सिक्कीम : भारतातील एक घटकराज्य आणि भूतपूर्व स्वतंत्र राजेशाही राष्ट्र. १६ मे १९७५ रोजी हे भारताचे एक घटकराज्य बनले. ईशान्य भारतातील पूर्व हिमालयीन पर्वतश्रेणीमध्ये ह्या राज्याचे स्थान आहे. सिक्कीमच्या पश्चिमेस नेपाळ, पूर्वेस भूतान हे देश, उत्तरेस व ईशान्येस तिबेट (चीनव्याप्त प्रदेश) आणि दक्षिणेस भारताचे प. बंगाल राज्य आहे. सिक्कीमच्या अशा मोक्याच्या आणि संवेदनशील स्थानामुळे ते लष्करी व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. या राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार सु. ११० किमी. तर पूर्व-पश्चिम विस्तार सु. ८० किमी. आहे. राज्याचे क्षेत्रफळ ७,०९६ चौ. किमी. असून हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे लहान राज्य आहे. लोकसंख्या ६,०७,६८८ (२०११). गंगटोक (लोकसंख्या ९८,६५८–२०११) हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : हिमालयातील स्थानामुळे सिक्कीमच्या प्राकृतिक रचनेत टोकाची तफावत आढळते. येथील खोल दरी प्रदेशातील सस.पासूनची किमान उंची ३०० मी. असून ती कमाल ८,५९८ मी. पर्यंत वाढत गेलेली आहे. सिक्कीमला पश्चिम, उत्तर व पूर्व अशा तिन्ही दिशांच्या पर्वतश्रेण्यांनी वेढलेले असून त्यामुळे सिक्कीमचा सर्वसाधारण आकार घोड्याच्या नालेसारखा दिसतो. उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या दोन विदीर्ण कटकांमुळे सिक्कीमच्या पश्चिम व पूर्व सरहद्दी सीमित केलेल्या आहेत. त्यांपैकी पश्चिमेकडील नेपाळ-सिक्कीम यांच्या सरहद्दीवर सिंगलिला कटक आहे. याच श्रेणीत कांचनजंघा (उंची ८,५९८ मी.) हे एव्हरेस्ट व के-टू नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. सिक्कीमी लोक या शिखराला पवित्र मानतात. येथे बर्फाचे अनेक मीटर जाड थर असून गुरुत्व व न पेलणारे त्याचे वजन यांमुळे हिमनद्या व हिमप्रपात यांच्या स्वरुपात ते खाली येतात. जगातील सर्वांत मोठे हिमलोट येथेच होतात. उत्तर सिक्कीममध्ये या बर्फकड्यांची नेहमीच धास्ती असते. ते केव्हा घसरतील याचा नेम नसतो. बर्फाच्या हालचाली होत असताना होणाऱ्या आवाजांमुळे वातावरणात एक प्रकारची भेसूरता निर्माण होते. पूर्वेस सिक्कीम-तिबेट सरहद्द डोंख्या श्रेणीने निश्चित केलेली आहे. या दोन कटकांच्या मध्ये सिक्कीम खोरे असून या खोऱ्याच्या उत्तरेस पसरलेल्या हिमालयाची बहिर्वक्र श्रेणी व तिच्यावरील उंच शिखरांनी तिबेटपासून सिक्कीम अलग केले आहे. विदारणामुळे सिक्कीममध्ये खडक उघडे पडलेले असून कड्यांच्या अनेक मालिका तिबेट-सिक्कीम सीमेवर दृष्टीस पडतात. येथील हिमालयाच्या भागाला सिक्कीम हिमालय असे म्हणतात. या श्रेणीत स्फटिकमय खडकरचना आहे. याच श्रेणीत तिस्ता नदी उगम पावते. तिस्ता सिक्कीममधून उत्तर-दक्षिण दिशेस वाहते. सिक्कीमचा दक्षिण भाग दार्जिलिंग कटकाच्या प्रतिरोधक खडकांनी सीमित केलेला आहे. या कटकामधून तिस्ता नदीने खोदलेल्या खोल व अरुंद घळईतून ती प. बंगाल राज्यातील कालिंपाँगकडे वाहत जाते. त्यानंतर ती पुढे बांगला देशात बह्मपुत्रा नदीला मिळते. सिक्कीमच्या मध्यवर्ती उच्चभूमीचे अपक्षरण तिस्ता व तिच्या उपनद्यांनी केलेले आहे. तुलनेने हा भाग मृदु खडकांचा असल्यामुळे नद्यांनी अरुंद घळयांऐवजी मोठी खोरी निर्माण केली आहेत. नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर वृष्टी होत असल्यामुळे नद्या दुथडी भरुन वाहतात. उत्तर भागात हिमवृष्टी होत असल्याने ते हिम तीव्र उतारावरुन हिमनद्यांच्या स्वरुपात वाहत असते. रंगीत व रांगपो या नद्या सिक्कीम-पश्चिम बंगाल यांदरम्यानच्या सरहद्दीवरुन वाहतात.

