टागोर, सत्येंद्रनाथ : (१ जून १८४२–९ जानेवारी १९२३). एक उच्चपदस्थ बंगाली अधिकारी व साहित्यिक. कलकत्ता येथे प्रख्यात टागोर (ठाकूर) घराण्यात जन्म. महर्षी देवेंद्रनाथांचे द्वितीय पुत्र व रवींद्रनाथांचे बंधू. महर्षी देवेंद्रनाथांच्या ऋषितुल्य चारित्र्याचा व ब्राह्मो समाजाच्या चळवळीचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण खाजगी रीत्या घरीच झाले. नंतर कलकत्त्याच्या हिंदू स्कूलमधून ते प्रवेश परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात शिक्षण घेतले. १८६२ मध्ये आय्.सी.एस्. परीक्षेसाठी ते इंग्लंडला गेले आणि १८६३ मध्ये ते आय्.सी.एस्. झाले. १८६४ मध्ये त्यांची मुंबई इलाख्यात सरकारी नोकरीत नेमणूक झाली. भारतातील ते पहिले आय्.सी.एस्. व उच्चपदस्थ सरकारी नोकर होत. मुंबईस त्यांची नेमणूक झाल्यामुळे, बंगाल व महाराष्ट्राचे नाते अधिक जवळचे होण्याला साहाय्य झाले. विलायतेला जाण्यापूर्वी रवींद्रनाथ पाच-सहा महिने सत्येंद्रनाथ यांच्याकडे मुंबईस व अहमदाबाद येथे राहिले होते. सरकारी नोकरीतून १८९७ मध्ये निवृत्त झाल्यावर ते कलकत्त्यास स्थायिक झाले.

सत्येंद्रनाथांचा बौद्धधर्म (१९०१) हा ग्रंथ बंगाली साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याशिवाय बोम्बाई चित्र (१८८८), आमार बाल्यकथा ओ बोम्बाई प्रवास (१९१५) हे आत्मचरित्र, सुशीला, वीरसिंह ही नाटके त्याचप्रमाणे कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी केलेला बंगाली अनुवाद, नवरत्नमाला इ. ग्रंथ उल्लेखनीय होत. विशेष म्हणजे सत्येंद्रनाथांना मराठी उत्तम येत होते व त्यांनी लो. टिळकांच्या गीतारहस्याचा बंगालीत अनुवादही केला.

सत्येंद्रनाथ पुरोगामी विचारांचे सुधारक व स्त्रीस्वातंत्र्याचे कैवारी होते. त्यांनी त्यांच्या पत्नी ज्ञानदानंदिनी देवींना पुढाकार घ्यावयास लावून स्त्रीमुक्ती-आंदोलनास हातभार लावला. ज्ञानदानंदिनी देवींनी आपल्या कुटुंबातील पडदापद्धती झुगारून दिली व रूढीविरुद्ध बंड पुकारले. राजभवनात व्हाइसरॉयकडून सत्कार होणाऱ्‍या त्या आद्य भारतीय महिला होत. सत्येंद्रनाथांचे स्त्री स्वाधीनता हे पुस्तक उद्‌बोधक व विचारप्रवर्तक ठरले. स्वदेशाविषयी व मातृभाषेविषयी सत्येंद्रनाथांना नितांत प्रेम होते. त्या वेळी बंगालमध्ये राष्ट्रीय गीत म्हणून गाजलेले ‘मिले राबे भारत संतान’ हे गीत सत्येंद्रनाथांनी लिहिले होते. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)