कापूर कचरा : (कापूरकाचरी, कापूरकचरी, काचरी हिं. सिघौल, चंद्रमूळ गु. कपूरकाचरी क. कच्चूरा सं. चंद्रमूलिका, सुगंधकचोर लॅ. कॅंफेरिया गॅलंगा कुल-झिंजिबरेसी). ही लहान, सुंदर ओषधी [→ ओषधि] मलायात व भारतात सर्वत्र आढळते व बागेत शोभेकरिताही लावतात. मूलक्षोडापासून (जमिनीतील खोडापासून) जमिनीवर दोन किंवा तीन गोलसर व पातळ पाने येतात आणि जमिनीवर सपाट पसरून वाढतात. फुले पांढरी, सुगंधी, ६-१२, लहान फुले सरळ दांड्यावर जून-जुलैत येतात. फुलांच्या ओष्ठांवर जांभळट ठिपके असतात. इतर शारीरिक लक्षणे भुई चाफा [→ चाफा, भुई] आणि ⇨सिटॅमिनी  गणातील झिंजिबरेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. मूलक्षोडास कापरासारखा वास व कडू चव असते, त्यात बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते व ते सुगंधी द्रव्यांत आणि सौंदर्यप्रसाधनांत वापरतात तांबूलातून पाने व खोडाचे तुकडे खातात. खोड उत्तेजक, कफोत्सारक, मूत्रल (लघवी साफ करणारे) आणि वायुनाशी असून खोकल्यावर त्याचे चूर्ण मधातून देतात. डोळे येणे, घसा धरणे, सूज, संधिवात, ज्वर इत्यादींकरिता पानांचे धावन व पोटीस उपयुक्त असते. कीटकांपासून कपड्यांचे संरक्षण करण्याकरिता खोडाचे तुकडे वापरतात.

जमदाडे, ज. वि.

कापूरकचरा ह्या वनस्पतीच्या कुलात अंतर्भूत असणाऱ्या दुसऱ्या एका वंशातील जातीला (हेडीशियम स्पायकॅटा) कापूरकाचरी (कपूरकाचरी सं. गंधशटी हिं. कापूरकचरी) हे नाव असून ती पश्चिम आणि मध्य हिमालयात १,०५०- २,२५० मी. उंचीवर आढळते ती ⇨सोनटक्क्याप्रमाणे दिसते व तिची पांढरी फुले टोकास कणिशावर गर्दीने येतात. मूलक्षोड फार सुगंधी व कडू असते बाजारात कापूरकाचरी नावाने तिच्या काचऱ्या मिळतात. अबीर (बुक्का) बनविण्यात तिचा उपयोग करतात तंबाखूला सुवास येण्यास खोडाचे चूर्ण वापरतात खोडातील सुवासिक तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्ये व सौंदर्यप्रसाधने यांत करतात पानांच्या चटया बनवितात. खोडाचे चूर्ण किंवा काढा उत्तेजक, वायुनाशी, दीपक (भूक वाढविणारा) व पौष्टिक असतो. मासे पकडण्यास लागणाऱ्या सुगंधी चूर्णात व पशुवैद्यकात खोडाचा वापर करतात. मांस व डाळ शिजताना या वनस्पतीची सुकी फळे घातल्यास ते पदार्थ लवकर नरम होण्यास मदत होते. मालागिरी नावाचे सुगंधी कापड बनविताना मेंदीबरोबर खोडाचे चूर्ण वापरतात.

परांडेकर, शं. आ.