हवामान : सिक्कीमच्या हवामानात उंचीनुसार प्रदेशपरत्वे विविधता आढळते. सखल खोऱ्यात उष्णकटिबंधीय, १,००० मी. पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात समशीतोष्ण कटिबंधीय, तर उंच पर्वतीय प्रदेशातील माथ्याच्या भागात अल्पाइन किंवा आर्क्टिक प्रकारचे शीत हवामान आढळते. उंच पर्वतीय माथे कायम हिमाच्छादित असून तेथील बर्फाच्या थरांची जाडी ३० मी. पर्यंत आढळते. हिमालयातील सर्वाधिक आर्द्र प्रदेशांपैकी हा एक प्रदेश आहे. वार्षिक पर्जन्यमान १२७ ते ५०८ सेंमी. यांदरम्यान असून ते प्रामुख्याने नैर्ऋत्य मान्सून वाऱ्याच्या काळात मे–ऑक्टोबर या महिन्यांत असते. पर्जन्यमानात उंचीनुसार तफावत आढळते.

सिक्कीममध्ये समृद्घ वनस्पतिजीवन आहे. जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील (हॉट स्पॉट) परिसरांपैकी सिक्कीम हे एक आहे. येथे ५,००० पेक्षा अधिक जातीच्या सपुष्प वनस्पती, ३६२ जातीचे नेचे, ५५० पेक्षा अधिक जातीचे ऑर्किड व ३६ जातीच्या ऱ्होडोडेंड्रॉन वनस्पती आढळतात. विविध प्रकारचे ओक, पाइन, फर, स्प्रूस, सिमल, साल, बांबू, प्रिम्यूला इ. वनस्पती प्रकार येथे आढळतात. मोठ्या वृक्षांखाली अनेक परोपजीवी वनस्पती वाढतात. उत्तर भागात विरळ गवताळ प्रदेश आहे.

राज्यात ५०० पेक्षा अधिक जातीचे प्राणी व पक्षी आढळतात. सु. ५० जातीचे उभयचर प्राणी, ८० प्रकारचे सरीसृप, ६०० जातीचे रंगीबेरंगी पक्षी, सु. १५० प्रकारचे सस्तन प्राणी, सु. ७०० पेक्षा अधिक जातींची फुलपाखरे व ४८ जातीचे मासे येथे आहेत. अरण्यांमध्ये अस्वल, तांबडा पंडक (पँडा), रुपेरी कोल्हा, वाघ, लांडगा, चित्ता, खवल्या मांजर, कस्तुरी मृग, काळवीट, याक, सरपटणारे प्राणी इ. प्राणी पहावयास मिळतात. दुर्मिळ व जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला हिमचित्ता येथे आढळतो. तिबेटी अरगली मेंढ्या येथे आहेत. कांचनजंघा राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वाधिक उंचीवरील राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. देवराली हे दुसरे राष्ट्रीय उद्यान येथे आहे.

