भगंदर : गुदद्वाराशी संबंधित आणि एक मुख त्यासभोवतालच्या त्वचेवर उघडणाऱ्या व दुसरे मुख गुदमार्ग किंवा गुदाशयात उघडणाऱ्या द्विमुखी ⇨ नाडीव्रणाला ‘भगंदर’ म्हणतात. नलिकेसारखा असलेला हा मार्ग आतील बाजूवर कणोतकाने (नवीनच तयार झालेल्या व तंतुमय ऊतकाने ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह) आच्छादिलेला असतो. गुदद्वाराभोवती झालेल्या गळूची परिणती अनेक वेळा भगंदरास कारणीभूत असते. दुर्लक्षित गळूतील पू पृष्ठभागाकडे येण्याकरिता जो मार्ग शोधतो त्याचेच भगंदर तयार होते.

आ.१. भगंदर प्रकार : (१) अधस्त्वचीय, (२) अधःश्लेष्म, (३)गुदमार्ग निम्न-स्तरीय, (४) गुदमार्ग उच्च-स्तरीय, (५) श्रोणि-गुदाशय.

प्रकार : भगंदराच्या गुदमार्गात किंवा गुदाशयात उघडणाऱ्या अंतःस्थ छिद्राच्या (मुखाच्या) स्थानावरून भगंदराचे दोन प्रमुख प्रकार ओळखले जातात : (१) गुद-गुदाशय वलयाच्या वर (गुदमार्ग व गुदाशय यांच्या दरम्यान असलेल्या स्नायूंच्या जाडसर भागाच्या वर) उघडणारे आणि (२) या वलयाच्या खाली उघडणारे. हे वलय गुदद्वारातून बोट घातल्यास जाणवते. पहिल्या प्रकाराला उच्चस्तरीय आणि दुसऱ्याला निम्नस्तरीय भगंदर म्हणतात. या प्रत्येक प्रकाराचे उपप्रकार असुन स्थलपरत्वे या उपप्रकारांना पुढील नावे देण्यात आली आहेत.

(१) उच्चस्तरीय भगंदर प्रकारः (अ) आंतर-परिसंकोचीः अंतःस्थ छिद्र अंतःस्थ परिसंकोची (संकोच पावून गुदद्वार बंद करणारा वलयाकार स्नायू) व बाह्य परिसंकोची यांच्या दरम्यान असणे, (आ) ऊर्ध्व परिसंकोचीः छिद्र अंतःस्थ परिसंकोचीच्या वर असणे, (इ) परिसंकोची भेदीः भगंदरमार्ग परिसंकोचीचा भेद करुन जाणे.

(२) निम्न-स्तरीय भगंदर प्रकारः (अ) अधस्त्वचीयः त्वचेच्या खाली असणारे, (आ) अधःश्लेष्मः गुदमार्गातील श्लेष्मकलेखालील (बुळबुळीत अस्तराखालील), (इ) गुदमार्ग निम्नस्तरीयः गुदमार्गात पण खालच्या पातळीवर, (ई) गुदमार्ग उच्चस्तरीयः गुदमार्गात परंतु वरच्या पातळीवर, (उ) श्रोणी-गुदाशयः (धडाच्या शेवटी हाडांनी वेष्टित असलेल्या भागाला श्रोणी म्हणतात). अंतःस्थ छिद्र गुदाशयात उघडणारे.

भगंदराचे काही विशिष्ट प्रकार खाली दिले आहेत.

आ. २. गुदविदर व रक्षक मुळव्याध : (१) गुदविदर, (२) रक्षक मुळव्याध, (३) गुदविदराच्या तळातील वर्तुळाकार स्नायुतंतूंचा भाग, (४) गुदमार्ग.

गुदविरासहित भगंदर : या प्रकारात भगंदराबरोबरच गुदमार्गात खालच्या भागात लांबट आकाराचा व्रण असतो. या व्रणाला ‘गुदविदर’ म्हणतात आणि तो पश्चभागाच्या मध्यरेषेत असतो. भगंदराचे बाह्य छिद्रही पश्चभागात (गुदद्वाराच्या वाह्यत्वचा क्षेत्राच्या पश्चभागात) असते. व्रणाच्या खालच्या टोकावर लहानसा त्वचेचा तुकडा असतो व त्याला ‘रक्षक मूळव्याध’ म्हणतात.

