बाष्पीकरण : अनेक उद्योगधंद्यात वापरली जाणारी एक क्रिया. या क्रियेमध्ये विद्रावातील (पदार्थ विरघळून बनलेल्या मिश्रणातील) विद्रावक (पदार्थ ज्यात विरघळतो तो द्रव) बाष्परूपाने वेगळा काढला जातो. हीच क्रिया जेव्हा नैसर्गिक कारणांनी घडून येते तेव्हा तिचा उल्लेख ‘बाष्पीभवन’ असा करतात उदा., सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ आपोआप बनण्याची क्रिया [⟶ जलविज्ञान ].

औद्योगिक व तांत्रिक क्षेत्रांतील कित्येक प्रक्रियांत बाष्पनशील (तापविल्याने सहज वाफ होणाऱ्या) विद्रावकात पदार्थ विरघळून बनलेल्या विद्रावातील विद्रावकाचे प्रमाण कमी करून ते संहत (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण जास्त असलेले) करणे आवश्यक असते. अशा ठिकाणी बाष्पीकरण क्रिया वापरली जाते. सामान्यतः हा विद्रावक पाणी असतो. बाष्पीकरण व ⇨ऊर्ध्वपातन या क्रियांमध्ये फरक आहे. ऊर्ध्वपातनात ऊर्ध्वपातनपात्रातून अनेक पदार्थांच्या बाष्पांचे मिश्रण बाहेर पडते व त्यापासून ते ते पदार्थ वेगळे करणे हा उद्देश असतो. बाष्पीकरणात बाष्प एकाच पदार्थाचे आणि सामान्यतः पाण्याचे असते आणि त्यापासून तो पदार्थ किंवा पाणी परत मिळविणे हा हेतू सामान्यतः नसतो. ⇨शुष्कीकरण या क्रियेत विद्रावक पूर्णपणे किंवा बहुतांश काढून टाकून कोरडा पदार्थ मिळविणे हे उद्दिष्ट असते. बाष्पीकरणात मूळच्या विद्रावापेक्षा जास्त संहत विद्राव मिळवावयाचा असतो.

सूर्याच्या उष्णतेच्या उपयोगाने समुद्राच्या पाण्यापासून मिठाचा जास्त संहत विद्राव बनविला जातो. नंतर त्यापासून मीठ तयार करतात. पाण्यात विरघळणारा एक काळा रंग समुद्राच्या पाण्यात मिसळून बाष्पीकरण जास्त कार्यक्षमतेने घडविता येते, असे अलीकडे दिसून आले आहे. कारण काळ्या रंगामुळे उष्णतेचे परावर्तन होण्याचे टळून ती वाया जात नाही. या पद्धतीने बनविलेले मीठ काळे असले, तरी अनेक रासायनिक उद्योगधंद्यात चालू शकते.

 प्रकार व उपकरणे : क्षरणकारी (संपर्कात येणारा पदार्थ रासायनिक विक्रियेने झिजविणाऱ्या) पदार्थांच्या विद्रावांचे, त्याचप्रमाणे ज्यांचे बाष्पीकरण करताना बाष्पनपात्रात घन पदार्थाची पुटे बसण्याचा संभव आहे, अशा विद्रावांचे बाष्पीकरण निमज्जित ज्वलन पद्धतीने करतात. या पद्धतीत विद्रावात बुडविलेल्या ज्वालकांच्या योगाने ज्वलनशील वायू किंवा तेल यांच्या ज्योती जळत ठेवलेल्या असतात. इंधनापासून मिळणाऱ्या उष्णतेचा बराच मोठा अंश या पद्धतीत बाष्पीकरणासाठी वापरला जातो. तथापि येथे बाहेर पडणारी विद्रावकाची वाफ ही ज्वलनशील वायू किंवा तेल यांच्या ज्वलनाने निर्माण झालेल्या द्रव्यांनी दूषित झालेली असते व त्यामुळे तीच पुन्हा बाष्पीकरणासाठी वापरता येत नाही. (याच नोंदीतील ‘गुणित परिणाम बाष्पनपात्र पद्धत’ या उपशीर्षकाखालील मजकूर पहावा).

 वरील प्रकार विशेष स्वरूपाच्या बाष्पीकरणाचे होत. बहुसंख्य बाष्पीकरणांसाठी विद्राव तापविण्याच्या कमी-अधिक कार्यक्षम योजना असलेली विविध बाष्पनपात्रे वापरली जातात.

लहान प्रमाणावर गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेत रसाचे बाष्पीकरण करण्यासाठी काहिलीसारखी पसरट पात्रे वापरतात व रस ढवळत ठेवतात. उसाचे चिपाड किंवा लाकूड वापरून चुलाण्याच्या योगाने उष्णता पुरविली जाते. या साध्या योजनेत इंधन स्वस्त असले, तरी उष्णतेचा पुष्कळ अंश वाया जातो. त्यामुळे ही पद्धत सर्वत्र वापरण्यासारखी नाही.