इतिहास : बाराव्या शतकापासून भूतिया या तिबेटी लोकांची स्थलांतरे या प्रदेशात होऊ लागली. तेराव्या शतकापासून आसाममधून आलेल्या लेपचा (दरीतील जनसमूह) स्थलांतरितांनी सिक्कीममध्ये वसाहती करण्यास प्रारंभ केला. चौदाव्या शतकात नामग्याल कुळातील लोकांचे या प्रदेशात आगमन झाले. त्यांनी हळुहळू सिक्कीमवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. या शतकात सिक्कीम हे नामग्याल कुळातील सत्ताधिशांचे स्वतंत्र राज्य राहिले. १६४१ मध्ये ल्हासाच्या लामाने सिक्कीममधील लोकांना बौद्घ धर्माची दीक्षा देऊन पेंचु नामग्याल यांना ग्यालपो (राजा) म्हणून गादीवर बसविले. पुढे सु. ३३० वर्षे येथे नामग्याल सत्ता राहिली. सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत सिक्कीमला भूतान व नेपाळशी दीर्घकाळ लढा द्यावा लागला. त्यात सिक्कीमला आपला काही प्रदेशही गमवावा लागला होता. नेपाळी लोकांनी सिक्कीममध्ये स्थलांतर करुन येथे ते शेतकरी म्हणून स्थायिक झाले. अठराव्या शतकात वांशिक दृष्ट्या सिक्कीमची लोकसंख्या मिश्र होती. त्यामुळे अंतर्गत संघर्षही घडत असत. स्वतंत्र परंतु लहान देश असल्यामुळे सिक्कीमला आपली प्रादेशिक एकात्मता टिकविण्यासाठी बराच लढा द्यावा लागला. त्सुग फू नामग्यालच्या कारकीर्दीत सिक्कीमी लोकांचा ब्रिटिशांशी संबंध आला. १८१४-१५ मध्ये ब्रिटिशांनी मोठी फौज पाठवून सिक्कीमच्या मदतीने नेपाळचा पराभव केला. इ. स. १८१७ मध्ये सिक्कीम ब्रिटिश अंमलाखाली आला. ब्रिटिशांची राजकीय सत्ता आल्यानंतर सिक्कीम हे ब्रिटिश भारत व तिबेट यांचे स्वतंत्र अडसर राज्य राहिले.


ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८३५ मध्ये दार्जिलिंग जिल्ह्याची खरेदी केली. पुढे ब्रिटिशांनी हा जिल्हा भारताला दिला. १८९० मध्ये सिक्कीम व तिबेट यांच्यातील सरहद्दी निश्चित करण्यासाठी ब्रिटन व चीन यांच्यात एक करार झाला. १९४७ मध्ये ब्रिटिश अंमल गेल्यानंतर ओघाओघाने ब्रिटिशांची सिक्कीममधील जबाबदारी भारताने उचलली. १९५० मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार सिक्कीम हे भारताचे रक्षित राज्य बनले. तेव्हापासून सिक्कीमवरील भारतीय प्रभाव वाढला. भारताने सिक्कीमच्या संरक्षण, परराष्ट्रीय धोरण व संदेशवहनाची जबाबदारी घेतली. सिक्कीमच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी भारताने मदत केली. १९७५ मध्ये सिक्कीममधील ९७% मतदारांनी सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्याच्या बाजूने कौल दिला. १६ मे १९७५ रोजी भारताचे बावीसावे घटकराज्य म्हणून सिक्कीम भारतात सामील झाले. भारत-तिबेट यांच्या वाटेवरील हे राज्य असल्याने त्याला भूराजनैतिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

सिक्कीममधून लोकसभा व राज्यसभेसाठी प्रत्येकी एक एक प्रतिनिधी पाठविला जातो. विधानसभेत ३२ लोकप्रतिनिधी असतात. राज्यकारभाराच्या दृष्टीने सिक्कीमची विभागणी पूर्व, उत्तर, दक्षिण व पश्चिम अशा चार जिल्ह्यांत केली असून त्या जिल्ह्यांची प्रमुख केंद्रे अनुक्रमे गंगटोक, मंगन, नामची व ग्यालसिंग अशी आहेत.

