कातरा : सिट्टॅसिडी पक्षिकुलातला हा एक पक्षी असल्यामुळे तो एका जातीचा पोपटच आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही. त्याची पुष्कळशी लक्षणे थेट पोपटासारखी आहेत. याचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हर्नॅलिस हे आहे.

कातरा

हिमालयाच्या पूर्व भागात सिक्कीमपासून आसामपर्यंत, पश्चिम भारतात मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत, निलगिरी आणि त्याच्या लगतचे डोंगर आणि पूर्वकिनाऱ्यावरील विशाखापटनमच्या भोवतालचा प्रदेश यांत हा पक्षी आढळतो. डोंगराळ भागात १,८३० मी. उंचीपर्यंत हा दिसून येतो. सर्व प्रकारची अरण्ये, लहान झाडे आणि कळक यांची जंगले, फळझाडांच्या बागा आणि मळे यांत हा राहतो.

हा पक्षी साधारणपणे चिमणीएवढा असतो. शरीराचा रंग गवती हिरवा पण पंख व शेपटी गडद हिरव्या रंगाची असते कंबर गडद किरमिजी रंगाची शेपटी अतिशय आखूड नराच्या गळ्यावर लहान निळा डाग असतो पण मादीच्या गळ्यावर नसतो डोळे पिवळसर पांढरे चोच लाल व वाकडी पाय पिवळसर किंवा फिकट नारिंगी. हे एकेकटे किंवा यांचे लहान थवे असतात. हा वृक्षवासी पक्षी आहे. दाट पाने असलेल्या व फुलाफळांनी बहरलेल्या वृक्षांवर हा हटकून असतो, पण लहान आकार व हिरवा रंग यांमुळे तो दिसत नाही एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उडून जात असताना मात्र दिसतो.

वड, पिंपळ आणि इतर झाडांची फळे हे याचे भक्ष्य होय. फुलातला मधही हा शोषून घेतो. पांगाऱ्याच्या फुलातला मध याला विशेष आवडतो. ताडी गोळा करण्याकरिता ताडाच्या झाडाला टांगलेल्या मडक्यातील ताडी हे पितात व झिंगतात. अशा स्थितीत त्यांना सहज पकडता येते. झाडाच्या पानांमधून हिंडत असताना किंवा उडत असताना ची-चू-चू असा एक प्रकारचा गोड आवाज ते काढीत असतात. यांची रात्री झोपी जाण्याची पध्दत फारच मजेदार असते. वटवाघुळाप्रमाणे झाडाच्या एखाद्या फांदीला पायांनी उलटे टांगून घेऊन हे झोपतात.

प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासून एप्रिलपर्यंत असतो. झाडाच्या बुंध्यातली एखादी पोकळी हे त्यांचे घरटे. यात मादी तीन पांढरी अंडी घालते.

कर्वे, अ.नी.