उष्णता मिळण्यासाठी वाफेचा उपयोग करणे जास्त सोयीचे असते. बहुतेक सर्व विद्रवांत पाणी हाच विद्रावक असतो. शुद्ध पाण्याचा उकळबिंदू समुद्रसपाटीस १००° से. आहे. जलीय विद्रवांचे उकळबिंदू यापेक्षा जास्त असतात म्हणून ते उकळण्याइतके तापावे यासाठी दाबाखाली असलेली वाफ वापरणे श्रेयस्कर असते. वाफ थंड विद्रावाच्या सान्निध्यात आली म्हणजे (द्रवीभवनाने) वाफेचे पाणी होते व त्या वेळी जी सुप्त (वाफेचे द्रव अवस्थेत रूपांतर होताना बाहेर पडते ती विद्राव तापविण्यास उपयोगी पडते. या उष्णतेचा उपयोग शक्य तितक्या जास्ती विद्रवाचे बाष्पीकरण करण्यासाठी व्हावा या हेतूने शास्त्रीय तत्त्वांनुसार योजना केलेली अनेक बाष्पनपात्रे प्रचलित आहेत. त्यांपैकी काहींचे वर्णन येथे केले आहे.

 वाफेचे आवरण असलेले साधे बाष्पनपात्र : (आ. १). विद्राव थोडा असेल, तर सोयीस्कर पडणारा हा एक बाष्पनपात्राचा प्रकार आहे. या बाष्पनपात्राचा आतील भाग काहिलीच्या आकाराचा असून तो ओतीव लोखंड वा आवश्यक तेथे अगंज (स्टेनलेस) पोलाद, तांबे, ॲल्युमिनियम इ. धातूंचा बनविलेला असतो. याच्या बाहेरच्या बाजूस धातूच्या पत्र्याचे पोकळ आवरण असते. काहील व आवरण यांमधील पोकळीतून वाफ खेळविण्याची व्यवस्था असते. संहत विद्राव काढून घेण्यासाठी काहिलीच्या तळाशी झडप ठेवलेली असते. काहिलीत विद्राव भरून आवरणाच्या पोकळीत वाफ सोडली म्हणजे संघननाने तिचे पाणी होऊ लागते व सुप्त उष्णता बाहेर पडून विद्राव तापू लागतो. वाफेपासून झालेले पाणी बाहेर काढून टाकण्याची योजना केलेली असते. विद्राव पुरेसा संहत झाला म्हणजे वाफेचा प्रवाह बंद करतात आणि काहिलीच्या तळातील झडप उघडून विद्राव काढून घेतात. या बाष्पनपात्रात विद्रावाला उष्णतेचा पुरवठा करणाऱ्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ विद्रावाच्या मानाने फार कमी पडते व त्यामुळे विद्राव विपुल असेल, तर बाष्पीकरणास वेळ जास्त लागतो व वाफ बरीच खर्ची पडते.


आ. १. बाष्पावरणयुक्त साधे बाष्पनपात्र : (१) काहील, (२) बाह्य आवरण, (३) वाफेसाठी पोकळी, (४) वाफ पोकळीत सोडण्याचे द्वार, (५) वाफेचे संघनन होऊन झालेले पाणी बाहेर काढण्याचे द्वार, (६) संहत विद्राव बाहेर काढून घेण्यासाठी नळी.

आडव्या नळ्यांचे बाष्पनपात्र : (आ. २). या बाष्पनपात्राचा आकार उभ्या दंडगोलासारखा असून तळ व माथा बशीसारख्या झाकणांचे बनविलेले असतात. दंडगोल पात्राच्या खालच्या भागाला आवरण असून त्यातून वाफ आत घेण्याकरिता व वाफ संघनित होऊन झालेले पाणी बाहेर सोडण्यासाठी मार्ग ठेवलेले असतात. बाष्पनपात्रात बसविलेल्या आडव्या नळ्यांमधून वाफ पार जाते. नळ्यांच्या वरच्या बाजूस बाष्पीकरण करावयाचा विद्राव आत घेण्यासाठी द्वार असते. तेथून तो आत आल्यावर त्याचा संपर्क वाफेने तापलेल्या नळ्यांशी येतो व उष्णतेने त्यातील पाण्याची वाफ होऊन ती बाष्पनपात्रातून बाहेर जाते. त्यामुळे विद्राव संहत होतो व तो बाष्पनपात्राच्या तळातील झडपेद्वारे काढून घेता येतो ही बाष्पनपात्रे स्वस्त असतात. शिवाय नळ्या जुन्या झाल्यावर त्या काढून त्यांच्या जागी नव्या बसविता येतात. तथापि जास्त श्यानता (दाटपणा) असलेल्या विद्रावांसाठी हे उपयोगी पडत नाही व नळ्यांवर घन पदार्थाचा थर बनण्याचा संभव असतो, हे या बाष्पनपात्राचे दोष आहेत.

