चेरेनकॉव्ह, पाव्ह्येल अल्यिक्स्येयेव्ह्यिच: (२८ जुलै १९०४ —   ). रशियन भौतिकीविज्ञ. १९५८ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म नॉव्हाया चीग्ल येथे झाला. १९२८ मध्ये व्हॉरोनेश विद्यापीठातून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी व्हॅव्हिलोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. १९३० मध्ये पी. एन्. ल्येब्येड्येव्ह इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स या रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या संस्थेत संशोधन अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९४० मध्ये त्यांना गणितीय व भौतिकी शास्त्रांतील डॉक्टर ही पदवी मिळाली. प्रायोगिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर १९५३ साली त्यांची नेमणूक झाली व १९५९ सालापासून ते प्रकाशीय मेसॉन या मूलकणाच्या प्रक्रियांसंबंधी संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेत कार्य करीत आहेत. इलेक्ट्रॉन वेगवर्धकांची बांधणी व प्रकाशीय-अणुकेंद्रीय प्रक्रिया यांविषयीही त्यांनी संशोधनकार्य केले आहे.

किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थापासून मिळणाऱ्या किरणांचा पाण्यावर भडिमार केला असता पाण्यामधून मंद निळसर प्रकाश बाहेर पडतो, असे १९३४ मध्ये त्यांना आढळून आले. या परिणामास नंतर ‘चेरेनकॉव्ह परिणाम’ असे नाव देण्यात आले.  इल्या फ्रांक  व ईगॉऱ्य टाम  या रशियन शास्त्रज्ञांनी १९३७ मध्ये या परिणामाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण दिले व त्याचे महत्त्व प्रस्थापित केले. हे संशोधन अणुकेंद्रीय भौतिकी आणि विश्वकिरण (बाह्य अवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण) यांच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण ठरले आहे. या संशोधनाच्या आधारे चेरेनकॉव्ह यांनी तयार केलेल्या उपकरणाच्या द्वारे उच्च वेग असलेल्या कणांचे अस्तित्व ओळखता येते व त्यांचा वेगही मोजता येतो [→कण अभिज्ञातक]. यामुळे अणुविज्ञानातील संशोधनात या उपकरणाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या उपकरणाचा कृत्रिम उपग्रहांतही उपयोग करण्यात आलेला आहे. या संशोधनाकरिता चेरेनकॉव्ह यांना फ्रांक व टाम यांच्या बरोबर १९४६ मध्ये व १९५१ मध्ये स्टालिन पारितोषिकाचा व १९५८ मध्ये नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला. चेरेनकॉव्ह हे सोव्हिएट ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचे सदस्य आहेत.

भदे, व. ग.