हेंप, रोझेल : (रक्तांबलिका, भेंडी लॅ. हिबिस्कस सब्डरिफा प्रकार-अल्टिसिमा कुल-माल्व्हेसी) . ही एक वर्षायू ओषधी लाल अंबाडीचा रोझेल हेंप (हिबिस्कस सब्डरिफा) : पाने, फूल व कळ्यांसहित फांदी.प्रकार असून तिची उंची ३–५ मी. असते. तिचे मूलस्थान पश्चिम आफ्रिका असून फिलिपीन्स, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, उत्तर व दक्षिण अमेरिका ह्या प्रदेशांत तिची विस्तृत प्रमाणावर लागवड करतात. हि. सब्डरिफा अल्टिसीमा ही जाती धाग्यासाठी उपयुक्त असून आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. भारतात ताग (ज्यूट) वाढत नाही अशा ठिकाणी तिची लागवड केली जाते. तिचे खोड सु. ४.८ मी. उंच, कमकुवत, तुरळक शाखा किंवा शाखाहीन, परंतु जोमदार असते. खोडापासून मिळणारा धागा साधारणतः तागासारखा, परंतु अधिक मजबूत, १–१.५ मी. लांब, चमकदार व रुपेरी-पांढरा असून तागाशी मिसळून वापरता येतो. कळ्या आल्यावर लागलीच पीक काढण्यायोग्य होते. धाग्याचा उपयोग पोती, दोरखंड, दोर, मासेमारीची जाळी इत्यादींकरिता करून उरलेला भाग सरपणाकरिता वापरतात. 

 

हि. सब्डरिफा सब्डरिफा या जातीची लागवड तिच्या उपयुक्त फुलांसाठी करतात. पाने गडद हिरवी, ३–५ खंडी, ३–१५ सेंमी. लांब खोड, फांद्या व पानांचे देठ लालसर-जांभळट रंगाची असतात. फुले ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतात. ती द्विलिंगी, पिवळी व मध्यभागी गडद लाल रंगाचा ठिपका असलेली, ८–१० सेंमी. व्यासाची पुष्पबंधाक्ष आखूड संदल (संवर्त) मांसल, लाल, २.५ सेंमी. व्यासाचा, धागायुक्तव खाद्य असतो. पक्व फळे लाल रंगाची व मांसल असतात. फळ पक्व होण्यासाठी सु. ६ महिने लागतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ माल्व्हेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. 

 

रोझेल हेंप या वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त आहेत. विशेषतः ताजा लाल संवर्त खाद्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा उपयोग सरबत, जाम, जेली, मुरंबा, वाइन, सिरप, पुडिंग, केक, आइस्क्रीम, चटणी व पेयांमध्ये करतात. विशेषतः चहा (हर्बल टी) व मसाल्यामध्ये वाळलेल्या संवर्ताचा वापर स्वादासाठी करतात. संवर्तामध्ये पेक्टीन असते. ताज्या संवर्तामध्ये रिबोफ्लाविन, ॲस्कॉर्बिक अम्ल, निॲसीन, कॅरोटीन, कॅल्शियम व लोह हे घटक असतात. औषधी उपयोगामध्ये पाने व संवर्ताचा काढा मूत्रल, सौम्य विरेचक, ज्वरनाशक, आकडीरोधक व कृमिनाशक आहे, तसेच कर्करोग व उच्च रक्तदाबावर उपयुक्त आहे. कोवळी पाने व कोवळ्या फांद्या यांचा उपयोग सॅलडमध्ये करतात. बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. त्या भाजून बारीक केलेली पूड सॉस व सूप यांमध्ये वापरतात. तसेच ती कॉफीमध्ये एक घटकद्रव्य म्हणून वापरतात. तेलयुक्त बिया आफ्रिकेत खातात. कोवळी मुळे खाद्य आहेत. 

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.