दे,पांचकडि : (१८७३–१९४५). लोकप्रिय बंगाली रहस्यकथाकार. शिक्षण कलकत्त्यास. बालपणीच इंग्रजी रहस्यकथा वाचण्याचा छंद त्यांस जडला होता. त्यातूनच रहस्यकथा लिहिण्यास ते प्रवृत्त झाले. प्रियनाथ मुखोपाध्याय, शरच्चंद्र सरकार,सुरेंद्रमोहन भट्टाचार्य आदी काही लेखकांनी त्यांच्यापूर्वी इंग्रजी रहस्यकथांची बंगाली रूपांतरे केलेली होती. तथापि दे ह्यांनी हे रूपांतराचे तंत्र अत्यंत कौशल्याने हाताळून फार मोठी लोकप्रियता मिळविली. त्यांच्या रहस्यकथा खूपच लोकप्रिय असल्याने त्यांवर त्यांनी बराच पैसा मिळविला. शरच्चंद्र सरकार,धीरेंद्रनाथ पाल व मणींद्रनाथ बसू हे त्यांचे सहकारी होते. लेखनात या सहकाऱ्यांचे त्यांनी साहाय्य घेतले. मनोरमा,मायाविनी (१८९९), मायावी (१९०१), नीलवसना सुंदरी (१९०४)इ. त्यांच्या विशेष उल्लेखनीय रहस्यकथा होत. त्यांनी जीवन्मृत रहस्य (१९०३, पुढे सेलिना सुंदरी  ह्या नावाने प्रसिद्ध,पाचवी आवृ. १९३३) ही रहस्यकथा रवींद्रनाथांना अर्पण केली होती. सु. तीस रहस्यकथा त्यांनी लिहिल्या.

रचनाकौशल्य आणि मार्मिक स्वभावरेखाटन ही त्यांच्या रहस्यकथालेखनाची वैशिष्ट्ये होती. ऑर्थर कॉनन डॉयल ह्या विख्यात इंग्रज रहस्यकथाकाराने निर्मिलेल्या ‘शेरलॉक होम्सʼच्या धर्तीवर दे ह्यांनी निर्माण केलेले दिवाण गोविंदराम हे पात्रही लोकप्रिय झाले. त्यांच्या बऱ्‍याच रहस्यकथा विविध आधुनिक भारतीय भाषेत अनुवादित झाल्या आहेत. वैष्णवपदावलींबद्दल त्यांना विशेष भक्ती होती. जान्हवीचे संपादक आणि त्यांचे निकटचे स्नेही यतींद्रनाथ पाल यांच्या मृत्यूचाधक्का त्यांना साहवला नाही आणि त्यांनी लिहायचे सोडून दिले.

कमतनूरकर,सरोजिनी