आ. २. आडव्या नळ्यांचे बाष्पनपात्र : (१) विद्राव आत घेण्याचे द्वार, (२) वाफ आत घेण्याचे द्वार, (३) नळ्यांतून वाफ नेण्यासाठी आवरण, (४) नळ्या, (५) संहत विद्राव काढून घेण्यासाठी द्वार, (६) वाफ संघनित होऊन पाणी बाहेर जाण्यासाठी नळी, (७) विद्रावाचे बाष्प बाहेर जाण्यासाठी द्वार, (८) बाष्पीकरणाचे निरीक्षण करण्यासाठी खिडक्या.

उभ्या नळ्यांचे बाष्पनपात्र : (आ. ३). या बाष्पनपात्राचा आकार व रचना साधारणपणे आडव्या नळ्यांच्या बाष्पनपात्रासारखीच असते परंतु येथे विद्राव उभ्या नळ्यांमधून जातो आणि त्यांच्या सभोवार असलेल्या जागेतून वाफ खेळविलेली असते. अशी बाष्पनपात्रे बरीच कार्यक्षम असून १ किग्रॅ. पाण्याच्या वाफेच्या योगाने सु. ०.८ किग्रॅ. पाण्याचे बाष्पीकरण घडवून आणता येते.

आ. ३. उभ्या नळ्यांचे बाष्पनपात्र : (१) विद्राव आत घेण्याचे द्वार, (२) उभ्या नळ्या, (३) वाफ बाष्पकोठीत घेण्याचे द्वार, (४) वाफ संघनित होऊन पाणी बाहेर सोडण्याची नळी, (५) संहत विद्राव बाहेर काढण्याची नळी, (६) बाष्पकोठीतील हवा बाहेर घालविण्यासाठी मार्ग, (७) बाष्प बाहेर जाण्याचे द्वार.

या बाष्पनपात्राच्या काही प्रकारांत तळभाग नरसाळ्यासारखा निमूळता असतो. नळ्यांचे व्यास व उंची यांमध्येही फरक असतात.

 गुणित परिणाम बाष्पनपात्र पद्धत : (आ. ४). उभ्या नळ्यांची बाष्पनपात्रे स्वतंत्रपणे एकएकटी वापरण्याऐवजी एकापुढे एक अशा तीन (अथवा अधिक) बाष्पनपात्रांची मालिका केली आणि पहिल्या बाष्पनपात्रातील विद्रावापासून निघणारी वाफ दुसऱ्या बाष्पनपात्रातील विद्राव तापविण्यासाठी व

आ. ४. गुणित परिणाम बाष्पनपात्र पद्धत : (१, २ व ३) मालिकेतील बाष्पनपात्रे, (४) निर्वात पंपाकडे, (५) बाष्पनपात्र क्र. १ च्या बाष्पकोठीत वाफ सोडण्याचा मार्ग, (६) बाष्पकोठीत जमलेले पाणी बाहेर काढण्याची झडप, (७) बाष्पनपात्र क्र. २ च्या बाष्पकोठीत वाफ सोडण्याचा मार्ग, (८) बाष्पनपात्र क्र. ३ च्या बाष्पकोठीत वाफ सोडण्याचा मार्ग, (९) बाष्पनपात्र क्र. १ मध्ये विद्राव आत घेण्यासाठी झडप, (१०) बाष्पनपात्र क्र. २ मध्ये विद्राव आत घेण्यासाठी झडप, (११) बाष्पनपात्र क्र. ३ मध्ये विद्राव आत घेण्यासाठी झडप, (१२) संहत विद्राव पंपाने बाहेर काढण्यासाठी झडप, (१३) बाष्पनपात्र क्र. २ च्या बाष्पकोठीत जमलेले पाणी बाहेर जाण्यासाठी झडप, (१४) बाष्पनपात्र क्र. ३ च्या बाष्पकोठीत वाफ जमलेले पाणी बाहेर जाण्यासाठी झडप, (१५) संघनकात पाणी घेण्याचा मार्ग, (१६) संघनक.


दुसऱ्यातील विद्रावापासून निघणारी वाफ तिसऱ्यातील विद्राव तापविण्यासाठी वापरता येईल अशी योजना केली आणि निर्वात पंप वापरले, तर वाफेची बरीच काटकसर होते. या पद्धतीला गुणित परिणाम बाष्पनपात्र पद्धत म्हणतात. तिचे कार्य पुढील वर्णनावरून लक्षात येईल. बाष्पनपात्रांची जोडणी आ. ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे केलेली असते.

