रुग्णालय : रुग्णाच्या रोगाचे निदान करणे आणि त्यावर वैद्यकीय व शस्त्रक्रियात्मक उपचार करणे यांसाठी उभारलेली, योग्य कर्मचारी वर्गाची व साधनसामग्रीची तरतूद असलेली संस्था म्हणजे रुग्णालय होय. रुग्णालयात उपचार काळात काही रुग्णांची निवासाची सोय करणे आवश्यक असते. आरोग्य तपासणी व प्रसूती यांसारख्या आरोग्य व शारीरिक स्वास्थ टिकविण्याशी संबंधित असलेल्या बाबींचीही रुग्णालयात व्यवस्था असावी लागते. जेथे रुग्ण प्रत्येक भेटीनंतर घरी परत जातो असे चिकित्सालय वा दवाखाना यांच्यात व रुग्णालयात फरक करणे जरूरीचे आहे. त्याचप्रमाणे वृद्ध, दुखण्यातून उठलेले रुग्ण, गरीब व्यक्ती यांच्याकरिता चालविण्यात येणारा व वैद्यकीय सेवा थोडी वा मुळीच पुरविली जात नाही असा आश्रम आणि रुग्णालय यांत भेद करणे आवश्यक आहे. रुग्णालयाचा इंग्रजी प्रतिशब्द ‘हॉस्पिटल’ हा लॅटिन भाषेतील hospitium (याचा अर्थ जिथे पाहुण्यांचे वा अतिथींचे स्वागत होते अशी जागा) या शब्दावरून व hospitalis या विशेषणावरून आलेला आहे. हॉस्पिस, हॉपिताल, हॉटेल, स्पिटल व होस्टेल ही संबंधित शब्दरूपे आहेत. आधुनिक इंग्रजी भाषेत हॉस्पिटल हा शब्द ‘घर’ (होम) असे सूचित करण्यावर भर देण्यात येतो. हॉटेल हा शब्द पथिकाश्रम वा खानावळ या अर्थआने वापरला जातो. फ्रेंच भाषेतील ‘हॉतेल द्यू’ ही संज्ञा मात्र सार्वजनिक रुग्णालय या अर्थाने वापरली जाते. 

 

अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपावेतो रुग्णालय ही सामान्यतः कारागृहापेक्षा थोडीशी बरी अशी जागा होती आणि कित्येकांना मृत्युगृहाइतकी त्याची भीती वाटत असे. विसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास अतिप्रगत वैद्यकीय तंत्रे वापरून रुग्णांची शक्य तेवढी उत्तम परिचर्या करणारी रुग्णालये ही जटिल संस्था बनली आहेत. बरीचशी रुग्णालये आता तिहेरी कार्य करतात : (१) रुग्णांचे संगोपन करण्यात वैद्यकीय व्यवसायाला मदत व पाठबळ देणे (२) आरोग्य सेवा व्यवसायांत प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे (३) रोगाचे कारण व त्यावरील उपाय शोधण्यासाठी वैद्यकीय संशोधनाच्या सुविधा पुरविणे. अशा प्रकारे वैद्यकीय संगोपन, अध्यापन व संशोधन ही तीन कार्ये रुग्णालयाची मूलभूत तत्त्वे बनलेली आहेत. 

इतिहास : रुग्णाची काळजी घेणे ही समाजजीवनातील एक मूलभूत गरज आहे सर्व समाजांत आजारपणाला तोंड देण्याकरिता काही ना काही व्यवस्था अस्तित्वात असल्याचे आढळते. ही मूलभूत गरज असल्याचे आढळते. ही मूलभूत गरज असल्याचे तिचा लोकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाशी नेहमीच जवळचा संबंध जोडलेला गेलेला आहे. मानवाने जेव्हा प्रथम समाजव्यवस्था स्थापन केली तेव्हाच रुग्णांच्या एकत्रीकरणाकरिता व त्यांची काळजी घेण्यासाठी व्यवस्था असलेल्या जागा उभारण्यात आल्याचा काही पुरावा अस्तित्वात आहे. वैद्यकीय उपचारांचा नेहमी धार्मिक सेवेशी संबंध जोडण्यात आलेला आहे. प्रारंभीचे धर्मगुरू वैद्याचे वा औषधे देणाऱ्या माणसाचेही काम करीत असत. इ.स.पू. ४,००० इतक्या जुन्या काळात ख्रिश्चनपूर्व धर्मात काही देवदेवतांचा रोगमुक्तीशी संबंध असल्याचे मानले जात होते. सॅटर्न, ॲस्क्लेपिअस वा हायजिया या देवतांची मंदिरे वैद्यकीय शाळा व उपचाराखलील किंवा निरीक्षणाखालील रुग्णांसाठी विश्रांतिस्थाने म्हणून वापरली जात. ग्रीस, ईजिप्त, बॉबिलोनिया व भारतातही अशी मंदिरे अस्तित्वात होती, असे ऐतिहासिक नोंदीवरून दिसून येते. 

 

देशव्यापी रुग्णालयांची व्यवस्था असलेला भारत हा पहिलाच देश असावा इ.स. ४०२ च्या सुमारास फाहियान या चिनी प्रवाशांनी भारताला भेट दिली व येथे अनेक ठिकाणी रुग्णालये आढळल्याचे त्यांनी नमूद केले आहे. श्रीलंकेतून इ. स. पू. ४३२ च्या सुमारास रुग्णालये होती असे निश्चितपणे माहित आहे व त्याहीपूर्वी बुद्ध काळात भारतात रुग्णालये होती असे निश्चितपणे माहित आहे व त्याहीपूर्वी बुद्ध काळात भारतात रुग्णालये स्थापन करण्यात आलेली होती. सम्राट अशोक (इ.स. पू. तिसरे शतक) यांनी बांधलेल्या १८ रुग्णालयांत आधुनिक रुग्णालयांसारखी काही लक्षणे आढळतात. या रुग्णालयात आधुनिक रुग्णालयांसारखी काही लक्षणे आढळतात. या रुग्णालयात स्वच्छतेवर भर देण्यात येई. रुग्णांवर दयाबुद्धीने उपचार करण्यात येत व आहार चिकित्सा प्रचारात होती. 

 

ख्रिस्ती धर्माच्या आरंभामुळे रुग्णालयांच्या स्थापनेस मोठी चालना मिळाली व रुग्णालये ही चर्च संघटनेची अभिन्न भाग बनली. इ. स. ३३५ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटीन यांनी काढलेल्या हुकूमनाम्यानुसार रोम, कॉन्स्टँटिनोपल, एफेसस व रोमन साम्राज्यातील इतर भागांत रुग्णालये विकसित करण्यात आली. इ.स. ३६९ मध्ये सीझारीआ येथे सेंट बेसिल यांनी रुग्णालय स्थापन केले. रोममध्ये पश्चिम युरोपातील पहिल्या सार्वजनिक धर्मादाय रुग्णालयाची स्थापना फॅबिओला या ख्रिश्चन स्त्रीने चौथ्या शतकात केली. या शतकापावेतो रोमन साम्राज्यातील ख्रिश्चन चर्च सदस्यांनी कुष्ठ रोगी, अपंग, अंध आणि गरीब यांच्याशी रुग्णालये स्थापन केली होती. फ्रान्समधील लीआँ येथील हॉतेल द्यू ५४२ साली व पॅरिस येथील हॉतेल द्यू ६६० मध्ये सुरू झाले. या रुग्णालयांत रुग्णांच्या शारीरिक व्याधी बऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या आत्म्याच्या कल्याणाकडे अधिक लक्ष दिले जाई. मठवासी त्यांच्यातील आजाऱ्याची ज्या प्रकारे काळजी घेत तो अनभिज्ञ लोकांपुढे आदर्श निर्माण झाला. मठांमध्ये रुग्णशाळा असे व तेथे रुग्णांना उपचारासाठी नेण्यात येई. मठात औषधालय व बऱ्याचदा औषधी वनस्पितयुक्त बाग असे. मठांनी तेथील आजारी मठवासीयांखेरीज यात्रेकरू व इतर प्रवाशांसाठीही आपले दरवाजे खुले ठेवले होते. आठव्या ते बाराव्या शतकापर्यंत या मठ संस्थाच यूरोपातील रुग्णालीय सेवा पुरविणाऱ्या एकमेव संस्था होत्या. 

रुग्णांकरिता सामाजिक मदतीची कल्पना मध्ययुगीन काळात उत्तम प्रकारे रुजली होती. पाश्चिमात्य ख्रिश्चन देशांतून ही कल्पना जेवढी प्रबळ होती तेवढीच पौर्वात्य मुसलमानी देशांतही होती. स्पेन, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया या भागांत अरबी साम्राच्यातील ३४ रुग्णालये होती. त्यांपैकी दमास्कम (११६०) व कैरो (१२७६) येथील रुग्णालये सर्वांत मोठी व उत्तम व्यवस्था असलेली होती. कैरो येथील रुग्णालये सर्वांत मोठी व उत्तम व्यवस्था असलेली होती. कैरो येथील रुग्णालयात ज्वर रुग्ण, जखमी रुग्ण, नेत्ररोगाचे रुग्ण यांच्याकरिता व महत्त्वाच्या रोगांकरिता स्वतंत्र विभाग होते. तेथे पुरुष व स्त्री परिचारिकाही काम करीत. यांशिवाय व्याख्यानासाठी खोल्या, मोठे ग्रंथालय, स्वयंपाकगृहे, अनाथ अर्भकगृह व प्रार्थनागृह यांचीही व्यवस्था होती. ही बहुतेक रुग्णालये ख्रिश्चन धर्मीयांनी सुरू केलेली होती. मुसलमानांनी तो तो प्रदेश पादाक्रांत केल्यामुळे तो ताब्यात घेऊन नंतर त्यात अधिक सुधारणा केल्या. 

 

मध्ययुगात रुग्णालयांच्या स्थापनेतही धार्मिक प्रभावाचे वर्चस्व चालूच राहिले. अकरव्या शतकाच्या अखेरीस सुरू झालेल्या धर्मयुद्धाच्या (क्रूसेड्‌सच्या) काळात रुग्णालयांच्या स्थापनेचा वेग वाढला. धर्मयोद्धयांचा पराभव होण्यास शत्रूपेक्षा साथीचे व इतर रोग अधिक कारणीभूत ठरले. वाहतुकीच्या मार्गावर लष्करी रुग्णालये स्थापन झाली. सेंट जॉन पंथाच्या नाइटस हॉस्पिटॅलर्स या गटाने पवित्र भूमीत (पॅलेस्टाइनमध्ये) २,००० रुग्णांची सोय असलेले रुग्णालय स्थापन केले. मध्ययुगीन काळात वैद्य व शस्त्रक्रियाविशारद यांचे कार्यक्षेत्र रुग्णालयांपासून अलगच होते ११३३ मध्ये लंडन येथे सेंट बार्‌थॉलोम्यू रुग्णालय स्थापन झाले. त्या वेळीही वैद्य, औषधे तयार करून विकणारे व शस्त्रक्रियाविशारद आपापल्या घरी वा कार्यालयात आपला व्यवसाय करीत. अगदी अनाथ व मरणोन्मुख रुग्णालयाचा आश्रय घेत. प्रबोधन काळात (सोळाव्या-सतराव्या शतकांत) रोगमुक्तीतील वैज्ञानिक बाजूवर भर देण्यात आला. धर्मसुधारणेच्या काळात (सोळाव्या शतकात) आठव्या हेन्रींनी लंडनच्या सेंट बार्‌थॉलोम्यू रुग्णालयाला वर्षांसन नेमून दिल्यावर रुग्णालयांना धर्मातीत आधार मिळण्यास प्रारंभ झाला. मध्ययुगीन काळात बहुतेक सर्व रुग्णालये मठांशी संलग्न होती व फारच थोडी शहरवासियांनी बांधलेली होती. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस लंडन वगळता इंग्लंडमध्ये इतरत्र एकही रुग्णालय नव्हते. १७१९ मध्ये काही शहरवासी व वैद्य यांनी मिळून धर्मादाय संस्था स्थापन करून वेस्टमिन्स्टर रुग्णालयाचा प्रारंभ केला. त्यानंतर गाय (१७२४), सेंट जॉर्ज (१७३३), लंडन (१७४०) वगैरे लंडनमधील बहुतेक मोठी सर्वसाधारण रुग्णालये १७६० पर्यंत स्थापन झाली. अठराव्या शतकात मिडलसेक्स रुग्णालय देवीच्या रुग्णांसाठी, लॉक रुग्णालय गुप्तरोगांसाठी, सेंट ल्युक रुग्णालय मानसिक रोगांसाठी विशेष रुग्णालये स्थापन झाली. या नव्या विचारसरणीचा ब्रिटनमधील इतर भागांतही प्रसार झाला. अठरव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटनमधील बहुतेक लहानमोठ्या शहरांत रुग्णालये निघालेली होती. ब्रिटनबरोबर यूरोपातही रुग्णालयांची वाढ झाली. १८३० मध्ये एकट्या पॅरिसमध्ये ३० रुग्णालये होती व त्यांत २०,००० रुग्णशय्या होत्या. हॉतेल द्यू या सर्वांत जुन्या रुग्णालयात १,००० रुग्णशय्या होत्या. जर्मन भाषिक प्रदेशांतही रुग्णालयांची संख्या वाढली. यूरोपातील खंडीय भागातील बहुतेक रुग्णालये सरकारी मालकीची होती.  


