतो चोच लांब आणि पिवळी असते डोळे सोनेरी पिवळ्या रंगाचे असतात. विणीच्या हंगामात डोक्यावर आणि मानेवर नाजूक, केसांसारखी सोनेरी पिवळ्या रंगाची पिसे उगवतात. पाठीवरही याच रंगाची पिसे उगवतात पण ती मोठी व लांब असतात. नंतर ही सगळी पिसे गळून पडतात. नर व मादी दिसायला सारखी असतात. या पक्ष्यांचे नेहमीच थवे असतात.

कुरणात किंवा शेतात चरणाऱ्या गुरांच्याबरोबर या पक्ष्यांची लहान मोठी टोळकी नेहमी असतात. चरणाऱ्या गुरांच्या पावलांनी आणि तोंडांनी गवत चाळविले जाऊन त्यातले किडे हालचाल करू लागल्याबरोबर हे पक्षी ते टिपतात. पुष्कळदा हे गुरांच्या पाठीवर बसून त्यांच्या अंगावरील गोमाश्या, गोचिडी वगैरे खातात. नाकतोडे, टोळ, माश्या आणि विविध प्रकारचे किडे हे ह्यांचे मुख्य भक्ष्य होय. पण हे सरडे, बेडूक वगैरेही खातात.

रात्री झोप घेण्याकरिता काही ठराविक झाडांवरच ते संध्याकाळी जमतात. या झाडांवर बहुधा कावळे, साळुंक्या आणि इतर पक्ष्यांची त्यांना सोबत असते.

यांच्या विणीचा हंगाम पावसाळ्यावर अवलंबून असतो. उत्तर भारतात तो जूनपासून ऑगस्टपर्यंत आणि दक्षिण भारतात व श्रीलंकेमध्ये नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत असतो. ज्या झाडांवर पाणकावळे, मिल्हे आणि इतर बगळे यांची घरटी असतात त्याच झाडांवर हे आपली घरटी बांधतात. घरटे झाडावर उंच ठिकाणी असून कावळ्याच्या घरट्यासारखे असते. मादी दर खेपेला चार ते पाच अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा असून त्यात निळ्या किंवा हिरव्या रंगाची छटा असते.

कर्वे, ज. नी.