पॅरा-अमिनो बेंझॉइक अम्‍ल

पॅरा-अमिनो  बेंझॉइक अम्‍ल : एक कार्बनी अम्‍ल. रासायनिक सूत्र C6 H4 NH2 COOH.      ‘पाबा’  (PABA) या नावानेही ते ओळखले जाते. त्याची रेणवीय संरचना पुढीलप्रमाणे असते. ते ⇨ फॉलिक अम्‍ल या जीवनसत्त्वाचा एक घटक आहे. तथापि काही वेळा त्याला ब गटातील जीवनसत्त्वांपैकी एक जीवनसत्त्व असेही म्हटले जाते पण त्याच्या जीवनसत्त्वविषयक गुणधर्मांबद्दल अद्यापि निर्णय झालेला नाही. हे अम्‍ल निसर्गात बऱ्यांच अन्नपदार्थांत आढळते. यीस्टमध्ये ते जास्त प्रमाणात आढळते. प्रथमत: यकृत, यीस्ट आणि ब जीवनसत्त्वयुक्त पदार्थांतून ते वेगळे करण्यात आले. १८६३ मध्ये जी. फिशर यांनी ते प्रथमच संश्लेषित केले (कृत्रिम रीत्या तयार केले). मात्र ते ब जीवनसत्त्वांपैकी एक असल्याचा दावा १९४० पासून करण्यात येत आहे. प्रॉन्टोसील या सल्फा औषधाचा रोगजंतूंचा संहार करण्याचा गुणधर्म, यीस्टचा अर्क दिल्यास त्यात असलेल्या पाबामुळे नाहीसा होतो, हे डी. डी. वुड्स व पी. फील्डझ या शास्त्रज्ञांनी १९४० मध्ये दाखविले. कारण पाबा हे सूक्ष्मजंतूच्या वाढीला आवश्यक असते आणि प्रॉन्टोसील दिल्यानंतर त्याचे शरीरात सल्फानिलमाइड बनते सल्फानिलमाइड व पाबा यांच्या रासायनिक संरचनेत साम्य असल्याने व सल्फानिलमाइड जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यास सूक्ष्मजंतू पाबाऐवजी तेच ग्रहण करतात. त्यामुळे सूक्ष्मजंतूंची शारीरिक क्रिया नीट चालत नाही व ते मरतात. पाबा जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यास सूक्ष्मजंतू पाबाच ग्रहण करतात व त्यांची वाढ चालू राहते. या घटनेमुळे सल्फा औषधांच्या जंतुनाशक क्रियापद्धतीचे ज्ञान झाले. १९४१ मध्ये त्या वेळी ज्ञात असलेली ब जीवनसत्त्वे दिली, तरी उंदराचे दुग्धस्रवण बंद पडते व ते यीस्ट दिल्यास परत चालू होते असे आढळून आले. तसेच पाबाच्या अभावी उंदरांचे काळे केस पांढरे झाले व पाबा दिल्यास परत काळे झाले पण मानवामध्ये पाबाच्या वरील गोष्टींबाबातच्या कार्यांबद्दल नक्की निर्णय झालेला नाही.

ह्या अम्‍लाचे फिक्कट पिवळ्या रंगाचे गंधहीन स्फटिक असतात. शुद्ध स्थितीत त्यांचा रंग पांढरा असून प्रकाश व हवा यांच्याशी संपर्क आल्यास ते रंगहीन होतात. वितळबिंदू १८६–१८७से. थंड पाणी व विरल (प्रमाण कमी असलेल्या) हायड्रोक्लोरिक अम्‍ल यांत अल्प प्रमाणात, त्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात ईथर, बेंझीन, क्लोरोफॉर्म यांमध्ये, तर गरम पाणी, एथिल ॲसिटेट, ग्‍लेशियल ॲसिटिक अम्‍ल, गरम ग्‍लिसरॉल यांमध्ये पाबा विरघळते. क्षारीय (अल्कली) हायड्रोक्साइडे व कार्बोनेटे यांत सहज विरघळते, तर खनिज तेलातून मिळणाऱ्या ईथरात विरघळत नाही. फेरिक लवणे आणि ऑक्सिडीकारक [⟶ ऑक्सिडीभवन] यांच्याशी संपर्क आल्यास त्याचे अपघटन होते (लहान लहान रेणूंत तुकडे होतात).

पॅरा-अमिनोनायट्रोबेंझॉइक अम्‍लाच्या ⇨ क्षपणाने त्याचे उत्पादन केले जाते. व्यापारी दृष्ट्या ते कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम यांच्या लवणांच्या स्वरूपांत उपलब्ध आहे.

पाबाचा उपयोग पोषणासाठी व रंजकासाठी होते. तसेच ब्युटेसीन, प्रोकेन हायड्रोक्लोराइड, ॲनास्थेसीन इ. औषधांच्या निर्मितीसाठी ते वापरतात. मुडदूस प्रतिबंधक औषध व प्रलापक सन्निपात ज्वरात(टायफस ज्वरात) औषध म्हणूनही त्याचा उपयोग करतात.

गाळकर, ना. तु.