अठराव्या शतकातील यूरोपातील वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिबिंब रुग्णालयातील रुग्णांच्या उपचरांतही पदले. उदा., ब्रिटनमध्ये देवी प्रतिबंधक लस टोचण्यास (१७९६) व फ्रान्समध्ये मनोरुग्णांच्या हातापायातील बेड्या काढून टाकल्यास (१७९३) प्रारंभ झाला. आधुनिक कालातील रुग्णालयांची विलक्षण वाढ व जनतेने केलेला त्यांचा स्वीकार यांचा एकोणिसाव्या शतकातील ⇨फ्लॉरेन्स नाइटिंगल, ⇨लूई पाश्चर  व ⇨जोसेफ लिस्टर या व्यक्तींशी अतुट संबंध आहे. नाइटिंगेल यांनी रुग्णपरिचर्या संघटित केली व तिला एक प्रतिष्ठित व्यवसायाचा दर्जा मिळवून दिला. आधुनिक रुग्णलयांतील रुग्णपरिचर्या ही त्यांच्या प्रयत्नांचे साक्षात फळच आहे. आता ज्ञात असलेली शस्त्रक्रियाविद्या ही पाश्चर यांच्या जंतू विषयक सिद्धांत व लिस्टर यांचे त्यासंबंधीचे अनुप्रयोग यांच्याविना अशक्यच ठरली असती. एकोणिसाव्या शतकातील शुद्धिहरणासंबंधीच्या प्रगतीमुळेच दीर्घ व अधिक अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य होऊ लागले. 

उत्तर अमेरिकेतील जीझस ऑफ नाझरेथ रुग्णालय हे पहिले रुग्णालय मेक्सिकोत १५२४ मध्ये एर्नादो कोर्तेझ यांनी स्थापन केले व अमेरिकेतील अखंड रुग्ण सेवा करणारी ती सर्वांत जुनी संस्था आहे. फ्रेंचांनी कॅनडात १६३९ मध्ये क्वीवेक येथे एक रुग्णालय स्थापन केले. हे रुग्णालय मूळ स्थानी आता नसले, तरी अद्यापही अन्यत्र काम करीत आहे. १६४४ मध्ये झां मांस या फ्रेंच उमराव स्त्रीने माँट्रिऑल येथे एक रुग्णालय बांधले व त्यातून हॉतेल द्यू द सेंट जोझेफ या रुग्णालयाची सुरुवात झाली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील पहिले रुग्णालय १६६३ मध्ये मॅनहॅटन बेटावर सैनिकांकरिता स्थापना करण्यात आले. प्रारंभीची रुग्णालये मुख्यत्वे भिक्षागृहे होती. त्यांपैकी क्वेकर पंथाने १७१३ मध्ये स्थापना केलेल्या फिलाडेल्फिया भिक्षागृहाचे प्रथम १७३२ मध्ये मनोरुग्णांच्या उपचारासाठी व पुढे फिलाडेल्फिया सर्वसाधारण रुग्णालयात परिवर्तन झाले. १७५१ मध्ये स्थापन झालेले फिलाडेल्फिया येथील पेनसिल्व्हेनिया रुग्णालय हे फक्त आजारी व जखमी रुग्णांकरिता उभारलेले संयुक्त संस्थांनांतील पहिले रुग्णालय होते. न्यूयॉर्क रुग्णालय (१७७१), मॅसॅचूसेट्‌स सर्वसाधारण रुग्णालय (१८११) व न्यू हेव्हन रुग्णालय (१८२६) ही प्रारंभीच्या कालातील इतर महत्त्वाची रुग्णालये होत. 

चीनमध्ये आधुनिक वैद्यकाचा पाया परदेशी धर्मप्रचारकांनी तसेच ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच, जपानी व चिनी सरकारांनी निरनिराळ्या ठिकाणी स्खापन केलेली रुग्णालये व वैद्यकीय शाळा यांनी घातला. कँटनमध्ये १८०६ मध्ये लस टोचण्यास प्रारंभ झाला व तेथेच पीटर पार्कर यांनी १८३५ मध्ये नेत्ररोग रुग्णालय स्थापन केले. 

भारतात मुंबई येथे १६७७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतर्फे एस्प्लनेड भागात एक रुग्णालय स्थापन करण्यात आले. व ते १७३३ पर्यंत वापरात होते. त्यानंतर जमशेटशी जिजिभाई रुग्णालय (१८४५), सेंट जॉर्ज रुग्णालय (१८९२), गोकुळदास तेजपाल रुग्णालय (१८७४) वगैरे रुग्णालये मुंबईत तसेच ससून रुग्णालय (१८५०) पुणे येथे स्थापन झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकात भारतात सर्वसाधारण रूग्णालयांबरोबरच कर्करोग, कुष्ठरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, क्षय व छातीचे इतर रोग, सांसर्गिक रोग वगैरे विविध प्रकारच्या रोगांकरिता विशेष रुग्णालये स्थापना झालेली आहेत. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वगैरे चिकित्सा पद्धतींचा उपयोग करणारी स्वतंत्र रुग्णालयेही आहेत. १९८५ मध्ये सरकारी व खाजगी रुग्णालयांत मिळून रुग्णालयांची संख्या ५·३५ लक्ष होती (१९५१-५२ मध्ये १·१३ लक्ष). रुग्णशय्या व लोकसंख्या यांचे गुणोत्तर दर हजारी ०·७ होते (पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या प्रारंभी ते ०·२४ होते). १९८४ अखेर नोंदलेल्या वैद्यांची व परिचारिकांची संख्या अनुक्रमे २·९७ लक्ष व १·७१ लक्ष होती.  

पूर्वीची रुग्णालये व आधुनिक रुग्णालये यांत फार मोठा फरक पडलेली आहे. विसाव्या शतकात वैद्यकशास्त्रात झालेली विलक्षण प्रगती, रोगाचा प्रतिबंध व त्यावरील उपचार यांबाबत मिळालेले लक्षणीय यश, मानवी व्यथा कमी करणे व आयुर्मान वाढविणे या सर्व गोष्टी बऱ्याच अंशी सर्वसाधारण रुग्णालयांतून पुरविण्यात येणाऱ्या आधुनिक वैद्यकीय परिचर्येवर आणि सुविंधावर अवलंबून राहिलेल्या आहेत. 

 

जगातील अधिकांश लोकसंख्या असलेल्या विकसनशील देशांतील रुग्णालयांत साधनसामग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग पुरेसा नाही. अतिप्रगत उद्योगप्रधान देशांशी तुलना करता या देशांतील सध्याच्या रुग्णालयांतील साधनसामग्री, उपचारांची गरज असलेल्या रुग्णाची प्रचंड संख्या पाहता फारच तुटपुंजी आहे. जगाच्या अनेक भागांतील लोकांना आधुनिक वैद्यकशास्त्राचे लाभ मिळत नाहीत, त्यांना सार्वजनिक आरोग्य सेवा व रुग्णालयीन उपचार पुरेसा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. आजारांवर इलाज न झाल्याने त्यांना अकाली मूत्यू होतो. त्याच वेळी विकसीत देशांत रुग्णालय हे संस्था या दृष्टीने सातत्याने अधिकाधिक जटिल होत चाललेले आहे. प्रत्येक वर्षी नवीन वैद्यकीय ज्ञानाचा वेग वाढत असून त्यासाठी काही सर्वसाधारण रुग्णालयांना अतिरिक्त सेवांची सोय करावी लागत आहे. यापैकी काही सेवा थोड्या वर्षांपूर्वी चिरकारी (दीर्घकालीन) रोगांच्या रुग्णालयांचा विशेष हक्क असलेल्या मानण्यात येत आहेत व प्रती रुग्ण खर्च वाढत आहे. रुग्णालयातील निकडीच्या विभागातील सेवांमध्ये असाधारण वाढ झाल्यास आणि अधिकाअधिक सर्वसाधारण रुग्णालयांची मानसचिकित्सात्मक, पुनर्वसन व विस्तारित-उपचार सर्वसाधारण रुग्णालये ही सामाजिक आरोग्य केंद्राची भूमिका वाढत्या प्रमाणात बजावीत आहेत, असे सूचित होते. रुग्णालये जशीजशी अधिक जटिल होत चाललेली आहेत आणि अधिक गुंतागुंतीचे उपचार व शस्त्रक्रिया हाती घेण्यात येतआहेत, तसेतसे कर्मचारी वर्ग व रुग्ण यांचे गुणोत्तर वाढत असून अधिकअधिक उच्च प्रशिक्षित कर्मचारी कर्मचारी वर्ग आवश्यकता होऊ लागला आहे. अलीकडच्या काळात वैद्यकशास्त्र व अभियंत्रिकी यांच्या संयोगातून कित्येक नवनवीन उपकरणे निर्माण झालेली आहेत आणि त्यांचा उपयोग करण्यासाठी बहुतांशी त्यांची रुग्णालयात मांडणी करणेच आवश्यक असते. उघड्या हृदय शस्त्रक्रियेसारख्या आता सापेक्षतः सामान्य झालेल्या प्रक्रिया काही वर्षांपूर्वी अज्ञात होत्या. 

 

वर्गीकरण : रुग्णालयांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारे करता येते: (१) मालकी व नियंत्रण यांवरून, (२) रुग्णांच्या निवासकालावरून, (३) आकारमानावरून, (४) पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व संघटना यावरून. याबाबत सामान्यतः प्रचारात असलेल्या संज्ञांमध्ये सर्वसाधारण (जनरल) रुग्णालय, विशेष रुग्णालय, अल्प निवासी रुग्णालय व दीर्घनिवासी रुग्णालय यांचा समावेश होतो.


