कोर्नबर्ग, आर्थर : (३ मार्च १९१८–    ). अमेरिकन वैद्य व जीवरसायनशास्त्रज्ञ. वैद्यक व शरीरक्रियाविज्ञान या विषयांचे १९५९ चे नोबेल पारितोषिक डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लावरील [डीएनएवरील  → न्यूक्लिइक अम्ले] संशोधनाबद्दल कोर्नबर्ग यांना सेव्हेरो ओचोआ या शास्त्रज्ञांबरोबर विभागून मिळाले. 

त्यांचा जन्म न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथे झाला. त्यांनी १९३७ मध्ये न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेजमधून बी.एस्.पदवी व १९४१ मध्ये रॉचेस्टर विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळविली. त्यांनी १९४२–५३ या काळात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, मेरिलँड येथे जीवरसायनशास्त्रविषयक संशोधनकार्य केले. १९४७ मध्ये एंझाइमे (जीवरासायनिक बदल घडविण्यास मदत करणारी संयुगे) व चयापचय (सजीवामध्ये सतत घडणारे भौतिक व रासायनिक बदल) ह्याविषयीच्या अभ्यास विभागाचे ते प्रमुख होते. १९५३ मध्ये ते सेंट लूइस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात सूक्ष्मजीवविज्ञान शाखेत प्राध्यापक झाले. नंतर १९५९ मध्ये कॅलिफोर्नियातील स्टॅनफर्ड विद्यापीठात जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.

डीएनए हा प्रत्येक जिवंत कोशिकेचा (पेशीचा) तसेच विषाणूंचा (अतिसूक्ष्म जीवांचा, व्हायरसांचा) जननिक (आनुवंशिक) पदार्थ आहे. कोशिकाकेंद्रातील गुणसूत्रांमध्ये (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमध्ये) याचा ९९ टक्के संचय झालेला असतो. डीएनएच्या रेणु-संरचनेत (रेणूतील अणूंच्या मांडणीत) एका पिढीकडून पुढच्या पिढीस मिळणारी आनुवंशिक माहिती सांकेतिक रीत्या दिली जाते. प्रत्येक कोशिकेत विशिष्ट डीएनए साखळ्या कशा तयार होतात हे कोर्नबर्ग यांच्या संशोधनाद्वारे स्पष्ट झाले. १९५५–६० पर्यंत ‘डीएनए पॉलिमरेज’ या एंझाइमाविषयी त्यांनी संशोधन केले व ते अतिशुद्ध स्वरूपात तयार करून दाखविले. १९६७ मध्ये परीक्षा नलिकेत संक्रमणशील व पूर्ण क्रियाशील विषाणुजन्य डीएनए तयार करण्यात त्यांनी यश मिळविले. पिरिमिडीन न्यूक्लिओटाइडांच्या संश्लेषणास (कृत्रिम रीतीने तयार करण्यास) मदत करणारी एंझाइम विक्रिया, प्युरीन न्यूक्लिओटाइडाच्या संश्लेषणातील महत्त्वाचा मध्य पदार्थ व सूक्ष्मजंतूतील मोठा रेणुभाराच्या पॉलिफॉस्फेटांच्या संश्लेषणास मदत करणारे एंझाइम यांचे शोध लावून कोर्नबर्ग यांनी जीवरसायनशास्त्राच्या विविध क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी केली आहे. 

या सर्व संशोधनकार्यात त्यांच्या पत्नी सिल्व्हिया यांचे त्यांना फार साहाय्य झाले. १९५७ साली नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना वॉल लूइस पारितोषिक (१९५१), न्यूयॉर्क, रॉचेस्टर, नॉटरडॅम, बार्सिलोना इ. ठिकाणच्या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या व वाइझमन इन्स्टिट्यूट (इझ्राएल) या संस्थेचे सन्माननीय फेलो हे बहुमान मिळालेले आहेत.

कानिटकर, बा. मो.