सेन, नवीनचंद्र : (सु. १८४६–? १९०९). बंगाली कवी. जन्म नोआपारा (जि. चितगाँग, बांगला देश) या गावी. त्यांचे वडील गोपी मोहन हे चितगाँग शहरातील न्यायालयात पेशकार (अवल कारकून) म्हणून नोकरीस होते. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर (१८६७) कर्जबाजारीपणामुळे नवीनचंद्र यांनी काही काळ ‘हेअर स्कूल’ या शाळेत अध्यापन केले. ‘जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन’ मधून १८६८ साली ते बी.ए. झाले. त्यानंतर ‘डेप्यूटी मॅजिस्ट्रेट’ म्हणून त्यांची नेमणूक झाली. ब्रिटिश सरकारच्या सेवेत ते ३६ वर्षे होते. १९०४ साली ते निवृत्त झाले. ते ‘वंगीय साहित्य परिषद’ या संस्थेत कार्यकारी सदस्य होते.

नवीनचंद्र सेन

नवीनचंद्रांना कवी म्हणून पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली, ती अवकाशरंजिनी (१८७१) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहामुळे. याच्यावर इंग्रज कवी बायरनचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या संग्रहातील अनेक कविता पूर्वी १८६६–६८ या काळात एज्युकेशन गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. पलासीर युद्ध (१८७५) हे त्यांचे सर्वांत लोकप्रिय काव्य. प्लासीच्या लढाईचे वर्णन करणाऱ्या या दीर्घकाव्याचे एकूण पाच सर्ग असून त्याची कडवी इंग्रज कवी स्पेन्सरच्या धाटणीची आहेत. उत्स्फूर्त भाषा, समर्थ भावाविष्कार आणि देशभक्ती ह्यांमुळे या काव्याचे आवाहन त्यांच्या समकालीनांपर्यंत जसे पोहोचले, तसेच ते आधुनिक वाचकांनाही स्पर्शून जाते. रंगमती (१८८०) या त्यांच्या अद्‌भुतरम्य काव्यावर स्कॉटच्या काव्याची छाप आहे. रैवतक (१८८६), कुरुक्षेत्र (१८९३) आणि प्रभास (१८९६) हे त्यांचे त्रिखंडात्मक महाकाव्यही ख्याती पावले. ह्या काव्यात त्यांनी श्रीकृष्णाला नायकत्व दिलेले आहे. त्यात आर्य–अनार्यांमधील वैरभावाला आळा घालून त्यांच्यात एकी निर्माण करणारा महानायक, अशी कृष्णाची प्रतिमा रंगवली आहे. पौराणिक कथानकाची बाह्य चौकट असलेल्या या महाकाव्यात नीतिवाद व ब्रह्मज्ञान यांचेही आध्यात्मिक निरूपण आहे. भारतीय पुराणकथांचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या आधुनिक दृष्टिकोणातून कृष्णचरित्रातील विकासाचे तीन टप्पे या त्रिस्थळ-वर्णनांतून कवीने दर्शवले आहेत. ह्यांखेरीज भारत उच्छ्‌वास (१८७५), क्लीओपात्रा (१८७७), अमिताभ (१८९६), अमृताभ (१९०९) अशा त्यांच्या काही काव्यकृती उल्लेखनीय आहेत. अमृताभ हे काव्य गौतम बुद्धावर रचले आहे. प्रबासेर पत्र (१८९२) हे त्यांचे प्रवासवृत्त. भानुमती (१९००) ही गद्यपद्यमिश्र शैलीतील प्रणयरम्य साहित्यकृती संस्कृत चंपूकाव्याच्या धर्तीवर आहे. आमार जीवन (५ खंड १९०८–१४) ह्या नावाने त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. जिव्हाळ्याने वाचकांशी संवाद साधणारी भाषाशैली, काहीही हातचे राखून न ठेवता केलेले आपल्या जीवनातील घटनांचे प्रांजळ निवेदन, ही ह्या आत्मचरित्राची वैशिष्ट्ये होत. एकोणिसाव्या शतकातील बंगालमधील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींबद्दलही त्यांनी ह्या आत्मचरित्रात लिहिले आहे. आधुनिक बंगाली भावकवितेचा आरंभ आपल्यापासून झाला, असे ते म्हणत. देशभक्ती आणि वैष्णव पंथाबद्दलची निष्ठा ह्यांनी त्यांची कविता प्रभावित झालेली आहे. त्यांनी काही उल्लेखनीय अनुवादही केले : मार्कंडेय चंडी (१८८९), श्रीमद्‌भगवद्‌गीता (१८८९) हे संस्कृतमधून बंगालीत केलेले अनुवाद, तसेच ख्रिस्त (१८९१) हे सेंट मॅथ्यूच्या कथनावरून काव्यरूपात केलेले भाषांतर.

नवीनचंद्रांच्या कवितेतून बंगाली भाषेने एक सहज, स्वाभाविक रूप धारण केले. मायकेल मधुसूदन दत्त यांच्या नंतरच्या पिढीतील परिवर्तन युगातील एक महत्त्वाचे कवी म्हणून त्यांचे बंगाली साहित्यात स्थान आहे.

कुलकर्णी, अ. र.