मालकी, नियंत्रण व अर्थव्यवस्था : उत्तर अमेरिकेबाहेरील बहुतेक देशांतील सर्व किंवा जवळजवळ सर्व रुग्णालये सरकारी मालकीची व सरकारने चालविलेली आहेत. ब्रिटनमध्ये धार्मिक पंथांनी चालविलेली काही थोडी रुग्णालये किंवा विशिष्ट जनसमुदायांकरिता चालविण्यात येणारी रुग्णालये (उदा. इटालियन व ज्यू रुग्णालये आणि दीर्घकालीन रुग्णांकरिता असलेल्या काही सुविधा) यांचे अपवाद सोडले, तर बहुतेक रुग्णालये राष्ट्रीय आरोग्य सेवेत अंतर्भूत आहेत. स्थानिक रुग्णालय व्यवस्थापक समिती ही सरळ प्रादेशिक रुग्णालय मंडळात आणि शेवटी आरोग्य व सामाजिक सुरक्षा खात्याला उत्तरदायी असते. संयुक्त संस्थानांतील व कॅनडातील बहुतेक रुग्णालये फायदारहित असून कोणत्याही सरकारी अभिकरणाची मालकी नसलेली वा त्याद्वारे न चालविली जाणारी आहेत. कित्येक रुग्णालये विद्यापीठांशी संलग्न आहेत. काही रुग्णालये धार्मिक गटांशी वा सार्वजनिक हितेच्छू व्यक्तींनी स्थापन केलेली आहेत. मनोरुग्णालये ही राज्य व प्रांतिक सरकांराची परंपरागत जबाबदारी ठरलेली आहेत, तर लष्करी व सेवानिवृत्त लष्करी व्यक्तींसाठी असणारी रुग्णालये संघीय सरकार पुरविते. याखेरीज काही नगरपालिकांची व काउंटी सर्वसाधारण रुग्णालये आहेत. भारतात राज्य सरकारी (उदा.,सेंट जॉर्ज रुग्णालय, मुंबई), केंद्र सरकार (उदा., भाभा अणू संशोधन केंद्र रुग्णालय, मुंबई) महापालिका (उदा., के. ई. एम, रुग्णालय, मुंबई), विश्वस्त (उदा., जसलोक रुग्णालय, मुंबई), खाजगी, धार्मिक संस्था इत्यादींनी चालविलेली विविध रुग्णालये आहेत. 

जगात बहुतेक सर्वत्र रुग्णालयांच्या बांधकामाच्या खर्चात किमान काही अंश तरी सरकाराचा वाटा असतो. रुग्णालय चालविण्याचा खर्च विविध प्रकारे भागविला. जातो. खाजगी दाननिधीतून वा देणग्यांतून न भागणाऱ्या खर्चापैकी मोठी भाग एखाद्या सरकारी विविध प्रकारे भागविला जातो. खाजगी दाननिधीतून वा देणग्यातून न भागणाऱ्या खर्चापैकी मोठा भाग एखाद्या सरकारी विभागाच्या सर्वसाधारण निधीतून किंवा विमेदारांकडून गोळा केलेल्या निधीतून खर्च करण्यात येतो. ज्या देशांत रुग्णालयीन विमा सार्वत्रिक वा पूर्णांशी नाही तेथे रुग्णालय चालविण्याच्या खर्चापैकी काही खर्च विमेदार नसलेल्या वा अपुरा विमा उतरविलेल्या रुग्णांना आकारलेल्या शुल्कातून केला जातो. 

एखाद्या विशिष्ट देशात सरकारी अभिकरणे, खाजगी निगम वा अभिकरणे किंवा दोन्हीतर्फे रुग्णालयीन विमा उतरविला जातो. उदा., ब्रिटेनमध्ये नॅशनल इन्शुरन्स अधिनियमान्वये सरकारतर्फे विमा उतरविला जातो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनात इतरांनी नोकरीस ठेवलेल्या व्यक्ती किंवा स्वयं-सेवायोजित व्यक्ती मेडिकेअर या एक प्रकारच्या राष्ट्रीय रुग्णालयीन विम्याकरिता सक्तीचे अंशदान करतात. या विम्याद्वारे ६५ वा त्यावरील वयांच्या व्यक्तींच्या रुग्णालयीन खर्चाचा बराचसा हिस्सा भागविला जातो. सेवायोजकही (मालकही) खर्चाचा अनुरूप हिस्सा देतात. ब्ल्यू क्रॉस हा रुग्णालयीन शुल्क व इतर व्यक्तगत व गट वर्गणीदार, तसेच सरकारच्या अनेक कार्यक्रमांचा फायदा घेण्यांकरिता असलेला कार्यक्रम खाजगी व विनाफायदा स्वरूपाचा आहे आणि तो संयुक्त संस्थाने, कॅनडा प्वेर्त रीको व जमेका या देशांत चालू आहे. भारतात एका प्रकारच्या रुग्णालयीन विमापत्रान्वये विमाधारकाला त्याने रुग्णालयात असताना केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेनुसार केंद्र सरकारी नोकर व त्यांचे कुटुंबीय यांनी केलेल्या वैद्यकीय खर्चाची तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रुग्णालयीन उपचार घेण्यासाठी व हृदय गतिकारकासारख्या कृत्रिम उपकरणासाठी केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते. याकरिता मुंबई, मद्रास, कलकत्ता इ. ठिकाण्याच्या १६२ रुग्णालयांना (जेथे त्यांना विशेष उपचार व रुग्णालयीन सुविधा मिळू शकतात) मान्यता देण्यात आलेली आहे. कारखान्यांतील कामगारांकरिता असलेल्या ⇨कामगार राज्य विमा योजनेतर्फे कामगारांना रुग्णालयीन सेवेचा खर्च मिळू शकतो. यूरोपात रुग्णालयीन सेवांकरिता करण्यात येणारे आर्थिक साहाय्य सामूहिक स्वरूपाचे असण्याकडे कल आहे. यूरोपातील रुग्णालये चालविण्याच्या खर्चापैकी दहा टक्क्याहून कमी खर्च रुग्णांनी प्रत्यक्ष दिलेल्या रकमेतून भागिवला जातो. सर्वसाधारणपणे बहुतेक युरोपीय देशांत (फ्रन्स, जर्मनी, ईटली, नेदरर्लंडस, नॉर्वे व इतरत्र) रुग्णालय चालविण्याचा खर्च विमानिधीतून केला जातो. 

सर्वसाधारण रुग्णालय : सुमारे २०० रुग्णशय्या  असणाऱ्या सामुदायिक सर्वसाधारण रुग्णालयात संघटित वैद्यकीय कर्मचारी वर्ग, व्यावसायिक रुग्णपरिचारक वर्ग व खर्चिक रोगनैदानिकसाधनसामग्री असते. त्यात पहिल्या दर्जाच्या हॉटेलसारख्या आवश्यक सेवा असण्याबरोबरच तेथे औषधालय, प्रयोगशाळा, क्ष-किरण निदान व चिकित्सा विभाग, कदाचित प्रसूती विभाग (सामान्यतः बालगृह व प्रसूती खोली अंतर्भूत असलेला), शस्त्रक्रिया खोल्या, रोग मुक्तीनंतर प्रकृती सुधारण्याकरिता खोल्या, बाह्यरुग्ण विभाग व निकडीच्या उपचारांचा विभाग असतात. यापेक्षा काहीशा मोठ्या रुग्णालयात पुढील अतिरिक्त सुविधा अनपेक्षित असतात : दंतचिकित्सा सेवा, अकालिक अर्भकांसाठी संगोपनगृह, प्रतिरोपणासाठी उपयोगात आणावयाच्या इंद्रियांची पेढी, वृक्कीय अपोहनासाठी (रक्तातील निरुपयोगी द्रव्ये काढून टाकण्यासाठी कृत्रिम मूत्रपिंडाप्रमाणे ते अर्धपारगम्य पटलांतून−विशिष्ट रेणू आरपार जाऊ देणाऱ्या पटलांतून−जाऊ देण्याकरिता) विभाग, अतिदक्षता विभाग, स्वयंपरिचर्या विभाग, स्वेच्छा सेवा विभाग व कदाचित घरगुती-परिचर्या कार्यक्रम. जर रुग्णालय एखाद्या वैद्यकीय शिक्षण संस्थेला संलग्न असेल, तर त्यात बंद-मंडल दूरचित्रवाणीची [⟶ दूरचित्रवाणी] सुविधा असते. 

 

दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या प्रगतीत प्रतिजैव पदार्थांचा (अँटिबायॉटिक्स) वापर, प्रयोगशालेय प्रक्रियांचा विस्तीर्ण नवा व्यूह, कित्येक नवीन शस्त्रक्रिया तंत्रे, ⇨प्रारण चिकित्सेसाठी नवीन साधने व सामग्री आणि ⇨भौतिकी चिकित्सा व पुनर्वसन यांवरील वाढता भर यांचा अंतर्भाव होतो. सर्वसाधारण रुग्णालयातील निकडीच्या उपचार विभागाचा उपयोग गंभीर निकड नसण्याची शक्यता असलेल्या रुग्णांच्या बाबतीतही वैद्यकीय गरजा भागविण्यासाठी करण्याचा वाढता कल दिसून येतो. समाजातील सर्व वर्गामध्ये ही प्रवृत्ती आढळून येते. 

रुग्णालयाचे कायदेशीर नियामक मंडळ हे सामान्यतः रुग्णालय मंडळ असते. या मंडळाकडे रुग्णालय चालविण्याची व त्याचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याची पूर्ण जबाबदारी असते. हे मंडळ धोरण ठरविते आणि एका वैद्यकीय सल्लागार मंडळाच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय कर्मचारी वर्ग व प्रशासक यांच्या नेमणुका करते. मंडळाचे रुग्णालयाच्या खर्चावर नियंत्रण असून व्यावसायिक दर्जा टिकविण्याची जबाबदारी असते. प्रशासक हा मुख्य कार्यकारी अधिकारी असून फक्त मंडळाला जबाबदार असतो. मोठ्या रुग्णालयात अनेक भिन्न विभाग असून प्रत्येक विभागाचे नियंत्रण एका प्रमुखाकडे सोपविलेले असते. कोणत्याही रुग्णालयातील सर्वांत मोठा विभाग रुग्णपरिचर्येचा असतो आणि त्यानंतर आहार विभाग व गृहव्यवस्थापन यांचा क्रम लागतो. रुग्णालयाच्या कार्यास महत्त्वाचे असलेले इतर विभाग म्हणजे धुलाई, अभियांत्रिकी, भांडार, खरेदी, हिशेब, औषधालय, भौतिकी चिकित्सा, सामाजिक सेवा, विकृतिविज्ञान व क्ष-किरण आणि वैद्यकीय नोंदणी हे होत. अनेक रुग्णालयांत आंतरविभागीय समित्यांच्या कार्याचे उत्तम परिणाम दिसून आलेले असून अनेक अडचणी त्यामुळे सुटलेल्या आहेत. औषधे, अन्न सेवा, वैद्यकीय नोंदी, रुग्णालयीन प्रपत्रे, धुलाई व खरेदी या विभागांच्या समित्या संघटित करता येण्याजोग्या समित्यांत मोडतात. उदा., धुलाई व वस्त्रे यासंबंधीच्या समितीत सदस्य म्हणून प्रशासक वा त्याचा प्रतिनिधी आणि रुग्णपरिचर्या, खरेदी, धुलाई, अभियांत्रिकी व शिवण खोली या विभागांचे प्रतिनिधी यांचा अंतर्भाव होऊ शकतो. 


वैद्यकीय कर्मचारी वर्ग शस्त्रक्रिया, वैद्यक व प्रसूती यांसारख्या विभागांत संघटित केलेला असतो. या कर्मचारी वर्गाचे विभागीकरण त्याच्या सदस्यांच्या विशेषीकरणावर अवलंबून असते. सामान्यतः रुग्णालयाच्या आकारमानाशी त्याचा थोडा फार सहसंबंध असला, तरी ते प्रामुख्याने त्यावरच अवलंबून नसते. वैद्यकीय कर्मचारी वर्ग विभागांचे प्रमुख तसेच विकृतिवैज्ञानिक व क्ष-किरणशास्त्रज्ञ यांचे मिळून वैद्यकीय सल्लागार मंडळ असते आणि वैद्यकीय-प्रशासकीय बाबींविषयी त्याची दर महिन्याला बैठक असते. व्यक्तिगत कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक कार्याचे परीक्षण वैद्यकीय नोंदी, वैद्यकीय लेखापरीक्षा, ऊतक (शस्त्रक्रियाविशारदाने काढून टाकलेले ऊतक−पेशीसमूह−खरोखरीच काढून टाकणे आवश्यक होते याची पडताळणी करणारी समिती), अधिकार पत्रे व उपयोजन यांसारख्या बाबींशी संबंधित असलेल्या वैद्यकीय कर्मचारी वर्गाच्या समित्या करतात. मोठ्या रुग्णालयात या समित्या वैद्यकीय सल्लागार मंडळाला व लहान रुग्णालयात नेहमीच्या कर्मचारी वर्ग बैठकीत सरळ वैद्यकीय कर्मचारी वर्गाला अहवाल देऊ शकतात.

