त्रिवेदी, रामेंद्रसुंदर : (२० ऑगस्ट १८६४–६ जून १९१९). प्रसिद्ध बंगाली निबंधकार, वैज्ञानिक व राष्ट्रवादी विचारवंत. त्यांचा जन्म मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जेमो नावाच्या खेड्यात एका जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदसुंदर आणि माता चंद्रकामिनी देवी. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावी व नंतरचे शिक्षण प्रेसिडेन्सी महाविद्यालय, कलकत्ता येथे झाले. १८८६ मध्ये ते विज्ञानात ऑनर्स मिळवून पदवीधर झाले. १८८७ मध्ये ते भौतिकी आणि रसायनशास्र घेऊन एम्‌. ए. झाले. १८८८ मध्ये त्यांना प्रेमचंद रॉयचंद शिष्यवृत्ती मिळाली. १८८८ मध्येच त्यांचा इंदुमती देवींशी विवाह झाला. १८९२ मध्ये ते रिपन महाविद्यालयात भौतिकीचे व रसायनशास्त्राचे अधिव्याख्याते म्हणून गेले आणि १९०३ मध्ये ते तेथे प्राचार्य झाले. १९१९ पर्यंत ते या पदावर होते. काशीच्या पंडितांनी त्यांना ‘विद्यासागर’ हा किताब दिला.

ते विज्ञानाचे विद्यार्थी असले, तरी बंगाली साहित्याचे निष्ठावंत सेवक होते. भाषाशास्र, पौर्वात्य व पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, विज्ञान, यज्ञयाग, संस्कृती, धर्म, चरित्रे, इतिहास इ. नानाविध विषयांवर त्यांनी विपुल व उत्कृष्ट लेखन केले. निबंधकार म्हणून ते प्रथम नवजीवन ह्या नियतकालिकात चमकले. साधना नियतकालिकाचे ते एक श्रेष्ठ लेखक होते. भारतीसाहित्य या नियतकालिकांतही त्यांचे निबंध प्रसिद्ध होत.

रामेंद्रसुंदर रवींद्रनाथांचे भाव–शिष्य होते. मुलांसाठी असलेला ‘छडा’ नावाचा काव्यप्रकार आणि ‘रूपकथा’ नावाचा मुलांसाठीच असलेला कथाप्रकार यांच्या संशोधनकार्यात ते रवींद्रनाथांचे सहकारी होते. वंगीय साहित्य–परिषद हे रामेंद्रसुंदरांचे प्रमुख कार्यक्षेत्र. उत्कृष्ट निबंधकार म्हणून बंगालीत ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निबंधांत विविध विषयांचे त्यांचे सखोल ज्ञान व काटेकोर अभिव्यक्ती यांचा प्रत्यय येतो. प्रकृति (१८९६) हा त्यांचा वैज्ञानिक विषयांवरील निबंधांचा पहिला संग्रह. जिज्ञासा (१९०३) आणि कर्मकथा (१९१३) ह्या संग्रहांत त्यांचे चिंतनात्मक व तत्त्वज्ञानपर निबंध आहेत. त्यांनी लिहिलेले भाषाशास्रीय शोधनिबंध (पेपर्स) शब्दकथा (१९१७) नावाने संगृहीत आहेत. त्यांच्या निबंधांचे आणखी तीन संग्रह त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाले. याशिवाय त्यांनी ऐतरेय ब्राह्मणाचा  बंगालीत अनुवादही केला.

राष्ट्रीय वृत्ती व तिची अभिव्यक्ती यांबाबतही रामेंद्रसुंदर हे रवींद्रनाथांचे सहपंथी होते. देशातील लोकशक्तीला जागृत करणे, हे त्यांचे कार्य होते. त्यांचे लेखन स्वतंत्र बाण्याचे आहे. अभिजात साहित्यदृष्टी व आकर्षक शैली यांमुळे त्यांचे निबंध विशेष लक्षणीय मानले जातात.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)