मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकरहातकणंगलेकर, मधुकर दत्तात्रेय : (१ फेब्रुवारी १९२७ –२५ जानेवारी २०१५). ज्येष्ठ मराठी समीक्षक. जन्म हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे. विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथून इंग्रजी विषयात एम्.ए. (१९५०). इंग्रजी वाङ्मयाचे निष्णात प्राध्यापक. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात धारवाड येथील कृषी म हा वि द्या-लयात इंग्रजीचे अध्यापन (१९५२–५६) नंतर विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे इंग्रजीचे प्राध्यापक आणि पुढे प्राचार्य (१९७४–७९). त्यांनी लेखनाला महाविद्यालयीन काळातच प्रारंभ केला. प्रामुख्याने समीक्षा, ललित लेखन, अनुवाद व संपादने असे विविध स्वरूपाचे वाङ्मयीन कार्य त्यांनी केले. साहित्यातील अधोरेखिते (१९८०), मराठी कथा : रूप आणि परिसर (१९८६), साहित्यविवेक (१९९७) व भाषणे आणि परीक्षणे (२००३) ही त्यांची महत्त्वपूर्ण साहित्यसमीक्षापर पुस्तके होत. पाश्चात्त्य वाङ्मय व समीक्षा यांच्या चौफेर व्यासंगातून त्यांची समीक्षा डोळस, संयत व व्यापक झाली आहे. त्यांनी सौंदर्यशास्त्रीय तसेच तात्त्विक, सैद्धांतिक स्वरूपाचे काही समीक्षालेखन केले असले, तरी त्यांची ख्याती मुख्यत्वे स्वागतशील वृत्तीचे आस्वादक समीक्षक म्हणून आहे. आस्वादक समीक्षेचा मानदंड त्यांनी मराठीत निर्माण केला. समकालीन साहित्यातील नवनवे प्रवाह, नव्या पिढीतील गुणवान प्रतिभावंत लेखक व त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्यकृती यांविषयी त्यांनी आत्मीयतेने व गुणग्राहक वृत्तीने सातत्याने लिहिले आहे. त्यांची समीक्षा जशी स्वागतशील व आस्वादक आहे, तशीच ती सूक्ष्म, सखोल चिकित्सक व विश्लेषणात्मक स्वरूपाची आणि साक्षेपी व समतोल वृत्तीची निदर्शकही आहे. कथा हा वाङ्मय-प्रकार आणि विशेषतः जी. ए. कुलकर्णी यांची कथा यांविषयी त्यांनी लिहिलेली समीक्षा अतिशय मार्मिक व मौलिक स्वरूपाची आहे. विविध साहित्यप्रवाहांचे सूक्ष्म भान, मर्मग्राही समीक्षावृत्ती आणि व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोण ही त्यांच्या समीक्षेची मुख्य वैशिष्ट्ये होत. साहित्यविवेक हा त्यांच्या निवडक पंचवीस समीक्षालेखांचा संग्रह असून त्यात त्यांनी बा. सी. मर्ढेकर, प्रभाकर पाध्ये, रा. भा. पाटणकर, शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या सौंदर्यविचारांचा व सिद्धांतांचा साक्षेपी, चिकित्सक परामर्ष घेतला आहे. त्यांचे ललित लेखन प्रामुख्याने व्यक्तिचित्रणपर आहे. त्यांनी काही प्रभावी व्यक्तिचित्रे रेखाटली असून त्यांतून त्यांचे मानवी स्वभावाच्या विविधछटांचे सूक्ष्म मार्मिक निरीक्षण व मानवी जीवनाची प्रगल्भ जाण व्यक्त होते. त्यांच्या उघडझाप (२००५) या आत्मकथनपर पुस्तकात त्यांचे नातलग व स्नेहीजन यांची हृद्य व्यक्तिचित्रे आहेत. साहित्यसोबती (१९९७) व आठवणीतली माणसं (२००५) हे त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही महत्त्वपूर्ण ग्रंथ-संपादने केली आहेत : विचारधारा (१९७९, प्रभाकर पाध्ये यांचे निवडक लेख), वाङ्मयीन शैली आणि तंत्र (१९८१), मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप (१९५०–७५ गो. मा. पवार यांच्या सहकार्याने), डोहकाळिमा (१९८७, जी. ए. कुलकर्णी यांच्या निवडक कथा), श्री. दा. पानवलकर : निवडक कथा (१९८८), निवडक मराठी समीक्षा (१९९९, गो. मा. पवार यांच्या सहकार्याने), जी. एं. ची निवडक पत्रे : खंड १ ते ४ (इतरांच्या सह-कार्याने ). तसेच उगवाई या वाङ्मयीन मासिकाचे संपादनही त्यांनी केले. त्यांनी इंग्रजीतून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीत असे काही कथाकादं-बऱ्यांचे अनुवाद केले पण त्यांचे सर्वांत महत्त्वाचे अनुवादकार्य म्हणजे, वि. रा. करंदीकर यांच्या रामकृष्ण आणि विवेकानंद या मराठी वैचारिक ग्रंथाचे त्यांनी केलेले इंग्रजी भाषांतर (१९९१) होय. साहित्य अकादेमीच्या’ मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर’ या मालिकेत वि. स. खांडेकर यांचे जीवनचरित्र व साहित्य यांविषयी त्यांनी इंग्रजी पुस्तक लिहिले (१९८६). त्यांना अनेक मानसन्मान लाभले : महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श प्राध्यापक’ पुरस्कार (१९७६) साहित्यविवेक या ग्रंथासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा ग्रंथ पुरस्कार (१९९८) सांगली येथे भरलेल्या एक्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२००८) सांगली भूषण पुरस्कार (२०१४) इत्यादी. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, साहित्य अकादेमी समिती, ज्ञानपीठ मराठी समिती इ. अनेक संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले.

 

सांगली येथे त्यांचे निधन झाले.

इनामदार, श्री. दे.