दास, जीवनानंद : (१८९९–१९५४). आधुनिक बंगाली कवी. बारिसाल येथे ब्राह्मकुटुंबात जन्म. शिक्षण प्रथम बारिसाल येथे व नंतर कलकत्त्यास. कलकत्ता विद्यापीठातून एम्. ए. झाल्यावर ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले. नव्या इंग्रजी कवितेच्या अनुकरणाने बंगालमध्ये ज्यांनी आपली कविता लिहिली, त्यांत जीवनानंद प्रमुख होते. त्यांची माता कुसुमकुमारी यांना कविता रचण्याचा छंद होता. त्यांच्याकडूनच जीवनानंदांना काव्यलेखनाची प्रेरणा मिळाली.

त्यांचा पहिला काव्यसंग्रह झरा पालक १९२८ मध्ये प्रसिद्ध झाला. या संग्रहातील काही कवितांवर रवींद्रनाथ टागोर, सत्येंद्रनाथ दत्त आणि काजी नज्रुल इस्लाम यांचा प्रभाव दिसतो. तथापि त्यांच्या नंतरच्या कवितेने सर्वस्वी नवे वळण घेतले. ह्या त्यांच्या नव्या कवितेची प्रेरणा त्यांनी एझरा पाउंड, टी. एस. एलियट व पश्चिमी प्रतिमावादी कवी यांच्यापासून घेतली असावी. धूसर पांडुलिपि (१९३६), वनलता सेन (१९४२), महापृथिवी (१९४४), सातटि तारार तिमिर (१९४८), श्रेष्ठ कविता (१९५४) इ. त्यांचे नव्या वळणाचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. श्रेष्ठ कविता या त्यांच्या संग्रहाला १९५५ मध्ये साहित्य अकादेमीपुरस्कार मिळाला.

जीवनानंदांच्या काव्याला रवींद्रनाथांनी ‘चित्ररूपमय’ म्हणून गौरविले होते. जीवनानंदांच्या काव्यप्रेरणेच्या मुळाशी निसर्गप्रेम होते. कलकत्त्याला आल्यापासून मात्र त्यांची कविता शहरवासी जीवनचित्रणाकडे वळली. कविता रचण्यात जीवनानंद जागरूकपणे रवींद्रनाथांचा प्रभाव टाळण्याचा प्रयत्न करीत असत. त्यांच्या प्रतीकात्मक व रूपकात्मक काव्यांत हे विशेषत्वाने जाणवते.

जीवनानंदांच्या वेळी बंगाली काव्यलेखनात अपरिचित शब्दांचे प्रयोग, प्रतीकांचा विपुल उपयोग आणि अभिव्यक्ती क्लीष्ट दुर्बोध करण्याची एक लाट आलेली होती. त्यातल्या त्यात जीवनानंदांचे काव्य रम्य असले तरी वरील क्लीष्ट रचनेच्या बाबतीत तेही अपवाद नव्हते. असे असले, तरी त्यांचे बहुतांश काव्य सखोल जीवनानुभूतीवर आधारित असल्याने, जेथे ते अनुभूतीतून उत्स्फूर्त झालेले आहे, तेथे ते स्पष्ट व सोज्वळ आहे. परंतु जीवनानंद जेव्हा चिंतनशील झालेले दिसतात, तेव्हा त्यांचे काव्य तत्त्वज्ञानाने भारावलेले, अस्पष्ट व क्लिष्टतेच्या दोषाने दूषित झालेले दिसते. त्यांनी काही गद्यही लिहिले असून ते कवितार कथा (१९५६) मध्ये संगृहीत आहे. ह्या लेखांतून त्यांनी नव्या बंगाली काव्याचा पुरस्कार केला. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : Dasgupta, Chidananda, Jibananda Das, Delhi.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)