 विशेष रुग्णालये : एकाच प्रकारच्या रोगाकरिता वा एकाच प्रकारच्या रुग्णाकरिता विशेषीकृत असलेली रुग्णालये यूरोपात व अमेरिकेत सर्वसामान्य आहेत तसेच काही प्रमाणात इतर प्रदेशांतही प्रचलित आहेत. जेथे मोठ्या प्रमाणवर पदव्युत्तर अध्यापन चालते अशा मोठ्या प्रमाणावर पदव्युत्तर अध्यापन चालते अशा मोठ्या विद्यापीठ केंद्राचा अपवाद सोडला, तर विशेष रुग्णालय हे सर्वसाधारण रुग्णालयाचा एक विभाग म्हणून असला पाहिजे असे आधुनिक मत आहे. मानसिक रोग व क्षयरोग यांवर उपचार करणारी रुग्णालये ही विशेष रुग्णालयांची ठळक उदाहरणे आहेत. यांखेरीज मुले, स्त्रिया, तंत्रिका (मज्जा) विकार, नाक-कान-घसा रोग, विकलांग चिकित्सा, नेत्ररोग व कर्करोग यांकरिताच केवळ असलेली रुग्णालये सार्वत्रिक आहेत. यांपैकी कित्येक रुग्णालये संशोधन व अध्यापन यांची केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. बदलत्या परिस्थितीमुळे वा उपचारातील बदलत्या पद्धतींमुळे काही प्रकारच्या विशेष रुग्णालयांची गरज कमी झालेली आहे किंवा अशा रुग्णालयांचू आवश्यक असलेली संख्या कमी झालेली आहे.

 क्षयरोग रुग्णालये : १८८० ते १९३० या काळात क्षयरोगाकरिता रुग्णालये उभारण्याकडे पुष्कळच लक्ष देण्यात आलेले होते, अशी रुग्णालये बहुधा ग्रामीण भागात असत आणि त्यात विश्रांती, खास आहार व ताजी हवा यांची विशेष सोय केलेली असे. रोग प्राथमिक अवस्थेत असला, तरी तो बरा होण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात राहणे आवश्यक समजले जाई. कायमची रोगमुक्ती पूर्णपणे साध्य होण्याची शक्यता नसल्याचे समजण्यात येई. ही पद्धत प्रतिजैव पदार्थांच्या शोधापर्यंत फारशी बदलली नाही. प्रतिजैव पदार्थांचा वापर, तसेच छातीच्या शस्त्रक्रियेतील प्रगती व नित्यक्रमी क्ष-किरण तपासणी यांमुळे वरील चित्र पूर्णतः बदलले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून क्षयरोग आरोग्यधामांतील रुग्णशय्यांचा उपयोग लक्षणीय इतका कमी झालेला आढळतो. उत्तर अमेरिकेतील व यूरोपातील अशा कित्येक आरोग्यधामांचे इतर प्रकारच्या उपचारांकरिता रूपांतर करण्यात आलेले आहे.

मनोरुग्णालये : मनोरुग्णालये परंपरेने दीर्घनिवासी मनोरुग्णालयांत ठेवण्यात येत आहेत (पूर्वी या रुग्णालयांना ॲसायलम−उपचार-गृह−अशी इंग्रजीत संज्ञा होती). विसाव्या शतकात मनोरुग्णांच्या उपचारांतच नव्हे, तर त्यांच्याकडे पहाण्याच्या जनतेच्या वृत्तीतही मूलभूत बदल झालेला आहे. आता बहुतेक मोठ्या सर्वसाधारण रुग्णालयांत मानसचिकित्सेचा विभाग असतो. दीर्घकालीन मनोविकार असणाऱ्या कित्येक व्यक्तींचा रुग्णालयांतील निवासकाल आधुनिक औषधयोजना व जनतेचा अधिक समजुदारपणा यांमुळे कमी झालेला आहे. मनोरुग्णाना कित्येक कार्यक्रमांत सहभागी होण्याची प्रथम रुग्णालयीन परिस्थितीत व पुढे समाजात संधी देण्यात येते. याकरिता घरी प्रयोगादाखल भेटी देण्याची किंवा निवडक रुग्णांना पालकगृहांत राहण्याची संधी दिली जाते. अलीकडील एका नव्या पद्धतीत मनोरुग्णांना दिवसा समाजात काम करू देतात आणि रात्री औषधोपचार व इतर उपचारांसाठी रुग्णालयांत परत येऊ देतात. [⟶ मानसिक आरोग्य मानसचिकित्सा].

 स्त्रिया व मुले यांकरिता रुग्णालये : स्त्रियांकरिता विशेष रुग्णालये सामान्य प्रचारात आहेत व त्यांत बऱ्याचदा पूर्णपणे स्त्री वैद्य कर्मचारी असतात. यांतील अनेक रुग्णालये खाजगी मालकीची आहेत. मुख्यतः ही रुग्णालये शस्त्रक्रिया करावी लागण्याच्या परिस्थितीतील रुग्णांसाठी असली, तरी सामान्यतः वैद्यकीय उपचारांसाठी व प्रसूतीसाठीही त्यांत दाखल करून घेतात.

रशियात व उत्तर अमेरिकेतील अनेक शहरांत मुलांसाठी विशेष रुग्णालये आहेत. बहुतेक रुग्णालयांत १४ वर्षेपर्यंतच्या मुलांना प्रवेश देतात, पण काहींत दाखल होण्याचे वय १६ पर्यंतही आहे. अशी रुग्णालये नसलेल्या शहरांत स्थानिक सर्वसाधारण रुग्णालयांत मुलांकरिता सामान्यतः एक खास कक्ष ठेवलेला असतो.

 लष्करी रुग्णालये : वैद्यकातील प्रगती अनेकदा युद्धात मिळालेल्या अनुभवांवरून झालेली आहे. शांततेच्या काळात लष्करी वैद्य व शस्त्रक्रियाविशारद यांनी आरोग्य, प्रतिबंधक वैद्यक, वैद्यकीय सांख्यिकी व रुग्णालयांची रचना या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केलेली आहे. ग्रीक कवी होमर यांच्या काळात (इ. स. पू. आठवे शतक) लष्करी शस्त्रक्रियाविशारद असल्याचे व रोमन हेड्रिअन (इ. स. ७६ ते १३८) यांच्या कारकीर्दीत लष्करी रुग्णालय असल्याचे ऐतिहासिक नोंदीवरून दिसून येते. मध्ययुगीन काळात धर्मयद्धांच्या मार्गांवर जखमींच्या विश्रांतीसाठी रुग्णालये स्थापन करण्यात आली होती. क्रिमियन युद्धात (१८५४) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी शास्त्रीय वैद्यक व रुग्णलयातील रुग्णांची मानवतावादी दृष्टिकोणातून काळजी घेणे यांचा परिणामकारक समन्वय साधला. त्यांचे सिद्धांत व तत्त्वे यांचा लवकरच जगभर स्वीकार झाला. अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथील चिमोराझो रुग्णालय हे नोंद असलेले सर्वांत मोठे रुग्णालय (९,००० रुग्णशय्या असलेले) संघराज्याच्या सैन्याने यादवी युद्धात बांधले होते.

पहिल्या महायुद्धात असे दिसून आले की, सार्वजनिक इमारती, खाजगी घरे, जहाजे, पडाव, आगगाड्या व रुग्णवाहिकी यांसारख्या कामचलाऊ जगांतही चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरविता येणे शक्य आहे. दुसरा एक विकास म्हणजे फिरते रणक्षेत्र रुग्णालय हा होय. यातील वैद्य, परिचारिका व सामग्री यांचे निकडीच्या उपचारांसाठी सैन्यदलाच्या हालचालींना अनुसरून स्थलांतर करण्यात येते. या युद्धात दुखण्यातून उठलेल्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात दीर्घ अंतरावर व पूर्वी अशक्य वाटणाऱ्या साधनांद्वारे स्थलांतर करण्यात आले. पूर्वीच्या कोणत्याही युद्धाच्या मानाने सांसर्गिक रोगांवर नियंत्रण ठेवण्यात पुष्कळच प्रगती झाली. कित्येक नव्या पद्धती नंतर शांततेच्या काळात नागरी रुग्णालयांतही वापरण्यात येऊ लागला.


दुसरे महायुद्ध व कोरियन युद्ध यांची पूर्वीच्या युद्धांशी तुलना करता एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जखमी झालेल्या सैनिकांची वाचण्याची शक्यता पुष्कळच वाढली. याचे कारण अधिक चांगल्या वैद्यकीय व शस्त्रक्रियात्मक उपचारांबरोबरच युद्धभूमीपासून जखमींचे प्रकारानुसार विलगीकरण करण्याच्या क्षेत्रात अधिक कार्यक्षम व जलद स्थलांतर करण्यात आले. यांपैकी अधिक गंभीर जखमींना कित्येक किलोमीटर मागे असलेल्या तळ रुग्णालयात विमानाने हलविण्यात आले. या सुविधांना चांगल्या प्रकारे साधनसामग्री व कर्मचारी वर्ग पुरविण्यात आला होता परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे जखमा झाल्यापासून रोगसंक्रामण फार प्रगत अवस्थेत जाण्यापूर्वीच जखमी व्यक्तींवर लवकरात लवकर उपचार करण्यात आले.

जमिनीवरील कायम रुग्णालयात दीर्घकालीन उपचार करण्याकरिता जखमींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रुग्णालयीन जहजांना प्रदीर्घ परंपरा आहे. १५८८ साली स्पॅनिश आरमारांबरोबर एक रुग्णालयीन जहाज होते. आधुनिक रुग्णालयीन जहाजे ही तरती रुग्णालयेच असून त्यांत जमिनीवरील अत्याधुनिक रुग्णालयांइतकीच सुयोग्य अशी साधनसामग्री आणि वैद्यकीय व रुग्णपरिचर्येसाठी कर्मचारी वर्ग असतो. निकडीच्या वेळी रुग्णालयीन सेवेसाठी व जखमींच्या वाहतुकीसाठी विमानांचा व हेलिकॉप्टरांचा उपयोग करण्यात येतो. [⟶ सैनिकी वैद्यकीय सेवा].

 मोठ्या प्रमाणावरील आपत्तींकरिता सुवाह्य रुग्णालये : भूकंप, पूर यांसारख्या आपत्तींमध्ये वापरता येतील अशी सुबाह्य रुग्णालये विकसित करण्यात आलेली आहेत. या रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्याचे व त्यांचे वर्गीकरण करण्याचे विभाग, शस्त्रक्रिया करण्याच्या खोल्या. रुग्णकक्ष. मध्यवर्ती निर्जंतुक पुरवठा, औषधालय, सर्वसामान्य प्रयोगशाळा, क्ष-किरण प्रयोगशाळा, सामान्य भांडार विभाग यांची उभारणी करण्यासाठी साधनसामग्री असते. प्रत्येक सुबाह्य रुग्णालयाचा उपयोग अस्तित्वात असलेल्या रुग्णालयाच्या सुविधांचा विस्तार करण्यासाठी किंवा अगोदर निवड केलेल्या इमारतीत २०० रुग्णशय्यांचे रुग्णालय उभारण्यासाठी करता येतो. अशा प्रकारच्या नमुनेदार सुबाह्य रुग्णालयाची साधनसामग्री सु. ६६० पेटाऱ्यांत व पेट्यांत ठेवलेली असून तिचे वजन सु. २०,४०० किग्रॅ. असते आणि ते साठविण्याकरिता सु. २१० घ. मी. जागा लागते. 

