कँडिटफ्ट : (इं. कॉमन ॲन्युअल कँडिटफ्ट, राकेट कँडिटफ्ट लॅ. आयबेरिस अमारा कुल-क्रुसिफेरी). या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक एकवर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ओषधी  [→ ओषधी] मूळच्या यूरोपातील (स्पेन, आयबेरिया) असून त्या उत्तर व दक्षिण आफ्रिकेतही  आढळतात. हल्ली शोभेकरिता बागांतून अनेक जाती व प्रकार लावले जातात आयबेरिस अमारा ही  जाती भारतात सामान्यपणे बागेत लावलेली आढळते. तिची काही लक्षणे सामान्यपणे इतर जातींतही  आढळतात. [→ क्रुसिफेरी]. ती सु. १५–३० सेंमी. उंच, ताळ व शाखायुक्त आणि कडू असते. पाने  साधी, सु. २·५–१० सेंमी. लांब पण अरुंद, काहीशी खंडित व दातेरी असतात. फुले लहान व पांढरी  असून सपाट गुलुच्छ व नंतर लांबट मंजरीसारख्या फुलोऱ्यात येतात [→ पुष्पबंध] फुलांच्या  बाहेरच्या दोन दोन पाकळ्या मोठ्या असतात. आ. ओडोरॅटा  या जातीची फुले सुगंधी असतात. शुष्क फळ (सार्षपक) लहान व गोलसर बिया किंचित सपक्ष. आ. सेम्परव्हायरेन्स  बहुवर्षायू (अनेक वर्षे  जगणारी) असून तिची फुले पांढरी किंवा निळी असतात. आ. अंबेलॅटा  या जातीची फुले गुलाबी  किंवा जांभळी असतात. एम्प्रेस, व्हाइट स्पायरल, जायंट स्‍नोफ्लेक हे प्रकार उंच असून त्यांचे फुलोरे  दाट व लांब असतात. टॉमथम्ब व लिटल प्रिन्स हे प्रकार खुजे आहेत. या सर्व जाती वाफ्यात  लावण्यास चांगल्या. हलकी निचऱ्याची जमीन व भरपूर सूर्यप्रकाश सर्व जातींना मानवतो. बी पेरून  केव्हाही लागवड करता येते. सामान्यपणे मे-जूनमध्ये बहर येतो फुलांच्या भिन्नभिन्न रंगांचे प्रकार  बागेत हौसेने लावतात.

ही ओषधी संधिवात आणि संधिवायूवर (गाउटवर) उपयुक्त असून काही होमिओपॅथिक  औषधांतही वापरतात. बी दमा व श्वासनलिकादाहावर वापरतात. 

जमदाडे, ज. वि.

कँडिटफ्ट