मायकेल मधुसूदन दत्तमायकेल मधुसूदन दत्त: (२५जानेवारी  १८२४–२९ जून १८७३)  प्रख्यात बंगालीकवी व नाटककार.  यशोहर  (जेसोर) जिल्ह्यातील  सागरदाँडी  गावी  जन्म. पिता  राजनारायण दत्त, माता जान्हवी.  राजनारायण  दत्त  कलकत्त्यात  वकिली  करीत.  १८३३  साली मधुसूदन वडिलांबरोबर कलकत्त्यास आले आणि हिंदू कॉलेजच्या ज्युनियर  स्कूलमध्ये दाखल झाले. लहानपणी ते बंगाली भाषा शिकले नाहीत कारण ती अशिक्षितांची भाषा आहे. अशी त्यांची धारणा होती. हिंदू कॉलेजमध्ये भूदेव मुखोपाध्याय, गौरदास बसाक व राजनारायण बसू हे मधुसूदनांचे सहपाठी होते. १८४२ पर्यंत मधुसूदन हिंदू कॉलेजमध्ये होते पुढे १८४३ साली ९ फेब्रुवारी रोजी त्यांनी ओल्ड मिशन चर्चमध्ये आर्चडिकन डेयालीट यांच्या हस्ते ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली व ‘मायकेल’ हे नाव स्वीकारले. यावेळी ⇨ कृष्णमोहन बंदोपाध्याय हे साक्षी होते. धर्मांतरामुळे मधुसूदनांना हिंदू कॉलेज सोडावे लागले. १८४४ साली ते शिवपूर येथील बिशप्‌स कॉलेजमध्ये दाखल झाले. तीन वर्षे मधुसूदन बिशप्‌स कॉलेजमध्ये होते. तेथे त्यांनी ग्रीक व लॅटिन या भाषांचे अध्ययन केले. कृष्णमोहन बंदोपाध्याय हे त्यांचे अध्यापक होते. पुढे १८७४ साली धर्मांतरामुळे चिडून, मधुसूदनांच्या वडिलांनी शिक्षणाचा खर्च देणे बंद केल्यामुळे ते १८४८ साली मद्रासला गेले व इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम करू लागले. तेथे रेबेका मॅक्टाव्हिस नावाच्या इंग्लिश मुलीशी त्यांनी पहिला विवाह केला व पुढे १८५५ मध्ये तिच्याशी घटस्फोट घेऊन एमिलिया हे‍न्‍रिएटा सोफिया या फ्रेंच युवतीशी दुसरा विवाह केला. १८५२ सालापासून मधुसूदन मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये हायस्कूल विभागात शिक्षक म्हणून रूजू झाले. १८५६ साली परत कलकत्त्यास येईपर्यंत ते याच नोकरीवर होते. आर्थिक समस्यांमुळे १८४७ साली मधुसूदनांचे शिक्षण थांबले पणविभिन्न भाषांचे अध्ययन ते स्वतः करीतच राहिले. अखेर १८६६ साली ते बॅरिस्टरही झाले.

मद्रासच्या वास्तव्यात त्यांचातीन स्थानीय वृत्तपत्रांशी संबंधहोता :  मद्रास सर्क्युलेटर अँड जनरल क्रॉनिकल, थेनियमव स्पेक्टॅटर. याशिवाय हिंदूक्रॉनिकल हे इंग्रजी वृत्तपत्र तेस्वतः संपादून प्रकाशित करत.मधुसूदनांच्या अनेक इंग्रजीकविता व निंबध या पत्रांमधूनप्रसिद्ध होत. हे सर्व लेखन ते‘टिमोथी पेनपोएम’ या टोपणनावाने करीत. १८४९ सालीमधुसूदनांचे कॅप्टिव्ह लेडी हेपहिले इंग्रजी काव्य प्रकाशित झाले. या कव्यावर ‘कौन्सिल ऑफ एज्युकेशन’ चे अध्यक्ष ड्रिंकवॉटर वीटन यांनी कठोर टीका केली व लेखकाने एकतर स्वतःच्या मातृभाषेत लिहावे किंवा भाषांतरे करावीत असे सुचविले. यानंतर मधुसूदनांच्या आयुष्यात बंगाली भाषेच्या सूक्ष्म अध्ययनाचे व निर्मितीचे नवीन पर्व सुरू झाले.

पितृनिधनानंतर १८५६ साली मधुसूदन कलकत्त्यास परतले आणि पोलीस न्यायालयाचे दुभाषी म्हणून काम करू लागले. याच वेळी कायद्याच्या अध्ययनाची इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली. त्यावेळचे कनिष्ठ पोलीस दंडाधिकारी किशोरीचाँद मित्र यांच्या घरी खाजगी स्वरूपाची साहित्यसभा होत असे. तेथे मधुसूदनांचा प्यारीचाँद मित्र, टेकचाँद इ. समकालीन साहित्यिकांशी संबंध आला व निरनिराळे वादविवाद आणि चर्चा होऊ लागल्या.