विस्तारित आरोग्य परिचर्या व सुविधा : पुनरारोग्यप्रापक परिचर्या : आजार, शस्त्रक्रिया वा इजा यांतून बऱ्यात होत असलेल्या व्यक्तींवरील आधुनिक उपचारांत रुग्णांच्या शारीरिक पुनरारोग्य प्राप्तीबरोबरच त्याचे भावनिक व सामाजिक क्षेमही विचारात घेतले जाते. पुनरारोग्यप्रापक कामात अनेक रुग्णांची सर्वसाधारण रुग्णालयाबाहेर पुढील प्रकारे परिचर्या करण्यात येते: (१) पुनरारोग्यप्रापक रुग्णालयांत (२) शुश्रुषालयात−ही सामान्यतः लहान संस्था असून तीत मागणी केल्यास वैद्यकीय सेवा उपलब्ध असते (३) दीर्घकालीन रोगांचे रुग्णालय−यात दीर्घकालीन परिचर्या करण्यासाठी सुधारात्मक उपचार करण्यात येतात (४) रुग्णाच्या स्वतःच्या घरात−सर्वसाधारण रुग्णालयाने पुरविलेल्या सेवांच्या व साधनसामग्रीच्या मदतीने करण्यात येणारी परिचर्या.

दीर्घनिवासी रुग्णालयांतील परिचर्या : दीर्घनिवासी रुग्णालयांचा संबंध मर्यादित हालचालींचीच गरज असलेल्या दीर्घकालीन रोगांवरील उपचारांशी परंपरेने जोडला जातो. अशी परिस्थिती बहुधा हृदयविकार, संधिवात, संधिशोथ (सांध्यांची दाहयुक्त सूज), पाठीचे विकार, उच्च रक्तदाब, मानसिक व तंत्रिकाजन्य विकार आणि दृष्टीतील बिघाड यांत उद्‌भवते. खास दीर्घकालीन रोगांच्या रुग्णालयांऐवजी सर्वसाधारण रुग्णालयांत अशा रोगांकरिता अलग विभाग ठेवण्याच्या आधुनिक प्रवृत्तीमुळे सेवांमध्ये अधिक चांगला समन्वय व एकत्रीकरण साधते आणि परिचर्येच्या सातत्याची खात्री राहते.

 क्रमिक-परिचर्या संकल्पना : वैद्यकशास्त्रात झालेली प्रगती आणि रुग्णालये चालविण्याचा वाढता खर्च यांमुळे बाह्यरुग्ण व निवासी रुग्ण या दोहोंच्या बाबतीत क्रमिक-परिचर्या संकल्पना म्हणजे संपूर्ण परिचर्येच्या क्रमशः कार्यक्रमाची संकल्पना हळूहळू प्रचारात येत आहे. क्रमिक परिचर्या पुढील पाच वर्गात विभागता येते : (१) अतिदक्षता परिचर्या, (२) मध्यम परिचर्या, (३) स्वयंपरिचर्या, (४) दीर्घकालीन परिचर्या व (५) संघटित गृहपरिचर्या कार्यक्रम. स्वयंपरिचर्या व गृहपरिचर्या हे वर्ग पूर्वीच्या पद्धतींपेक्षा सापेक्षतः नवीन आहेत आणि त्यासंबंधी थोडे वर्णन खाली दिले आहे.

स्वयंपरिचर्या सुविधा ही अलग विभाग म्हणून संघटित केली जाते. तीत फक्त निदानात्मक वा पुनरारोग्यप्राफ्क परिचर्येची गरज असलेल्या हिंडत्याफिरत्या रुग्णांची हॉटेलसारखी निवासस्थानी केली जाते. रुग्णांना नेहमीचे कपडे वापरण्याची व रुग्णालयातील उपाहारगृहात जाण्याची परवानगी असते. सर्वसाधारण रुग्णालयाच्या अतिदक्षता वा मध्यम परिचर्या विभागापेक्षा अशा स्वयंपरिचर्या कक्षाला पुष्कळच कमी खर्चिक साधनसामग्री लागते आणि तेथे बराच कमी परिचारिका व मदतनीस कर्मचारी वर्ग ठेवला तरी चालतो, हे उघड आहे.

गृहपरिचर्या कार्यक्रम हे काही प्रमाणात परिचर्या आवश्यक असलेल्या पण रुग्णालयातील सर्व उपचार सुविधांची गरज नसलेल्या निवडक रुग्णांकरिता असतात. रुग्णांना व्यक्तिनुसारी वैद्यकीय शुश्रूषा, सामाजिक व पुनर्वसनात्मक सेवा त्यांच्या घरीच पुरविण्यात येतात. गृहपरिचर्येसाठी रुग्ण योग्य असल्याचे पुढील परिस्थितींत ठरवितात : (१) निदान उपचारयोजना प्रस्थापित झालेली आहे (२) योग्य परिचर्येसाठी निवासी रुग्णालयीन सुविधांचा गरज राहिलेली नाही (३) दर आठवड्याला वैद्याने दोनापेक्षा अधिक वेळा भेटी देणे आवश्यक नाही (४) रुग्णाला पुरेशी परिचर्या मिळेल अशी घरची परिस्थिती असल्याचे शुश्रूषा सेवेला आढळून आलेले आहे (५) बाह्यरुग्ण विभागाला भेट देणे शक्य नाही इतका रुग्ण आजारी आहे पण त्याला रुग्णालयीन परिचर्येची आवश्यकता नाही (६) कौटुंबिक वातावरणाचा रोगनिवारक म्हणून परिणाम होऊ शकेल व कुंटुबातील व्यक्तींना वा इतरांना आवश्यक परिचर्या करण्याविषयी शिकविता येणे शक्य आहे (७) कुंटुब व रुग्ण हे घरीच परिचर्या करणे अधिक पसंत करतात. गृहपरिचर्या हा अतिशय खर्चिक, अतीव-परिचर्या रुग्णशय्या राखून ठेवण्याचा एक मार्ग आहे व तो रुग्णालयीन सेवेचा महत्त्वपूर्ण विस्तार आहे. गृहपरिचर्या करण्यात येणारे बहुतेक रुग्ण अपेक्षेप्रमाणे सुधारतात, असे असले तरी गृहपरिचर्या कार्यक्रमांचा मोठ्या प्रमाणावर अद्याप स्वीकार झालेला नाही.


रुग्णालयांचे नियोजन : यात रुग्णांच्या गरजांकडे लक्ष देण्यासाठी कार्यक्षम साधणे पुरविण्याच्या दृष्टीने रुग्ण परिचर्या सेवा निर्धारित करणे आणि रुग्णालयांच्या इमारती व त्यांतील साधनसामग्रीचे अभिकल्पन (आराखडा तयार करणे) व रचाना करणे यांचा समावेश होतो. सुविंधाचे जास्तीत जास्त उपयोजन, रुग्णाची सुखावहता व सुरक्षितता कमीत कमी कर्मचारी वर्ग व सेवांचा आवश्यक दर्जा प्राप्त करण्यासाठी शक्य तितका किमान खर्च यांचा याकरिता प्रामुख्याने विचार करावा लागतो.

रुग्णालयांचे आकारमान ग्रामीण भागातील १० रुग्णशय्या असलेल्या रुग्णालयांपासून महानगरातील ३,५०० रुग्णशय्या असलेल्या मोठ्या नागरी रुग्णालयापर्यंत असू शकते. रुग्णालयांत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची व्याप्ती व गुणवत्ता आणि त्यांचे उद्दिष्ट, नियंत्रण व मालकी याबाबतीत भिन्नता आढळते, यामुंळे रुग्णालयाची योजना आखताना प्रथम त्याच्या मूलभूत गरजा निर्धारीत करणे आवश्यक आहे. येथे रुग्णालय सल्लागार ज्या समाजाकरिता रुग्णालय उभारावयाचे असेल त्याचा अभ्यास करतो. याकरिता तो अस्तित्वात असलेल्या आरोग्य सेवांचे मूल्यन करतो वैद्य, रुग्णापरिचारिका व तंत्रज्ञ यांची उपलब्धता निर्धारीत करतो आणि रुग्णालयीन गरजा व त्यांकरिता खर्च करण्याची लोकांना क्षमता यांचा अंदाज काढतो. अशा प्रकारचा अभ्यास न केल्यास नियोजनात त्रुटी निर्माण होण्याची शक्यता फार मोठी असते. अशा अभ्यासाच्या मदतीने रुग्णशय्यांची इष्ट संख्या, रुग्णालयाचे स्थान निश्चित करणे, बाहयरुग्ण विभाग बांधावयास पाहिजे की, नको, वैद्यकीय शिक्षणाची कोणत्या प्रकारची संलग्नता असावी, रुग्णपरिचर्या शाळा असावी की प्रशिक्षणाचे कार्यक्रम असावेत आणि करता येण्याची शक्यता असलेल्या वैद्यकीय संशोधनाचा प्रकार व विस्तार यांसारख्या मूलभूत गोष्टी प्रस्थापित करता येतात.

या मूलभूत गोष्टी निश्चित झाल्यावर रुग्णशय्यांची विविध सेवांनुसार (वैद्यकीय, शस्त्रक्रिया, बालरोग, प्रसूती व इतर विशेष प्रकार) वाटणी एकेकट्या खोल्या, दुहेरी खोल्या व कक्ष यांची संख्या बाहयरुग्ण विभागांचे प्रकार व आकारमान आनुषंगिक सेवांसाठी समाविष्ठ करावयाच्या जागा (उदा., शस्त्रक्रिया खोल्या, प्रसूती खोल्या, प्रयोगशाळा, औषधालय,भौतिक चिकित्सा खोल्या व क्ष-किरण विभागासाठी जागा) या बाबी ठरवाव्या लागतात. प्रारंभीच्यी टप्प्यातच प्रशासकीय संघटना ठरविली पाहिजे व रुग्णालयीन कर्मचारी वर्गाचा अंदाज घेणे आवश्यक असते.

स्थान : नवीन रुग्णालयाचे स्थान ठरविताना, इतर गोष्टी समान असल्यास, आगम-सुलभता ही मुख्य गोष्ट असते. यात मोटारीतून, पायी वा बसने येणारे रुग्ण नेहमीच्या तपासणी फेरीसाठी येणारे वैद्य अन्न, इंधन व इतर माल पुरविणारे लोक परगावाहून भेटीसाठी येणारे लोक (रेल्वे वा स्थानक जवळ असणे), तसेच रुग्णालयात काम करणारे सर्व कर्मचारी या सर्वांच्या आगम-सुलभतेची सोय विचारात घेणे महत्त्वाचे ठरते. आगम-सुलभतेनंतर इमारतीच्या जागेचे स्वरूप (सपाट वा उतरती, मोकळी की झाडे असलेली, खडकाळ वा तशी नसलेली), सभोवतालचे स्वरूप (खास करून वाहतूक, वास, आवाज, देखावा व स्वच्छता या दृष्टींनी) आणि नैसर्गिक स्थिती (दिक् स्थिती सूर्यप्रकाश व प्रचलित वारे) यांचे महत्त्व आहे. जागेचे आकारमानही महत्त्वाचे आहे. लहान रुग्णालयासाठी सामान्यतः २५ रुग्णशय्या करिता किमान ०·४ हेक्टर जागा महाग व रुग्णालय मोठे असल्यास ०·४ हेक्टर जागेत १०० वा त्यापेक्षा अधिक रुग्णशय्या वाजवी म्हणता येतीलय आदर्श दृष्ट्या एकूण जागेपैकी इमारतीने २५ टक्क्यांपेक्षा जास्त जागा व्यापलेली नसावी, ३३% वाहन तळासाठी व राहिलेली ४२% वा अधिक जागा पायी फेरफटक्यासाठी, वाहने येण्याजाण्यासाठी व हिरवळीसाठी असावी. 