आर्थिक स्थिती : शेती हा सिक्कीममधील प्रमुख व्यवसाय असला, तरी पर्वतांतर्गत स्थान व हवामान यांमुळे येथील कृषी व्यवसायावर मर्यादा येतात. राज्यात सखल प्रदेश अतिशय मर्यादित आहे. लागवडयोग्य क्षेत्र फक्त ७०,००० हेक्टर आहे. तिस्ता व रंगीत नद्यांच्या खोऱ्यात गाळाच्या मृदा आढळून येतात. जास्त पावसामुळे पर्वतीय प्रदेशातील मृदा धुपून गेलेल्या आढळतात. उताराच्या भागात सोपान शेती केली जाते. शक्य तिथे जलसिंचनाचा वापर केला जातो. निकस जमिनीमुळे हेक्टरी उत्पादन कमी मिळते. सिक्कीम शासनाकडून कृषी मालावर-विशेषतः उद्यानशेतीतील उत्पादनांवर-प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. तांदूळ, गहू, बार्ली, मका, अन्य तृणधान्ये, आले, वेलदोडा, दालचिनी, सफरचंद, बकव्हीट, बटाटा, कोबी, टोमॅटो, संत्री, लिंबू वर्गीय इतर फळे, चहा, अननस, केळी, फुले, अळंबे ही राज्यातील प्रमुख कृषी उत्पादने आहेत. वेलदोडा उत्पादनात राज्य अग्रेसर आहे. सन १९९९ मध्ये राज्यात कृषी उत्पादने पुढीलप्रमाणे झाली. (उत्पादन हजार टनामध्ये) : मका– ५६, तांदूळ–२१, गहू–१४, बटाटा–२८, कडधान्ये–६. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने उद्यानशेती व पुष्पशेती महत्त्वाची ठरत आहे. भाजीपाला व फुलांच्या उत्पादनांसाठी हरितगृहांचा वापर वाढत आहे. सेंद्रिय शेतीवर अधिक भर दिला जात आहे. पाण्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी तलाव बांधण्यात आले आहेत. त्यासाठी इझ्राएल व हॉलंडचे तंत्रज्ञान वापरले जाते. पर्जन्यजल साठवणीचे प्रयोगही केले जात आहेत.

शेळ्या, मेंढ्या, म्हशी, डुकरे, याक, तट्टू, खेचरे, कोंबड्या ही पर्वतीय प्रदेशातील निर्वाहाची साधने आहेत. मांस, दूध, लोकर व कातडी उत्पादनांबरोबरच काही प्राण्यांचा वाहतुकीसाठीही उपयोग केला जातो. उन्हाळ्यात मेंढ्या व याक पालन ३,५०० मी. पेक्षा अधिक उंचीवरील गवताळ प्रदेशांत केले जाते. राज्यात अरण्याखालील क्षेत्र ३,१२७ चौ. किमी. (१९९५) असून ते आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. राज्यात चांदी, तांबे, शिसे, जस्त, लोहखनिज, ग्रॅफाइट, संगजिरे, दगडी कोळसा, रत्ने, पायराइट, संगमरवर इ. खनिजद्रव्यांचे उत्पादन होते.