  

क्षयरोगजन्य भगंदर : फुप्फुसाचा क्षयरोग असलेल्या रोग्यांपैकी ३०% रोग्यांमध्ये गुदाशयात क्षयरोगाचे उग्रसूक्ष्म जंतू असतात आणि एकूण भगंदराच्या रोग्यांपैकी २ते३% भगंदरे क्षयरोगजन्य असतात. भगंदराच्या सभोवतोली कठीणीकरण झालेले नसल्यास, बाह्य छिद्राची कडा त्वचा-सपाट असल्यास, आजूबाजूच्या त्वचेच्या रंगात बदल झाला असल्यास आणि छिद्रातून पातळ पाण्यासारखा स्त्राव येत असल्यास ते भगंदर क्षयरोगजन्य म्हणून ओळखता येते. याशिवाय फुप्फुस तपासणी आणि ऊतकाची प्रयोग शालेय तपासणी निदानास उपयुक्त असतात.

बहुछिद्र भगंदर : एकापेक्षा अधिक बाह्य छिद्रे असणाऱ्या भगंदराला बहुछिद्र भगंदर किंवा झारीसारखे भगंदर म्हणतात. बाह्य छिद्रे कितीही असली, तरी अंतःस्थ छिद्र नेहमी एकच असते. बहुछिद्र भगंदर निरनिराळया कारणांमुळे उदभवते. क्रॉन रोग (बी. बी. क्रॉन या अमेरिकन वैद्यांच्या नावावरुन ओळखण्यात येणारा रोग) अथवा शेषांत्र शोध (जागजागी क्षतचिन्हे तयार होणारा लहान आतड्याच्या शेवटच्या भागातील दाहयुक्त सूज येणारा रोग), ⇨ लसीका कणार्बुदी वंक्षण रोग [जांघेतील लसीका ग्रंथींचा व्हायरसजन्य गुप्तरोग ⟶लसिका तंत्र] इ. विकृतीत बहुछिद्र भगंदर उदभवते.

कर्कजन्य भगंदर : गुदाशयाच्या कर्करोगात गुदद्वाराभोवती बाह्य छिद्र असणारे भगंदर उत्पन्न होते व या छिद्रातून श्लेष्माभ (बुळबुळीत द्रव्यासारखा) स्त्राव वाहत असतो. पुष्कळ वेळा चुकीच्या निदानामुळे मूळ रोगाकडून दुर्लक्ष होऊन फक्त भगंदरावरच अयशस्वी उपचार केले जातात.

आ. ३. नालाकृती भगंदर (बाह्य दर्शन) : (१) वृषण कोश, (पुंजनन ग्रंथिकोश मुष्क), (२) गुदद्वार, (३) भगंदराची उजव्या व डाव्या बाजूंची छीद्रे.

नालाकृती भगंदर : गुदमार्गाच्या दोन्ही बाजूंस आसनास्थी व गुदमार्ग यांच्या दरम्यान संयोजी (जोडणारा) ऊतक आणि वसा (स्निग्ध पदार्थ) यांनी भरलेली एकेक खात(खाच)अथवा गुहा असते. तिला आसनास्थायी-गुदाशय खात म्हणतात. पश्चभागी डावी व उजवी खात एकमेकींशी बाह्य परिसंकोचीच्या वर जोडलेल्या असतात. कधी कधी परिसंकोची भगंदरातील स्त्राव प्रथम एका बाजूच्या खातेमध्ये व तेथून दुसऱ्या बाजूच्या खातेत पसरतो. अशा वेळी गुदद्वारा बाहेरील त्वचेवर डाव्या बाजूस एक व उजव्या बाजूस एक अशी दोन बाह्य छिद्रे तयार होतात आणि अशा भगंदराला नालाकृती भगंदर म्हणतात.

भगंदर कोणत्या प्रकारचे आहे हे ठरविणे जरूरीचे असते कारण त्यावर शस्त्रक्रियेची मर्यादा अवलंबून असते. निम्न-स्तरीय भगंदरावरील शस्त्रक्रियेत गुद-परिसंकोचीचे स्नायू कापले जाण्याचा धोका नसतो.याउलट उच्च-स्तरीय भगंदरावरील शस्त्रक्रियेत ते कापले जाऊन कायमच्या मल-असंयमाचा (मलोत्सर्जन क्रियेवर ताबा न राहण्याचा) धोका असतो.