रुग्णशय्यांची वाटणी : प्राथमिक अभ्यासावरून मुख्य सेंवासाठी रुग्णशय्यांची कच्ची वाटणी करता येते. यात अतिदक्षता परिचर्या, हृदयविकार परिचर्या, सतत परिचर्या व उपविशेष शाखा (बालरुग्ण वा भौतिकी चिकीत्सा-पुनर्वसन) यांचा विचार होतो. यांखेरीज रुग्णशय्यांच्या वाटणीकरिता मानसचिकित्सा, विस्तारित परिचर्या व किमान परिचर्या याचांही विचार होऊ शकतो.

शस्त्रक्रिया खोल्या : पूर्वी या खोल्या उजेडासाठी छतातील काचेच्या खिडकीचा उपयोग करप्याकरिता वरच्या मजल्यावर असत. अलीकडे त्यांची योजना इमारतीच्या खालच्या भागात करतात. आधुनिक शस्त्रक्रिया खोल्या वातानुकूलित व पूर्णपणे कृत्रिम प्रकाशावर अवलंबून असतात. प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या खोल्यांखेरीज शस्त्रक्रिया विशारद व रुग्णपरिचारिका यांच्या स्वच्छतेसाठी खोल्या, निर्जंतुकीकरणासाठी खोल्या, उपकरणे व पात्रे स्वच्छ करण्यासाठी खोली, काही सामग्री तयार करण्यासाठी परिचारिकांसाठी खोली, कर्मचाऱ्यांच्या लॉकरसाठी (कुलूप लावलेल्या खणांसाठी) जागा यांचीही सोय करावी लागते. शस्त्रक्रिया खोल्यांच्या भिंती सामान्यत : अभेद फरश्यांच्या केलेल्या असतात.

 

फिरत्या रुग्णांकरिता परिचर्या व बाहयविस्तार सेवा : सर्वसाधारण रुग्णालयाच्या सेवापैकी फिरत्या रुग्णसेवा सर्वांत अधिक प्रमाणात वाढत आहेत. यांत निकडीच्या व बाहय रुग्ण विभागातील परिचर्यांचा समावेश होतो. बाह्यरुग्णांसठी नैदानिक व चिकित्सा सेवाही उपलब्ध असतात. यांत प्रयोगशालेय परीक्षा, क्ष-किरण (नैदानिक व उपचारात्मक). भौतिकी चिकित्सा, ⇨विद्युत्  हृल्लेखन, ⇨विद्युत् मस्तिष्कालेखन वगैरेंचा समावेश होतो. यांखेरीज प्राथमिक वैद्यकीय सेवा व बाह्य विस्तार सेवाही असतात.

बाह्यरुग्ण अभ्यास कार्यक्रमाद्वारे समाजातील दर वर्षांतील नवीन बाह्यरुग्णांची संख्या व प्रत्येक रुग्ण किती भेटी देईल याचा अंदाज काढणे आवश्यक आहे. भेटीची वेळ ठरविण्याची पद्धत गृहीत धरून चिकित्सालयांचे वेळापत्रक तयार केले पाहिजे व आवश्यक असलेल्या निरनिराळ्या चिकित्सालयांच्या संस्थेचा अंदाज काढला असलेल्या निरनिराळ्या चिकित्सालयांच्या संस्थेचा अंदाज काढला पाहिजे. या माहितीवरून बाह्यरुग्ण जागा किती लागेल याचे व त्यावरून संपूर्ण विभागाकरिता लागणाऱ्या जागेची गणना करता येते.

बाह्यरुग्ण विभाग जनतेला आगम-सुलभ असला पाहिजे आणि आनुषांगिक सेवा व वैद्यकीय नोंद विभाग यांच्या शक्य तितक्या जवळ असला पाहिजे. प्रवेशद्वारापाशी प्रतीक्षेसाठी जागा ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे निरनिराळे विभाग जोडणाऱ्या मार्गाचा प्रतिक्षालय म्हणून उपयोग होण्यास प्रतिबंध होतो. अनेकविध उपयोगांकरिता प्रमाणभूत तपासणी खोल्या असलेली अनेक चिकात्सालये तसेच मूत्रपरीक्षा, बालरोग, मानसचिकित्सा व चर्मरोग या विभागांत खास तपासणी खोल्या आवश्यक असतात. ॲलर्जी, उपदंश, मधुमेह, नेत्र-नाक-कान-घसा, प्रसवपूर्व परिचर्या व चर्मरोग यांसारख्या चिकित्सालयांत वारंवार अल्प भेटी आवश्यक असतात तर अंतर्गत वैद्यक (शस्त्रक्रिया आवश्यक नसलेल्या रोगांचे निदान व चिकित्सा), स्त्रीरोग, मूत्र, शस्त्रक्रिया, अर्बुद (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी गाठ) यांसारख्या चिकित्सालयांत सामान्यतः दीर्घ पण थोड्याच भेटी आवश्यक ठरतात. यांखेरीज काहीत दोन्ही प्रकारच्या भेटी आवश्यक असतात. प्रत्येक चिकित्सालयात किती तपासणी खोल्या लागतील याचे निदर्शक म्हणून योजलेल्या सेवांचे विश्लेषण व रुग्ण भेटींच्या संख्येचे निर्धारण करणे महत्त्वाचे आहे.


आनुषंगिक नैदानिक व चिकित्सात्मक सेवा : सुनियोजित रुग्णालयांमुळे समाजाला होणारा मोठा फायदा म्हणजे क्ष-किरण, शस्त्रक्रिया, नैदानिक प्रयोगशाळा, श्वसन चिकित्सा, भौतिकी चिकित्सा, औषधालय, निकडीच्या सेवा व सामाजिक सेवा यांच्या पुरेशा सुविधा उपलब्ध होतात. समाजात अगोदरच उपलब्ध असलेल्या सुविधांचा पूर्णपणे तपास करून अतिरिक्त गरजा निर्धारित केल्या पाहिजेत.

 

सेवा विभाग : यात अन्न सेवा, गृहव्यवस्थापन, धुलाई, मध्यवर्ती निर्जंतुक पुरवठा, मध्यवर्ती सर्वसाधारण भांडार, इमारतींचे उपयोजन व देखरेख आणि एकूण जमिनीची निगा यांचा समावेश होतो. यांपैकी प्रत्येक सेवेचा व्यक्तींची, वाहनांची व मालाची इमारतीकडे, इमारतीपासून व सबंध इमारतीत होणाऱ्या हालचालींकडे खास लक्ष देऊन अभ्यास केला जातो. सेवा विभागांची संख्या व त्यांचे आकारमान जरी रुग्णालय अभ्यास केला जातो. सेवा विभागांची संख्या व त्यांचे आकारमान जरी रुग्णालय अभ्यास कार्यक्रमाद्वारे निर्धारित केले गेले, तरी त्यांचा अभिकल्प व स्थान लवचिक असून रुग्णालय यशस्वीपणे चालविण्यावर त्यांचा महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो.

रुग्णालयाच्या इमारतीच्या रचनेविषयी काही माहिती ‘इमारती व घरे’ या नोंदीत दिली आहे.

आधुनिक रुग्णालयाची उभारणी, देखभाल, आर्थिक व्यवस्था इ. गोष्टी इतक्या जटिल बनलेल्या आहेत की, रुग्णालयविषयक सल्लामसलत करणाऱ्या निरनिराळ्या तज्ञांनी मिळून चालविलेल्या संस्था निर्माण झाल्या आहेत.

भालेराव, य. त्र्यं. भदे, व. ग.

 

आयुर्वेदीय रुग्णालय : रुग्ण ठेवण्याच्या जागेला रुग्णागार किंवा रुग्णगृह म्हणत असत. ते प्रशस्थ जागेवर असावे. जागा पूर्व किंवा उत्तर दिशेला उतरती, काळ्या किंवा पिवळ्या मातीची असावी. त्यात वारा वाहू नये. ऊन्ह असू नये. वारा आलाच, तर एकाच दिशेने व रोग्यास सुखदायक असाच वाहील अशी रचना असावी. ते बळकट असावे. त्यात धूर व धूळ येऊ नये. रोग्याला अनिष्ट असे शब्द ऐकायला येता कामा नयेत. दुर्गंध तसेच अनिष्ट असे शब्द ऐकायला येता कामा नयेत. दुर्गंध तसेच अनिष्ट स्पर्श, रस व दृश्येही तेथे असू नयेत. सर्व घर पवित्र असावे. त्या गृहाला शौचकूप, स्नानगृह, स्वयंपाकगृह जोडूनच असावे तेथील कर्मचारी शीलवान, पवित्र आचाराचे, प्रेमळ, दक्ष, दुसऱ्याची मर्जी सांभाळणारे, नेहमी जवळपास असणारे, प्रसंगास योग्य ते करण्याची बुद्धी व कुशलता असणारे, आपापल्या कर्मांत निर्मलत्व, शुद्धता राखणारे असावेत. रोग्याला झोपवणे, उठवणे, अंग चोळणे, स्नान घालणे यांत घालणे यांत व स्वयंपाक करण्यात तसेच औषध देण्यात कंटाळा न करणारे असावेत. तसेच गाणे, वाद्ये, श्लोक, गाथा, आख्यायिका, इतिहास, पुराण यांचे अभ्यासी, रोग्याचा अभिप्राय जाणणारे, रोग्याला पसंत असणारे, देश काल जाणणारे असावेत. जवळच्या नातेवाईकांनी रोग्याला इष्ट ते करून रोगहरण कार्यास सहाय्यभूत व्हावे. इतरही साधनसामग्री रुग्णगृहात असावी. शोधनशमन कर्माची उपकरणे, औषधे असावीत, शस्त्रकर्माचीही साधने असावीत.

आयुर्वेदीय रुग्णागार कसे असावे हे वरवर अगदी संक्षेपाने दाखविले आहे. शास्त्राकारांच्या विचारसरणीला अनुसरून आजचे रुग्णालय कसे असावे हे पुढे थोडक्यात दाखविले आहे.

 

आयुर्वेदीय रुग्णालय कसे असावे : रुग्णालयाची जागा वर सांगितल्याप्रमाणे प्रशस्त असावी. रुग्णालयातील जमीन, भिंती, खिडक्या, छत इ. व एकंदर वातावरण रुग्णालयाभोवतालचे दृश्य रोग्याच्या शरीरातील दोषशामक असावे. रुग्णालयात रोगी दाखल होताच भोवतालच्या परिस्थितीचा दृष्टी इ. पंच ज्ञानेंद्रियांवर दोषशामक असा परिणाम होण्यास सुरुवात झाली पाहिजे. रुग्णालयातील दृश्ये, हवा, पाणी, शब्द, स्पर्श, गंध ही सर्व त्या त्या दोषांची शामक असली पाहिजेत. ते स्वभावतःच दोषविरहित चिकित्सा करणारे व वैद्यास व्याधिविपरीत चिकित्सा करण्यास आपोआप सहाय्यभूत ठरणारे असे असले पाहिजे. त दालन प्रत्येक क्षणाला प्रतिश्वासागणिक, प्रतिशब्दागणिक, प्रत्येक दृष्टिक्षेपात दोषशामक म्हणून ठरले पाहिजे.

त्रिदोष सिद्धांत हा निदानचिकित्सेचा गाभा आहे. कफज, पित्तज, वातज आणि सन्निपातन असे चार प्रकार मुख्यतः प्रत्येक विकाराचे असतात. उपचार करताना जर भोवतालचे वातावरण उपचारांना अनुरूप नसेल, तर योग्य उपचारही निष्फळ ठरतात. म्हणून रुग्णविभाग निदान चार प्रकारचे असावेत, ते कफज, पित्तज, वातज व सन्निपातज असे रुग्णविभाग असावेत.