बेलगाछिया येथील नाट्यशाळेत मधुसूदनांनी १८५८ सालच्या जुलै महिन्यात रामनारायण तर्करत्नलिखित रत्नावली नाटकाचा प्रयोग पाहिला व इंग्रज प्रेक्षकांसाठी या नाटकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्यानंतर १८५९ साली त्यांनी शर्मिष्ठ नाटक हे बंगाली नाटक स्वतः लिहिले. नंतर बंगाली साहित्यातील प्रहसनांची कमतरता बघून त्यांनी एकेइ कि बोले सभ्यताबुडो शालिकेर घाडे रो ही दोन प्रहसने लिहून ती पाईकपाडा येथील राजांच्या खर्चाने प्रकाशित केली (१८६०). यानंतर लागोपाठ पद्मावती नाटक (१८६०), तिलोत्तमासंभव काव्य (१८६०), कृष्णकुमारी नाटक (१८६१), व्रजांगना (१८६१) ही गीतिकाव्यरचना केली. ही सर्व निर्मिती करून मधुसूदन बंगाली साहित्यिक म्हणून तत्कालीन साहित्यवर्तुळात मान्यता पावले. शर्मिष्ठा नाटकाचा त्यांनी स्वतः इंग्रजी अनुवादही केला.

मधुसूदनांनी १८६१ साली, निर्मितीच्या अत्युच्च शिखरावर असतानाच बंगालीतील ‘पयार’ या पारंपरिक छंदात आवश्यक ते फेरफार करून ‘अमित्राक्षर छंद’ निर्माण केला. ‘अमित्राक्षर छंद’ हा मिल्टनप्रणीत ‘ब्लँक व्हर्स’ चा बंगाली अवतार होय. यात मूळ छंदातील यमक, यती इत्यादींना अधिक लवचिक स्वरूप देण्यात आले आहे. मेघनादवध काव्य हे बंगालीतील श्रेष्ठ महाकाव्य मधुसूदनांनी अमित्राक्षर छंदात लिहिले आहे (१८६१). वीरांगना काव्यमधुसूदनांनी १८६२ साली लिहिले व याच वर्षी हिंदू पेट्रिअट या वृत्तपत्राचे संपादन त्यांच्या हाती आले.

मधुसूदन बॅरिस्टर होण्यासाठी म्हणून १८६२ साली जून महिन्यात लंडनला गेले. १८६३ साली आर्थिक चणचणीमुळे त्यांना दोन वर्षे फ्रान्समध्ये पॅरिस येथे वास्तव्य करावे लागले. पत्नी व मुले बरोबरच होती. १८६५ मध्ये पुन्हा लंडनला परतून त्यांनी कायद्याचे अध्ययन सुरू केले व १८६६ साली ते बॅरिस्टर झाले पण १८६७ साली बॅरिस्टर म्हणून स्वदेशात परतल्यावरही त्यांना वकिली व्यवसाय कधीच फारसा जमला नाही. १८७० साली ते हायकोर्टाच्या प्रिव्ही कौन्सिलमध्ये अनुवादविभागात परीक्षक म्हणून काम करू लागले. १८७२ मध्ये पंचकोट राज्याचे कायदाविषयक सल्लागार म्हणून ते नियुक्त झाले. नोकरी सोडून पुन्हा वकिली करण्याचा प्रयत्न केला पण कुठेही व्यावसायिक स्थिरता राखणे त्यांच्या स्वभावात बसेना. या काळातील आर्थिक चणचणीत नेहमीच ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मधुसूदनांना अनेक वेळा मदत केली.

इंग्रजीतील ‘सॉनेट’ (सुनीत) हा काव्यप्रकार बंगालीत आणण्याचा पहिला मान मधुसूदनांचा आहे. या प्रकाराला त्यांनी ‘चतुर्दशपदी’ हे नाव दिले व स्वतः १०० चतुर्दशपदी कविता लिहून चतुर्दशपदी कवितावली (१८६६) हे पुस्तक प्रकाशित केले. ते विख्यात भाषाविद होते. इंग्रजी, बंगाली, संस्कृत, तमिळ, तेलुगू, फार्सी, हिब्रू, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, इटालियन इ. भाषा त्यांना उत्तम प्रकारे येत. १८६६ सालानंतर त्यांच्या आयुष्याचे उत्तरपर्व सुरू झाले व आर्थिक आणि मानसिक अवनतीमुळे फारशी महत्त्वाची निर्मिती होऊ शकली नाही. हेक्टरवध काव्य (१८७१), माया-कानन नाटक (१८७४) व विष ना धनुर्गुण (अपूर्ण, १८७४) ही त्यांची अखेरच्या काळातील निर्मिती होय.

आयुष्यात सतत चढउतार असले, तरीही सत्कार समारंभांचे काही प्रसंग त्यांच्या वाट्याला आले. १८६१ साली विद्योत्साहिनी समेतर्फे अमित्राक्षर छंद निर्मितीप्रीत्यर्थ त्यांचा जाहीर सत्कार झाला व कालिप्रसन्न सिंह यांच्या हस्ते त्यांना मानपत्र व चांदीचे तबक देण्यात आले. त्यानंतर १८७१ साली डाक्का येथे व १८७२ साली पुरूलिया येथे त्यांचा सत्कार झाला. त्यांच्या कृष्णकुमारी नाटकपद्मावती नाटक या पुस्तकांचा अनुक्रमे १९०२ व १९०३ साली बापू नरसिंह भावे यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

२६ जून १८७३ रोजी पत्नी हेन्‍रिएटा हिचा मृत्यू झाल्यानंतर लगेच तीन दिवसांनी मायकेल मधुसूदन दत्त यांचे कलकत्त्यास देहावसान झाले.

आलासे, वीणा