शुंग वंश : भारतातील प्राचीन मगध प्रदेशावर इ.स.पू. १८७ ते इ.स.पू. ७५ दरम्यान राज्य करणारा एक राजवंश. त्यांच्याविषयीची काही माहिती पुराणे, गार्गी संहिता, पतंजलीचे महाभाष्य, कालिदासाचे मालविकाग्निमित्र, बाणभट्टाचे हर्षचरित व दिव्यावदान ह्यांतून मिळते. अखेरचा मौर्य राजा बृहदरथ याचा सेनापती पुष्यमित्र शुंग (कार. १८७–१५१ इ.स.पू.) याने बृहदरथाचा वध करून मगधाची (पाटलिपुत्र) गादी बळकाविली. हाच शुंग वंशाचा मूळ पुरुष. पुष्यमित्राने आपला अंमल उत्तर भारताच्या बहुतेक भागांवर बसविला. त्याने दोन अश्वमेध यज्ञही केले. दुसऱ्या यज्ञाच्या वेळी त्याचा यज्ञीय अश्व सिंधू नदीच्या तीरावर ग्रीक आक्रमकांनी अडविला तेव्हा त्याच्या वसुमित्रनामक नातवाने त्यांचा पराभव करून तो सोडविला आणि अश्वमेध यज्ञ तडीस नेला. पुराणानुसार पुष्यमित्राने छत्तीस वर्षे राज्य केले. पुष्यमित्राच्या कारकीर्दीत त्याचा पुत्र अग्निमित्र मध्य भारतात विदिशा येथे प्रांताधिपती होता. त्या वेळी विदर्भात यज्ञसेन आणि माधवसेन या चुलतभावांत संघर्ष उदभवला. त्या वेळी अग्निमित्राने माधवसेनाचा पक्ष घेऊन विदर्भावर सैन्य धाडले व यज्ञसेनाचा पराभव केला आणि त्या दोन भावांत विदर्भाची वाटणी करून त्यांना आपले मांडलिक बनविले. त्यानंतर माधवसेनाची भगिनी मालविका हिच्याशी त्याने विवाह केला. त्यांच्या प्रणयकथेवर कालिदासाचे मालविकाग्निमित्र हे नाटक आधारित आहे. अग्निमित्राने आठ वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. 

शुंग काळातील दंपतिशिल्प, भारहूत.अग्निमित्रानंतर वसुज्येष्ठ, वसुमित्र, अन्ध्रक(भद्रक), पलिंदक, घोष, वज्रमित्र, भागवत व देवभूती या आठ शुंग राजांनी मगधावर राज्य केले परंतु त्यांच्या कारकीर्दीविषयी फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही तथापि विदिशेस सापडलेल्या दोन गरुडस्तंभांवरील कोरीव लेखांत दोन शुंग राजांविषयी काही उल्लेख आढळतात. त्यांपैकी पहिल्या लेखात (बेसनगर) तक्षशिलेच्या अँटिआल्किडस नावाच्या यवन राजाने आपला हीलिओडोरस हा दूत विदिशेच्या काशीपुत्र भागभद्र याच्या कारकीर्दीच्या चौदाव्या वर्षी विदिशेस पाठविला होता, असा उल्लेख आहे. हा हीलिओडोरस आपला उल्लेख भागवत (विष्णूपासक) असा करतो. भागभद्र नावाविषयी विद्वानांत मतभेद आहेत पण काहींच्या मते तो शुंग राजा भद्रक असावा. दुसऱ्या लेखात भागवत राजाच्या बाराव्या शासनवर्षाचा उल्लेख आहे. हा भागवतनामक नववा शुंग राजा होय. 

शेवटचा शुंग राजा देवभूती याच्या वसुमित्र नावाच्या अमात्याने त्याचा कपटाने वध करून गादी मिळविली आणि कण्व वंशाची स्थापना केली. रा.गो. भांडारकर, रॅप्सन आदी विद्वानांच्या मते शेवटचे शुंग राजे व कण्व हे समकालीन होते. कण्वांनी शुंग राजांचे नाममात्र स्वामित्व स्वीकारून स्वतंत्रपणे राज्य केले. 

शुंग काळात पुष्यमित्राने यवनांचे आक्रमण थोपवून, मगध साम्राज्याचे रक्षण केले. त्यानंतर शुंग व यवन राजांचे सख्य नांदले. या काळात वैदिक यज्ञयागांना उत्तेजन मिळाले. पुष्यमित्राने वैदिक यज्ञसंस्थेचा व भागवत धर्माचाही पुरस्कार केला. त्यामुळे वैदिक धर्म व भक्तिपंथ यांचा समन्वय घडून तो लोकप्रिय करण्यासाठी पुराणे निर्माण झाली. या काळात संस्कृत भाषेला व विद्येला राजाश्रय लाभून तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे पातंजल महाभाष्यासारखे उत्कृष्ट ग्रंथ निर्माण झाले. शुंग राजांनी वास्तुशिल्पादी कलेसही उत्तेजन दिले. सांची येथील सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तूपाभोवती शुंग राजांनी सुंदर कठडे व दगडी तोरणे बांधली. ती उत्कृष्ट शिल्पांनी अलंकृत आहेत. याशिवाय भारहूतच्या स्तूपाचे बांधकाम या काळातीलच असून त्याच्या कठड्यावरील मूर्ती शुंगकालीन मूर्तिशिल्पांत लक्षणीय ठरल्या आहेत. तेथील यक्ष-यक्षिणी व देव-देवता यांच्या पूर्णाकृती प्रतिमाही प्रेक्षणीय आहेत. बुद्धाच्या जीवनातील प्रसंग तिथे कोरलेले आढळतात. सांची व भारहूत येथील तत्कालीन बौद्ध स्तूपांवरून बौद्ध धर्मही त्या काळी भरभराटीत असल्याचे स्पष्ट दिसते. यावरून शुंग राजांच्या कारकीर्दीत बौद्ध धर्माविषयी सहिष्णूवृत्ती असल्याचे आढळते. भारहूत येथील तोरणावर ‘सुंगानं रजे’ (शुंगांच्या राज्यात) असा स्पष्ट उल्लेख आहे. शुंगकालीन वास्तुशिल्पशैलीत साधेपणा व कल्पकता हे गुण प्रकर्षाने दृग्गोचर होतात. ही कला पूर्णतः भारतीय शैलीची द्योतक आहे.

पहा : पुष्यमित्र शुंग.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1960.

            2. Sastri, K. A.N. Comprehensive History of India, Vol. II, Bombay, 1957.

मिराशी, वा. वि.