कृषी मालावर आधारित उद्योग, परंपरागत हातमाग, विणकाम, हस्तव्यवसाय, लोकरी कपडे, गालिचे, घोंगडी व ब्लँकेट निर्मिती, चहावरील प्रक्रिया, फळांवरील प्रक्रिया, बांबूकाम, सिगारेटी व मद्यनिर्मिती, चर्मशोधन, घड्याळे जुळणी, भरतकाम, तैलचित्रे काढणे, कशिदाकाम, काड्यापेट्या तयार करणे, वेताच्या व बांबूच्या वस्तू, लाकडावरील खोदकाम, चांदीकाम इ. उद्योग-व्यवसाय येथे चालतात. कारागिरीसाठी येथील लोक प्रसिद्घ आहेत. ईशान्य भारतासाठीचे १ एप्रिल २००७ पासून कार्यान्वित झालेले ‘ईशान्य औद्योगिक व गुंतवणूक धोरण २००७’ हे सिक्कीमसाठीही लागू आहे. त्या अंतर्गत औषधनिर्माण, आवेष्टन यांसारखे विविध उद्योग येथे स्थापन झाले आहेत. सिक्कीम औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळ तसेच NEDFI कडून लहान व मध्यम उद्योगांसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज पुरविले जाते. फलसंस्करण कारखाना, टेमी चहा इस्टेट आणि हातमाग व हस्तव्यवसाय संचालनालय येथे आहे. कुटिरोद्योग संस्थेकडून परंपरागत व्यवसायांबरोबरच बाहुल्या निर्मिती, भरतकाम, मृत्तिकाशिल्प, कापडाच्या गुंडाळीवरील परंपरागत चित्रकाम, हातबनावटीची कागदनिर्मिती व इतर कलांसाठी मार्गदर्शन केले जाते. राज्यव्यापार निगम वैयक्तिक उत्पादनांच्या व्यापारास उत्तेजन देतो. राज्याच्या २०००-०१ चा अर्थसंकल्प १,१४,३६० द. ल. रुपये उत्पन्नाचा आणि १,१६,३०० द. ल. रुपये खर्चाचा होता. राज्यात चार जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प आहेत (२००८).

हिमाच्छादित हिमालयीन पर्वतश्रेण्या व त्यांवरील शिखरे, विलोभनीय सृष्टिसौंदर्य, समृद्घ वनस्पती व प्राणिजीवन, सरोवरे व गुहा, गरम पाण्याचे झरे, खळाळते नदीप्रवाह व त्यांवरील जलप्रपात ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. ट्रेकिंगची मजा लुटण्यासाठी हौशी पर्यटक येथे येत असतात.

राजधानी गंगटोक ही रस्त्याने राज्यातील जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणांशी तसेच दार्जिलिंगशी (प.बंगाल) जोडली आहे. रस्त्यांची एकूण लांबी २,३७६ किमी. असून त्यांपैकी ४० किमी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग व ६७८ किमी. लांबीचे राज्यमहामार्ग आहेत. गंगटोकपासून सु. ११० किमी. असलेले सिलिगुडी (प. बंगाल) हे जवळचे लोहमार्ग स्थानक आहे. गंगटोकपासून १२८ किमी.वरील बागडोग्रा (प. बंगाल) हा जवळचा विमानतळ आहे. अलीकडे पूर्व सिक्कीममधील पाकयाँग येथे ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येत आहे. गंगटोक ते बागडोग्रा यांदरम्यान नियमित हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे. नथू ला व जेलेप ला या येथील लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या खिंडी आहेत. या दोन्ही खिंडी चुंबी खोऱ्याकडे जातात. डोंगक्ता व चोला या खिंडी तिबेटकडे जातात. त्यांपैकी नथू ला खिंड गंगटोकच्या ईशान्येस २४ किमी.वर व सस.पासून ४,३०० मी. उंचीवर असून तिच्यातून बऱ्याच प्रमाणात वाहतूक चालते. या खिंडीच्या आग्नेयीस सु. १० किमी.वर जेलेप ला खिंड सस.पासून सु. ४,३६६ मी. उंचीवर आहे. हिमवृष्टी झाल्यावर हा मार्ग बंद राहतो.


