कस्तुरी मांजर : याला ‘जवादी मांजर’ असेही म्हणतात. मांसाहारी गणातील व्हायव्हेरिडी कुलातल्या व्हायव्हेरिक्युला वंशाचा हा प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव व्हायव्हेरिक्युला इंडिका आहे.  या वंशात ही एकच जाती असून ती भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, दक्षिण चीन व मलाया येथे आढळते.  भारतात पंजाब आणि हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांपासून दक्षिणेकडे कामोरिन भूशिरापर्यंत हा  प्राणी सगळीकडे सापडतो. उंच गवतात किंवा झुडपात तो राहतो, पण दाट जंगलात किंवा अरण्यात  तो नसतो. पुष्कळ कस्तुरी मांजरे खेड्यांच्या आसपास राहतात. हा प्राणी जरूर पडेल तेव्हा  झुडपांखाली, गवतात, खडकांच्या कपारीत किंवा बिळात आसरा घेतो.

डोक्यासकट शरीराची लांबी ४५–६५ सेंमी. आणि शेपटीची लांबी ३०–४५ सेंमी. असते. केस राठ  व विस्कळीत असतात. शरीराचा रंग पिवळसर, तपकिरी किंवा करडा असून पाय काळे असतात.  पुढच्या भागावर लहान आणि कमरेवर मोठे काळे ठिपके असतात. पाठीवर ६–८ लांब काळे पट्टे  असतात. शेपटीवर एकाआड एक अशी काळी आणि पांढरी वलये असतात. मानेवर बहुधा थोडे  आडवे पट्टे असतात. मुस्कट निमुळते आणि आखूड असते.

कस्तुरी मांजरे एक एकटी पण कधीकधी जोडीने असतात. भक्ष्य मिळविण्याकरिता ती रात्री बाहेर पडतात. उंदीर, घुशी, खारी, सरडे, लहान पक्षी, किडे, फळे, मुळे आणि इतर वनस्पतिजन्य पदार्थ हे यांचे भक्ष्य होय. यांना बोरे  फार आवडतात..

कस्तुरी मांजर

 

प्रजोत्पादनाचा ठराविक काळ नसतो. मादीला दर खेपेस २–५ पिल्ले होतात. ती एखाद्या  खडकाखाली किंवा झाडाच्या बुंध्यात एक बीळ खणून त्याच्या आतल्या टोकाशी एक कोठडी तयार  करते व त्यात पिल्ले ठेवते. पिल्लांच्या संगोपनाचे काम मादीकडेच असते.

कस्तुरी मांजरे सहज माणसाळतात. यांच्या जननेंद्रियांच्या जवळ असणाऱ्या कस्तुरी ग्रंथींपासून उत्पन्न होणारी कस्तुरी काढून घेण्याकरिता पुष्कळ लोक ही मांजरे  पाळतात. तंबाखू सुवासिक करण्याकरिता बहुधा या कस्तुरीचा उपयोग करतात.

भट, नलिनी