बांगडा : स्काँब्रिडी मत्स्यकुलातील खाऱ्या पाण्यातील एक खाद्योपयोगी मासा. याचे शास्त्रीय नाव रास्ट्रेलिजर कानागुर्टा असे आहे. एफ्. डे यांनी याचा समावेश स्काँबर वंशात केला असून त्याचे नाव स्काँवर मायक्रोलेपिडोट्स असे ठेवले आहे. भारतात हीच जाती आढळत असून मराठीत याला बांगडा, बांगडई किंवा तेल-बांगडा म्हणतात.

ताबंड्या समुद्रात इराणच्या आखातापासून भारताच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्‍याजवळ आणि तेथून उत्तरेकडे दक्षिण चीनपर्यंत व पूर्वेकडे मलाया द्वीपसमूहापर्यंत हा सापडतो.

बांगडा"बांगड्याचे डोके मोठे, निमुळते डोळे मोठे खालचा जबडा वरच्या पेक्षा किंचित पुढे आलेला तोंडाची फट खोल आणि खालच्या व वरच्या जबड्यांवर बारीक बारीक दात असतात. शरीर लांबट, निमुळते असते. विशेषतः दोन्ही बाजूंकडून शेपटीकडे ते सारखेच निमुळते होते जाते. पाठीवरील परातील पहिला काटा मोठा असून बाकीचे अनुक्रमे शेपटीकडे लहान होत जातात. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) दोन टोकदार पालींमध्ये (भागांमध्ये) विभागलेला असतो. गुदपक्ष (ढुंगणाजवळील पर) शरीराच्या खालील बाजूवर अशाच पद्धतीने विभागला गेलेला असतो. अंसपक्ष (छातीवरचा पर) जवळजवळ डोक्याच्या निम्म्यापर्यंत लांब असतो. शरीराचा रंग हिरवट काळा. दोन्ही बाजूंच्या निळसर जांभळ्या रंगाला धातूसारखी चमक असते. पृष्ठपक्ष पिवळट असून त्याचे टोक काळे असते. पुच्छपक्ष चकचकीत पिवळा असून त्याच्या कडा काळ्या असतात. गुदपक्षावर काळे ठिपके असतात परंतु हे सर्व रंग मासा मेल्यानंतर लवकरच फिकट होतात आणि माशाचा रंग फिकट हिरवा व पोटाचा पांढरट होतो. यांचा विणीचा हंगाम एप्रिल-सप्टेंबर असा असतो व साधारणतः १ वर्षानंतर माशाची पूर्ण वाढ झालेली असते.

बांगड्याची लांबी सु. २०–२५ सेंमी. असते. जास्तीतजास्त लांबी ३१ सेंमी. आढळते. भारतात मुख्यत्वे पश्चिम किनारपट्टीवर बांगडे जास्त पकडले जातात. साधारणपणे तेथे पावसाळ्याचे चार महिने बाकी सोडून सर्व वर्षभर हे मासे पकडले जातात. साधारणतः दोन वर्षे वयाचे मासे पकडतात. या वेळेपर्यंत बांगड्याची पूर्ण वाढ झालेली असते आणि तो अतिशय रुचकर लागतो. बांगडा ताजा, सुकवून किंवा खारवून सुकवून खातात. ताजा बांगडा चवीला चांगला लागत असल्यामुळे त्याला सर्वांत जास्त मागणी आहे. ताजे बांगडे बर्फात घालून दूरवरच्या बाजारात पाठविले जातात. भारतातून बांगडे मुख्यत्वे श्रीलंकेला निर्यात केले जातात.

बांगड्यातील घटकद्रव्यांत सरासरी २०% प्रथिन असते. अकार्बनी द्रव्यात कॅल्शियम, फॉस्फरस व लोह असतात. मेदाचा अंश अत्यंत कमी किंवा मुळीच नसल्यामुळे हा मासा पचायला अतिशय हलका असतो.

सुकवलेल्या बांगड्यापासून बनविलेले खत नारळ, कॉफी, चहा, रबर इ. पिकांसाठी वापरतात. तसेच कोंबड्यांच्या खाद्यात आणि पशुखाद्यात देखील बांगड्याच्या पुडीचा उपयोग करतात.

जोशी, लीना