लोक व समाजजीवन : प्रागैतिहास काळात नाआँग, चांग व मॉन या तीन जमातींचे वास्तव्य येथे असावे असे मानले जाते. त्या काळात हिमालय पार करुन काही जमाती येथे आल्या असाव्यात. इतिहासकाळात इतर जमाती अशाच प्रकारे येथे आल्या असाव्यात. सर्वाधिक स्थलांतर अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत प्रामुख्याने उत्तर व पूर्व नेपाळमधून झाले. येथील लोकांत समान वांशिक एकता नाही. यांच्या भाषा वेगवेगळ्या असून, त्यांचे वेगवेगळे असणारे गट सुसंघटित नाहीत. लेपचा, भूतिया व त्साँग (बिगर लेपचा व भूतिया) हे येथील प्रमुख वांशिक गट आहेत. राज्यात हिंदू व बौद्घ हे प्रमुख धर्मीय बहुसंख्य असून ख्रिस्ती, मुसलमान आदी अल्पसंख्याक आहेत. पुरुष ३,२१,६६१ व स्त्रिया २,८६,०२७ आहेत (२०११). नागरी लोकसंख्या ११·१ टक्के, लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ८६ व्यक्ती, दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ८८९ आहे. अनु. जातीचे ५·०२ टक्के व अनु. जमातीचे २०·६० टक्के लोक येथे आहेत. साक्षरतेचे प्रमाण ६८·८ टक्के असून त्यांत पुरुषांची साक्षरता ७६ टक्के व स्त्रियांची साक्षरता ६०·४ टक्के होती (२००१). लेपचा, भूतिया, नेपाळी व लिंबू या प्रमुख भाषा आहेत. राज्यकारभारासाठी इंग्रजी भाषा वापरली जाते. सखल भागात लोकवस्ती अधिक असून अगदी उत्तर भागात मनुष्यवस्ती नाही. पर्वत उतारांवर लहान लहान वस्त्या आढळतात.

राज्यातील सांस्कृतिक जीवन हे तिबेटीयनांच्या धार्मिक व सौंदर्यविषयक परंपरांशी निगडित आहे. एकेकाळी बहुपतिविवाह रुढी प्रचलित होती, ती आता कमी झालेली आहे. माघी संक्रांती, दुर्गा पूजा, चैती दसई (नेपाळी), पांग ल्हाबसोल व लोसर (भूतियाज), नामसुंग व टेंडाँग ह्‌लो रम, फाट (लेपचा) हे उत्सव येथे साजरे केले जातात. भूतिया, नेपाळी व लेपचा यांची मुखवटानृत्ये प्रसिद्घ आहेत. येथील बौद्घ मठांमध्ये भित्तिचित्रे, ब्राँझशिल्पे इ. कलात्मक वस्तूंचा संग्रह आहे. ‘नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजी’मध्ये तिबेटी पुस्तकांचा फार मोठा संग्रह आहे.

राज्यात बारावीपर्यंत शिक्षण मोफत आहे. राज्यातील ७३९ पूर्व प्राथमिक विद्यालयांत २३,५३८ विद्यार्थी, ३३५ प्राथमिक विद्यालयांत ८४,९८६ विद्यार्थी, १२२ कनिष्ठ माध्यमिक विद्यालयांत २३,९४९विद्यार्थी, ७२ माध्यमिक विद्यालयांत ३,३३१ विद्यार्थी आणि २७ उच्च माध्यमिक विद्यालयात १,४८४ विद्यार्थी तसेच ५०० प्रौढ शिक्षण केंद्रे होती (२००१). एक प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण संस्था, एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय व दोन पदवी महाविद्यालये आहेत. येथील महाविद्यालये नॉर्थ बेंगॉल विद्यापीठाशी (दार्जिलिंग) संलग्न आहेत. याशिवाय सिक्कीम मणिपाल हे खाजगी विद्यापीठ आहे. सिक्कीममध्ये एक राज्य रुग्णालय, ४ सार्वजनिक, २४ प्राथमिक व १४७ उपप्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. गंगटोकशिवाय नामची, ग्यालसिंग, मंगन, जेलपे ला, पेमायांगत्से, लाचेन, युनथांग ही नगरे आहेत. (चित्रपत्रे).

चौधरी, वसंत

सिक्कीम


पारंपरिक मुखवटा नृत्यासाठी सज्ज असलेले सिक्कीम लामा.गंगटोकजवळील प्रसिद्ध रूमटेक मोनॅस्टरीराजधानी गंगटोक : एक दृश्यभुटियांचा लोसोर उत्सव : एक दृश्य

कांचनजंघा शिखर : सिक्कीमींचे पवित्र ठिकाण.सिक्कीमच्या बौद्ध मंदिरातील भव्य प्रार्थनाचक्र

याक : सिक्कीमचा बहुपयोगी प्राणी.पारंपरिक वेशभूषेतील सिक्कीमी राजकन्या