शिवाय वातपित्त, कफवत अशा द्वंद्वज दोषांनी झालेल्या विकारांकरताही तत्तद्दोषगुणविपरित रुग्णविभाग आवश्यक आहेत. ते मात्र रुग्णालयाच्या विस्तारावर अवलंबून आहेत.

थोडक्यात कल्पना यावी म्हणून कफ, पित्त, वात, सन्निपात अशा मुख्य चार प्रकारांना अनुसरून रुग्णविभाग कसे असावेत हे येथे दाखविले आहे. आधुनिक रुग्णालयात फोनो, टेपरेकॉर्डर, ट्रँन्झिस्टर इ. साधनांनी सुंदर, सुंदर गाणी ऐकविण्यात येतात. ह्यातच सुधारणा करून रुग्णांना ऐकविण्यात येणाऱ्या, गाण्यांचा राग हा रुग्णदोषनाशकच असावा. कफज रुग्णांच्या दालनातील विजेच्या दिव्यांचा प्रकाश हा साक्षात् व तीव्र तर पित्तज रुग्णांच्या दालनातील प्रकाश हा परावर्तित व सौम्य असला पाहिजे, परिचारकदेखील त्या त्या रुग्णविभागाला अनुकूल स्वभावाचे असावेत. त्यांचे पोषाखही अनुकूल रंगांचे असावेत.

 

कफरुग्ण विभाग : या विभागात कफवृद्धीप्रमाणेच धातुवृद्धीच्या दृष्टीने रस, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र वृद्धीचे रुग्ण तसेच तज्जन्य विकारांचे रुग्ण ठेवता यावेत. उदा., स्त्रोतोरोधजन्य कामला, अग्निमांद्य, कफज्वर, अंगगौरव, श्वास, कास, अतिनिद्रा, गंडमाला, अर्बुद, मेदोवृद्धी, अश्मरी इत्यादी.

प्रस्तुत विभाग पश्चिमाभिमुख असावा कारण पश्चिमेकडील वारे कफमेदोविशोषण करणारे असतात. ते ज्या ऋतूत वाहतात त्या वेळी त्यांचे सेवन केल्याने ते कफघ्न होतात. वरील विकारनाशक चिकित्सेला त्यांची मदत होते. पूर्वेकडील वारे मात्र कफवर्धक असतात. त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून दालनाच्या खिडक्या बंद कराव्यात. ते बारे रोग्याने टाळावे.

जोते १·५ मी. उंचीचे असावे. भिंती एका विटेच्या २५ सेंमी. रूंदीच्या असाव्यात म्हणजे उन्हाने लवकर तापतील व आत ऊब राहील. हिवाळ्यात शेगड्यांची व्यवस्था करावी. दालनाच्या भिंती, खांब, तक्तपोशी ही ओबडधोबड असावीत. दालनाची उंची ३·६ मी. ते ३·९ मी. असावी. खिडक्या, दरवाजे, खाटा, लाकडी सामान हे साग, बाभूळ, खैर, शिसव, टेटू, निंब अशा तुरट, कडू रसाच्या, रुक्ष व कठीण झाडांचे बनवावे, ही झाडे कफनाशक असतात. यांपैकी ज्या झाडाचा वास रुग्णाला आवडत असेल त्या झाडाच्या लाकडाची खाट त्याला देता आल्यास अधिक चांगले. त्यावर त्याच झाडाच्या लाकडी फळ्या व वर काथ्याच्या गाद्या व उशा असाव्यात. अंथरण्यास व पांघरण्यास जाडीभरडी चादर असावी. मात्र फार त्रासदायक होणार नाही इकडे लक्ष द्यावे. अंगातील कपडे जोडेभरडे व खरबरीत असावेत. नित्योपयोगी सामान, चित्रे, त्यांच्या चौकटी यांना तांबडा, काळा, जांभळा मळकट पण गडद असे रंग असावेत. खिडक्यांच्या काचा खडबडीत व वरीलप्रमाणेच गडद रंगांच्या असाव्यात, दिवेही त्याच रंगाचे पण झगझगीत प्रकाशाचे असावेत.

भिंतीवर सडसडीत अंगकाठीच्या, नित्य कष्ट करणाऱ्या पण आनंदी वृत्तीच्या स्त्री-पुरुषांची अनेक व्यवसाय करीत असतानाची चित्रे वर सांगितलेल्याच रंगांत असावीत.

श्रम, व्यायाम यांचे सुपरिणाम व आलस्यादीचे दुष्परीणाम, कफप्रकृतीचे दोष, रोग, तिची कारणे ही नाहीशी करावयाचे नित्याचे आहारविहारादि उपचारांचे दर्शन होईल अशी चित्रे, तसेच शास्त्रातील किंवा वैद्याने रचलेली नेहमी तोंडात घोळतील अशी छोटी छोटी वचने, श्लोक, म्हणी त्या भिंतीवर वर सांगितलेल्या रंगांत लिहून लावाव्यात. ह्यामुळे रोग्याचा वेळ कामी लागेल, त्यास ज्ञान मिळेल व त्याची करमणूकही होईल.


कफरुग्ण विभागाच्या भोवताली रूक्ष व रेताड अंगण असावे. लांब कडेला, प्रथम उल्लेखिलेली निबांदी झाडे, तसेच आघाडा, साग वायवर्णा, रूई यांच्या गणांतील झाडे असावीत व जवळ कडेला कफनाशक उग्र वास असलेल्या पिंपळी, तुळस यांच्या वर्गातील वनस्पती व वेली असाव्यात. या ताज्या वनस्पतीचा उपयोग रोगानुसार पोटातून, लेप इ. रूपांनी करता येतो. रोग्याजवळ तुळस, रानतुळस, बेलफळ, निर्गुडी इ. वास येणाऱ्या वनस्पती ठेवाव्यात. रोग्याला वेखंड, लसूण इत्यादींच्या माळा घालाव्यात. हीना, मस्क यांसारख्या अत्तराचा किंवा तगर, देवदार, तुळस, दालचिनी इत्यादींच्या तेलाचा बोळा त्या रुग्णाच्या उशाजवळ ठेवावा. कस्तुरी व अगरूच्या डब्या तेथे असाव्यात. कफनाशक सुगंधाचा वेळोवेळी परिणाम घडवून आणावा. त्यांतूनही रोग्याला इष्ट तो सुगंध निवडणे फारच चांगले. विशेषतः फुप्फुस, डोके, नाक यांतील विकारांत ही व्यवस्था जरुर करावी.

सकाळ-सायंकाळ कडुनिंबाची पाने, मोहऱ्या, देवदार, गुग्गुळ, ऊद अशांचा धूप सर्वच रुग्णालयात द्यावा. फोनो, रेडिओ इत्यादींनी वीर, रौद्र, भयानक, करूण, अद्भूत, बीभस्त रसांची गाणी ऐकवावीत. त्याच प्रकारच्या कादंबऱ्या, लघुकथा, नाटके इ. वाङ्मय वाचणायस द्यावे.

 

पित्तरुग्ण विभाग : या विभागात पित्ताने झालेले पित्तज्वर, रक्तपित्त, रक्ततिसार, रक्तप्रदर, रक्तार्श, दाह, तृष्णा, पांडू, कामला, विसर्प इ. रोगांचे रोगी ठेवावेत. या विभागाचे दरवाजे उत्तरेला व दक्षिणेला असावेत. या विभागांतील रुग्णांना या वाऱ्याचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने त्यांना जाणीव देऊन त्याची रीती सांगावी.

जोते इतर विभागांच्या जोत्यापेक्षा उंच म्हणजे २ मी. असावे. वर प्रशस्त गच्ची व खाली तळघर ठेवावे. चारी बाजूंनी प्रशस्त व्हरांडा व व्हरांड्यात वारा चारही बाजूंनी भरपूर वाहील अशा तऱ्हेची जाळी त्याला असावी भिंती दोन विटांच्या असाव्यात. त्या दोन विटांच्या मध्ये पोकळी ठेवून त्यामध्ये मातीचा खर असावा. बाहेर व आत विटांच्या दोन भिंती व मध्ये मातीची भिंत अशा तीन पोटभिंतींची एक भिंत असावी. यांमुळे दालनात उन्हाळ्यात समशीतोष्ण राहील. खिडक्यांच्या खालीही वातायने असावीत. वारा भरपूर यावा असे वाटेल तेव्हा ते उघडता येते. नको त्य वेळेला बंद ठेवावे. भिंतीला १·२ किंवा १·५ मी. उंच संगमरवरी फरशी बसवावी. तळालाही तीच असावी. दालनाच्या भिंती, खांब, तक्तपोशी हे उत्कृष्ट पॉलिश केलेले असावे व त्यावर आकर्षक नक्षीचे काम केलेले असावे. भिंतीचा रंग फिक्कट हिरवा, निळसर, अस्मानी, फिकट गुलाबी वा निळा असावा. भिंती व तक्तपोशीवर शांत, सौम्य, उदात्त व आनंदी अशी चित्रे असावीत. त्यांत हिमालयाची धवल शिखरे, हिरव्यागार डोंगरांच्या कुशीताल स्वच्छ जलाशय, शुद्ध द्वितीया व पौर्णिमेच्या चंद्राचा देखावा, काश्मीर, गोवा येथील सृष्टिसौंदर्याची स्वाभाविक रंगांत चितारलेली दृश्ये असावीत. ती सौम्य, शांत, आनंदी भाव व्यक्त करमारी असावीत. त्यांच्या चौरटी, तसेच इतर सामान यांचे रंग वरील रंगांपैकी असावेत. तक्तपोशीला झुंबरे असावीत. दिव्यांचा प्रकाश सौम्य, परावर्तित व निळ्या छटेने युक्त असावा. पित्तप्रकृतीचे दोष व रोग, त्यांची कारणे, त्यांचे उपचार, पथ्थे व आहारविहार यांचे ज्ञान होईन अशी चित्रे, तक्के, छोटी बोधक वचने, म्हणी, श्लोक भिंतीवर लावावेत. घड्याळ नादमधुर टोले व स्वर काढणारे, तसेच आकर्षक असावे. खिडक्या,दरवाजे,खाटा, इतर लाकडी सामान उंबर, वड इत्यादी पित्तशामक झाडांपासून तयार केलेले असावे किंवा सागादी वृक्षांच्या जोडीला त्यांचा योग्य तेथे उपयोग करावा. कडू व तुरट रसच्या इतर झाडांचाही उपयोग करावा. अनुकूल वासाचे सामान हे रुग्णाला द्यावे. रुग्णांना नवारीच्या खाटा, सावरीच्या मऊ कापसाच्या गाद्या वा पिसांच्या उशा अधिकच उपयुक्त होत. कपडेही मऊ व तलम असावेत. पित्तविभाच्या भोवती मैदान मोठे, विस्तृत व हिरवेगार असावे जमिनीवर दुर्वांचे गवत असावे. मध्ये पित्तशामक सुगंधी वास असलेल्या वेलींच्या जाळ्यांनी युक्त रूंद कमानी व आत बसण्यास सुखासने असावीत, अनेक कारंजी असावीत. त्यांवर वरील प्रकारच्याच प्रकाशाचे झोत रात्री टाकावेत. बागेच्या दूरच्या व बाजूच्या कडांना उंबर, वड, बकुळ, सोनचाफा, आंबा, केवडा इ. सुगंधी फुलांची झाडे व जवळच्या कडांना पारिजातक, रातराणी, अनंत अशी झुडपे व गुलाब, गुलछबू, मोगरा इ. थंड वास असणाऱ्या वनस्पती लावाव्यात. मधून कमळाची छोटी कुंडे असावीत. बागेच्या कुंपनाला व व्हरांड्याच्या जाळ्यांच्या जवळही कृष्णकमळासारखी नैसर्गिक कलाकुसरीची व सुगंधी फुले असणाऱ्या वेली असाव्यात. उन्हाळ्यात व विशेषतः दुपारी हिरवळीवर गारावा राहील याकरिता पाणी शिंपडावे. उन्हाळ्यात खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावावेत. जरुर वाटल्यास त्यावर पाणी शिंपडावे.