लक्षणे : गुदद्वाराभोवताली असणाऱ्या छिद्रातून रक्त वा पू-मिश्रित स्त्राव वाहत राहणे हे भगंदराचे प्रमुख लक्षण असते. या स्त्रावामुळे जवळच्या त्वचेत त्वचाशोथ (त्वचेची दाहक सूज) होऊन खाज सुटते. भगंदर ही विकृती चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारात मोडत असल्यामुळे रोग्यास काही महिने किंवा वर्षे अस्वस्थता जाणवत असते. छिद्रातून स्त्रावाचा निचरा नीट चालू असेपर्यंत वेदना जाणवत नाहीत परंतु छिद्र अतिशय बारीक असल्यास किंवा बंद पडल्यास स्त्रावाच्या संचयाने ठणका होऊ लागतो. बाह्य छिद्र पुष्कळ वेळा गुदद्वाराभोवती सु.३.७५ सेंमी त्रिज्येच्या वर्तुळात असते. हे छिद्र व आत जाणारा नलिकेसारखा मार्ग कणोतकाने आच्छादिलेला असतो.

आ. ४. गुडसाल नियम : (१) गुदद्वार , (२) अग्र, (३) पश्च.

गुदद्वाराच्या सभोवतालच्या क्षेत्राचे आडव्या कल्पित रेषेने अग्र व पश्च असे दोन भाग पाडल्यास बाह्य छिद्र जर अग्र भागात असेल, तर भगंदरमार्ग सरळ असतो आणि छिद्र जर पश्च भागात असेल,तर भगंदरमार्ग वेडावाकडा किंवा नालाकृती असण्याचा अधिक संभव असतो.या सर्वसाधारण अनुमानाला डी.एच्. गुडसाल या इंग्रज शस्त्रक्रियाविशारदांच्या नावावरुन ‘गुडसाल नियम’ म्हणतात.

तपासणी व निदान : गुदद्वारात बोट घालून तपासणी केल्यास छोटयाशा गाठीसारख्या भागी अंतःस्थ छिद्र बोटास लागते. गुददर्शनीतून (गुदमार्ग व गुदाशयाचा आतील भाग बघता येणाऱ्या उपकरणातून) बघितल्यास हे अंतःस्थ छिद्र दिसू शकते.एकेकाळी एषणी (बोथट टोक असलेला धातूचा तारेसारखा तुकडा) बाह्य छिद्रातून आत सरकावून तपासणी करणे आवश्यक समजले जाई.वेदना होणे आणि विशेष काळजी न घेतल्यास एषणीमुळे नवा मार्ग तयार होण्याचा व संसर्ग फैलावण्याचा धोकाअसल्यामुळे एषणी फक्त शस्त्रक्रियेपूर्वीच काळजीपूर्वक वापरतात.

आ. ५. गुददर्शनी (प्रकाश योजनेसहित) : (१) मूठ, (२) प्रकाशयोजना, (३) गुददर्शनी गुदद्वारातून शिरकविल्यानंतर काढून घेण्याचा भाग.

छातीची क्ष-किरण तपासणी,स्त्रावाची प्रयोगशालेय तपासणी व जरूर तेथे जीवोतक परीक्षा (जिवंत शरिरातून घेतलेल्या ऊतकाची परीक्षा) निदानास उपयुक्त असतात.

उपचार : पाचशे वर्षांपूर्वी जॉन ऑफ आर्डने नावाच्या इंग्रज शस्त्रक्रियाविशारदांनी योजिलेला, भगंदरमार्ग कापून उघडा करण्याचा व त्याद्वारे स्त्रावसंचय होऊ न देण्याचा उपचार आजही तेवढाच उपयुक्त आहे. आधुनिक काळात मात्र शस्त्रक्रियेपूर्वी बस्तीचा उपयोग करून गुदमार्ग व गुदाशय शक्य तेवढे मलविरहीत आणि निर्जंतुक करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. कधीकधी शस्त्रक्रिया टप्याटप्याने करावी लागते. स्थानीय उपचारापूर्वी मूळ कारणांचा विचार करावा लागतो. उदा.क्षयरोगजन्य भगंदरावर क्षयरोगावरील उपचार उपयुक्त असतात.अंतस्थ गुद परिसंकोची कधीकधी कापावा लागतो परंतु त्यात मल-असंयमाचा धोका नसतो.

संदर्भः 1.Lal,Sangham and others,Ed.,Textbook of Surgery,New Delhi,1975.

           2.Rains,A.J.H.Ritchie,H.D. Bailey and Love’s Short pratice of surgery, London, 1977.

           3.Sabiston, D.C.Ed., Davis-Christopher Textbook of Surgery, Tokyo, 1972.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य.त्र्यं.