प्रारंभी तिन्ही बाष्पनपात्रे संहत करावयाच्या विद्रावाने तितकी भरतात, सर्व झडपा बंद करतात आणि निर्वात पंपाने बाष्पनपात्रे निर्वात करतात. त्यानंतर बाष्पनपात्र क्र. १ च्या बाष्पकोठीत वाफ सोडण्याची झडप व बाष्पकोठीतील वाफेचे पाणी काढून टाकण्याची झडप उघडतात. बाष्पनपात्रांतील विद्राव थंड असल्यामुळे तो गरम करताना वाफेचे जे पाणी होईल ते झडप उघडून काढून टाकतात. लवकरच विद्राव तापू लागतो व अखेरीस उकळतो. त्यामुळे जी वाफ निर्माण होते ती बाष्पनपात्र क्र. २ च्या बाष्पकोठीत शिरते व त्यातील विद्राव तापतो. हा विद्राव उकळू लागला म्हणजे त्यापासून बनलेली वाफ बाष्पनपात्र क्र. २ च्या बाष्पकोठीत जाते व त्यातील विद्राव उकळेपर्यंत तापतो. अशा प्रकारे तिन्ही बाष्पनपात्रांतील विद्राव उकळू लागल्यावर थोड्याच वेळात समतोल निर्माण होतो. बाष्पनपात्र क्र. १ मधील विद्रावाची पातळी खाली जाऊ लागली म्हणजे झडप (९) उघडून जास्त विद्राव बाष्पनपात्र क्र. १ मध्ये घेतात व त्यातील विद्राव-पातळी पूर्ववत करतात. त्याचप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे बाष्पनपात्र क्र. १ मधील विद्राव झडप (१०) उघडून बाष्पनपात्र क्र. २ मध्ये आणि बाष्पनपात्र क्र. २ मधील विद्राव झडप (११) उघडून बाष्पनपात्र क्र. ३ मध्ये घेऊन पातळ्या पूर्ववत करून घेतात. बाष्पनपात्र क्र. ३ मधील विद्राव सर्वांत जास्त संहत होतो. त्याची संहती हवी तेवढी झाली म्हणजे संहत विद्राव पंपाच्या साहाय्याने काढून घेता येतो.

 सर्व जुळवाजुळव योग्य प्रकारे झाली म्हणजे पहिल्या बाष्पनपात्रातील विद्राव दुसऱ्यात व दुसऱ्यातील तिसऱ्यात येणे आणि ठराविक संहती झाली की, ते विद्राव बाहेर पडणे या क्रिया सतत होत राहतात.

 अशा योजनेने १ किग्रॅ. पाण्याची वाफ वापरून सु. १.५ किग्रॅ. पाण्याचे बाष्पीकरण घडवून आणता येते. या प्रकारे अधिक बाष्पनपात्रांची मालिका वापरली, तर १ किग्रॅ. पाण्याच्या वाफेने ३ किंवा अधिक किग्रॅ. पाण्याचेही बाष्पीकरण घडवून आणता येते.

 या पद्धतीत निर्वात पंप वापरावा लागतो हे खरे पण त्यासाठी होणारा खर्च बचत झालेल्या वाफेच्या किंमतीपेक्षा कमी पडतो. त्यामुळे ही पद्धत फार कार्यक्षम ठरते.

 उपयोग : उसाच्या रसापासून साखर बनविण्याच्या कारखान्यात रसाचे संहतीकरण करण्यासाठी, कागद उद्योगामध्ये वापरलेली रसायने परत मिळविण्याकरिता, दुधाचे तसेच फळांच्या रसांचे संहतीकरण करण्यासाठी आणि अनेक उद्योगधंद्यात वाया जाणाऱ्या पाण्यापासून पुनः वापरता येईल असे पाणी मिळविण्याकरिता बाष्पीकरण क्रिया उपयोगी पडते. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या कुवेतसारख्या देशांत गुणित परिणाम बाष्पनपात्र पद्धतीचा उपयोग करून समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी बनवितात. अणुऊर्जा स्वस्त झाली म्हणजे तिचा उपयोग करून इतरत्रही ही पद्धत वापरणे फायदेशीर होऊ शकेल.

 संदर्भ :   1. Badger. W. L. Banchero J. T. Introduction to Chemical Engineering, New York, 1955.             2. McCabe, W. L. Smith J. C. Unit Operations of Chemical Engineering, 1956.             3. Perry, J. H., Ed., Chemical Engineer’s Handbook, Tokyo. 1950.

कुंटे, मा. वा. दीक्षित, व. चिं. केळकर, गो. रा.