रोग्याजवळ वरील फुले वा मोहोर यांचे गुच्छ, सुंदर अशा फुलदाणीत ठेवावेत. त्यांच्या माळासुद्धा रोग्याच्या गळ्यात घालाव्यात. वाळा, गुलाब, मोगरा इ. अत्तरे हातास लावावीत किंवा त्यांचा बोळा तसेच चंदन, वेलची इत्यादींच्या तेलाचे बोळे उशीजवळ असावेत. हास्य, शांत व अनुत्तान शृंगार रसाचा परिपोष करणाऱ्या रोगाची गाणी व वाद्ये ऐकावीत. सकाळ-संध्याकाळ चंदनाची धुरी द्यावी. दुपारी तळघर व रात्री गच्ची यांचा उपयोग जरूरीप्रमाणे करावा. परिचारकांचे पोषाखही वर सांगितलेल्या रंगांचेच असावेत.

 

वातरुग्ण विभाग : या विभागात वाताने झालेले वातज्वर, अधोग रक्तपित्त, वातार्श असे व कंप, आक्षेपक, धनुर्वात, अवबाहुक ह्या प्रकारचे वातरोगी व धातुक्षयाचे तसेच जीर्ण विकारांचे रोगी ठेवावेत.

या विभागाचे दरवाजे पूर्व व उत्तर दिशेला असावेत. पण इतर विभागांपेक्षा या विभागात वारा फारसा खेळता असू नये. या विभागात नेहमी ऊब असली पाहिजे. व्हरांडाही ऊबदार असावा, दरवाजे व खिडक्या लहान असाव्यात. खिडक्या सामान्य उंचीपेक्षा अधिक उंचीवर असाव्यात. वाऱ्याचा संपर्क टाळणेच हिताचे असते, त्याबद्दल रोग्यांना निश्चित कल्पना द्यावी. तसे पाहिले, तर या रोग्यांना वारा स्वभावतःच नकोसा वाटतो.

या विभागाचे जोते ०·६ मी. उंच असावे. जोते भरताना काळी किंवा तांबडी किंवा मिश्र माती वापरावी. जमिनीवर फरशी बसवू नये. भिंती मातीच्या व जाड असाव्यात. वर माळा व त्यावर कौलारू छप्पर असावे. उंची ६ मी. ते ८ मी. असावी. वर झरोके असावेत. तळापासून ०·५ मी. च्या वरती २·५ मी. उंचीपर्यंत भिंतींना किंवा सागाचे खांब असल्यास त्यांना वातमनाशक लाकडी फळ्यांचे आवरण असावे. भिंतींना तांबडा, पिवळा वा केशरी रंग लावाव. दिवे, खिडक्या, काचा, छायाचित्रे, चित्रे, वचने तसेच परिचारकांच्या पोषाखाचे रंग वरीलप्रमाणे आलटूनपालटून असावेत. चित्रे व छाया चित्रे रेखीव अवयवांचे पुष्ट स्त्री-पुरष व पशु-पक्षी यांची असावीत. तशाच प्रकारचे पुतळेही भोवताली असावेत. वातरोगाची कारणे, पथ्यापथ्य इत्यादींची त्रोटक वचने, म्हणी असलेले तक्ते भिंतीवर असावेत. भिंतीवरील घड्याळ नादमधुर व आकर्षक टोले देणारे असावे. तक्तपोशी लाकडी कलाकुसरीची असावी. तिला व भिंतीच्या आवरणाला देवदार, बेल, शिसव, अळशी यांचे तेलपाणी द्यावे. दरवाजे, खाटा इ. लाकडी सामान वरीलपैकी योग्य त्या लाकडाचे असावे व त्यांना वरीलप्रमाणेच तेलपाणी द्यावे. हे सर्व सामान आकर्षक व सुबक असावे. खाटा नवारीच्या व गाद्यागिरद्या मऊ साध्या कापसाच्या असाव्यात. वर अंथरण्यास व पांघरण्यास लोकरीचे कपडे असावेत. अंगातही लोकरीचे कपडे आवश्यक आहेत. भिंतींना जमिनीच्या खाली कोनाडे ठेवून त्यांत या शेगड्या ठेवाव्यात. वात विभागाच्या भोवतालच्या अंगणाला उंच भिंती असाव्यात. वारा भिंतींना अडवला जावा हाच हेतू. भिंतीच्या जवळच काजू, बिब्बा, निर्गुडी, देवदार, रुई, पंचमुळे इ. उष्णस्वभावी झाडे लावावीत. तुळशी, आले, लसूण इ. व्हरांड्याजवळ लावावीत. ओलावा फार असू नये.


रोग्याजवळ निर्गुडी, कवठ, सब्जा, तुळस, लसूण इत्यादींचे गुच्छ ठेवावेत. उशीजवळदेखील त्यांचा पाला ठेवावा. त्यांच्या गळ्यात माळा घालाव्यात. कस्तुरी, अगरू ही द्रव्ये तसेच दालचिनी, ओवा इत्यादींच्या तेलाचा बोळा जवळ ठेवाव. हीना, मस्कसारखे उष्ण अत्तर लावावे.

सकाळ-सायंकाळ निर्गुडी, देवदार, बिब्बा, रुई यांची धुरी द्यावी. अनुत्तान, शृगार, वीर, हास्य, शांत रसाची व भावुक, भक्तियुक्त अशी गीते व वाद्ये वाजवावीत.

 

सर्वदोषज-त्रिदोषज रुग्णविभाग : कफविभाग उष्ण व रुक्ष, तर वातविभाग उष्ण स्निग्ध आणि पित्तविभाग याच्या उलट म्हणजे थंड असावा असे आपण पाहिले. त्रिदोष विभाग मात्र केवळ उष्ण वा थंड असा नसावा, तो समशीतोष्ण असावा. या विभागात त्रिदोषज रुग्ण असावेत. या विभागाच्या भिंती मातीच्या व खूप (०·६ मी. ते ०·९ मी.) जाड असाव्यात. उंची ६ मी.ते ८ मी.माळ्यासह असावी. दरवाजे दक्षिणेला व उत्तरेला असावेत पण वाऱ्यापासून रोगी संरक्षित असावा. निवांत व उष्णताविरहित दालन असावे. दालनाभोवती व्हरांडा असावा. व्हरांडा व दालन यांची दारे किंवा खिडक्या एकमेकांसमोर नसाव्यात. वाऱ्याचा झोत आत जाऊ नये. तळाला लाकडी फळ्या असाव्यात. जमीन लाकडी असावी. रंग पांढरा शुभ्र पण फिकट असावा. समप्रकृतीच्या, मध्यम उंचीच्या, पुष्ट, सावळ्या, आरक्त रंगाच्या, हसऱ्या स्त्री-पुरुषांची अनेक प्रसंगाची चित्रे असावीत. ती सौम्य, आनंदी, सुंदर असवीत. इतर चित्रांमध्ये फिकट, निळ्या, अत्मानी, गुलाबी रंगांच्या छटा असाव्यात अशी सुंदर चित्रे छत व भिंती यांवर सर्वत्र असावीत. दुधी दिवे किंवा परावर्तित सौम्य प्रकाश असावा. घड्याळ नादमधुर पण हलक्या आवाजाचे असावे. बेल, शिवण, टेटू, नंदीवृक्ष, कृष्णागरू सातवीण या झाडांच्या लाकडांचा किंवा मुळ्यांचा उपयोग जमिनीचा तळ, खाटा, खिडक्या इत्यादींकरिता व शक्य असेल तेथे सागाच्या लाकडाचे जोडकामाकरिता उपयोगात आणाव्या. गाद्या, उशा व इतर कपडे नेहमीच्या कापसाचे असावेत. दवण्याचे गुच्छ पुष्पपात्रात ठेवावेत. हदगा, दवणा, पारिजातकाची फुले उशीजवळ ठेवावीत.

भोवतालच्या अंगणात बेल वगैरे व हदगा, तसेच पडवळ, शतावरी, पिंपळी, साखरपेटी, दुध्या भोपळा, मुंगुसवेल, चांदवेल इ. वेली कुरडू, चिकणा, गणिकारी (नरवेल) इ. वनस्पती लावाव्यात. तसेच कफपित्तवातविभागांतील वनस्पती त्याच दोषक्रमाने लावाव्यात. मात्र ज्यांना पाणी भरपूर पाहिजे त्या लावू नयेत भोवताली गारवा निर्माण होऊ नये याबद्दल खबरदारी घ्यावी. रोग्याजवळ बेल इ. वनस्पती ठेवाव्यात. त्रिदोषनाशक कार्य करतील अशांचा एकत्रगुच्छ ठेवावीत. तशाच त्या उशीजवळ असाव्यात. त्यांच्या माळा घालाव्यात. एक, दोन, तीन मिळून त्रिदोषनाशक होतील अशी अत्तरे एकत्र करून त्यांचा फाया ठेवावा. सुगंधी तेलांचाही असाच उपयोग करावा. पित्तशामक भावांचा परिपोष करणाऱ्या रागांची गाणी व वाद्ये ऐकवावीत. सकाळ-सायंकाळ त्रिदोषघ्न सुगंधी द्रव्यांची धुरी सर्वत्र द्यावी. परिचारकांचे पोशाख पांढरे स्वच्छ असावेत.

त्रिदोषज व द्विदोषज विकारांत जो दोष प्राबल्याने असेल तो रोगी त्या दोषाच्या दालनात ठेवण्यास हरकत नाही. पण तो दोष कमी होताच शेषदोषांच्या दालनात हलवावा.

रुग्णालय जसजसे मोठे असेल तसतसे अनेक विभाग दोषानुरूप द्विदोषज व विकारानुरूप त्या त्या विकारांना अनुसरून कुष्ठ, वातरक्त, उन्माद, अपस्मार इ. असे निरनिराळे विभाग वाढवता येतात. (चित्रपत्रे ३८, ३९).

जोशी, वेणीमाधवशास्त्र

पहा : आरोग्यभुवन रुग्णपरिचर्या.

संदर्भ : 1. Bouwcentrum. General Hospital, Amsterdam. 1961.

    2. Friedson. E. Ed. The Hospital in Modern Society, New York. 1963.

  3. Georgopoulos, B. S: Mann, F. C. The Community General Hospital, New York, 1962.

  4. Knowles, J. H. Ed. Hospitals. Doctors and the Public Interest, Cambridge, Mass., 1965.

  5. MacEachern, M. T. Hospital Organization and Management, Berwya. III. 1969.

  6. Owen, J. K. Ed. Modern Concepts of Hospital Administration, Philadelphia, 1962.

  7. Peters, J. P. A Guide to Strategic Planning of Hospitals. Chicago, 1979.

  8. Redstone, L. G. Ed., Hospitals and Health Care Facilities, New York, 1978.

  9. Rosenfield I. Hospital Architecture and Beyond. New York, 1969.

10, Sioan, R. P. Today’s Hospital, New York, 1966.


 टाटा कर्करोग रुग्णालयाची इमारतहिंदुजा रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राची इमारततळेगाव दाभाडे येथील ग्रामीण रुग्णालय.बाह्य रुग्ण विभागातील विकृतिवैज्ञानिक प्रयोगशाळाफिरत्या रुग्णालयातील दंतचिकित्साबहूद्‌देशीय फिरते रुग्णालय


पुरुष रुग्ण विभागबालरुग्ण विभागप्रसूति-विभागातील अर्भक कक्षअतिदक्षता विभागबिनतारी संदेशवहन व इतर आवश्यक सेवा उपलब्ध असलेला नऊ रुग्णशय्यांचा आणीबाणी विभागदोन रुग्णांवर चालू असलेला रक्त-अपोहनाचा उपचार