हृद् रोहिणी विकार : हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिणी अरुंद होऊन त्यामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेस किंवा ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या) रचनेत बाधा आणणाऱ्या स्थितीस हृद् रोहिणी विकार असे म्हणतात. रोहिणींच्या रचनेत रोहिणीविलेपी विकार [→रक्ताभिसरण तंत्र] निर्माण झाल्याने ही स्थिती उद्भवते आणि तिचा परिणाम हृद्शूल [→ उरःशूल] किंवा हृद्स्नायूंची अल्परक्तता झाल्यामुळे ऊतकमृत्यू [→ अभिकोथ] या प्रकट विकारांमध्ये दिसून येतो. 

 

रक्तातील वसा द्रव्यांचे (मेदाचे) प्रमाण वाढल्यामुळे त्यातील वसा प्रथिनांपासून तयार झालेले पापुद्रे रोहिणीच्या अंतःस्तरावर चिकटतात. त्यावर तंतुमय ऊतकांचे आच्छादन निर्माण होऊन ते घट्ट बसतात. विशेषतः रोहिणींच्या शाखा फुटतात तेथे ही प्रक्रिया अधिक सहजपणे घडते. या बदलामुळे रोहिणीची वहनक्षमता कमी होते, तसेच आवश्यकते-नुसार आकुंचन-विस्फारण होत नसल्यामुळे ती कठीण व लवचिकपणा गमावलेली आढळते. अशा परिस्थितीत हृदयावरील कामाचा भार वाढल्यास रक्तपुरवठा कमी पडल्याने वेदना होऊ लागतात, ही स्थिती तात्पुरती असते. पापुद्य्राच्या ठिकाणी खरखरीतपणा निर्माण झाल्यास किंवा तो तडकल्यास तेथे रक्तातील बिंबाणुकोशिका चिकटून बसतात व क्लथनाची क्रिया सुरू होते. या क्लथनामुळे रक्तपुरवठा कमी होतो. तसेच क्लथन पसरत गेल्यास रोहिणीचा मोठा भाग बंद होतो. त्या भागाकडून रक्तपुरवठा झालेला भाग ऊतकमृत्यू झाल्यामुळे निकामी होतो, ही स्थिती गंभीर असते. कारण वेदनेबरोबरच, हृदयाच्या क्रियेत बाधा आल्यामुळे रक्तदाब कमी होऊन व्यक्ती कोसळून पडते किंवा बेशुद्ध होते. यातून पूर्वस्थितीस येण्यास काही आठवडे लागतात. 

 

हृद् रोहिणीच्या ह्या परिस्थितीस आहारातील स्निग्ध पदार्थांचे वाढीव प्रमाण कारणीभूत असले, तरी इतर अनेक घटक त्यास मदत करतात. स्थूलता, चाळीसपेक्षा अधिक वय, शारीरिक श्रम न घडवणारे बैठे व्यवसाय, वाढता रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, तंबाखूचे सेवन हे त्यातील काही लक्षात घेण्यासारखे आहेत. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा या विकाराचे प्रमाण अधिक असते परंतु वयाच्या ५०–६० नंतर हा फरक दिसत नाही. स्त्रियांमधील इस्ट्रोजेन व तत्सम संप्रेरकांचा संरक्षक परिणाम असावा असे मानले जाते. काही अंशी आनुवंशिक घटकही असावेत असे दिसते. महारोहिणीच्या झडपेजवळच हृद् रोहिणींचा उगम असल्यामुळे या झडपेचे संकोचन किंवा झडप नीट बंद होत नसल्याने प्रत्यावर्तन या विकारांमुळे हृद् रोहिणीत अपुरा रक्तप्रवाह वाहत असल्यास रोहिणीविलेपी विकाराची शक्यता अधिक असते. 

 

लक्षणे : हृद्शूलाच्या लक्षणांमध्ये जरी छातीत दुखणे हे मुख्य लक्षण असले तरी त्यात अनेक फरक आढळून येतात. उरोस्थीच्या मागे आवळल्याप्रमाणे किंवा दडपण आल्याप्रमाणे अस्वस्थपणा वाटतो. काही रुग्णांत ही वेदना छातीच्या डाव्या भागापुरती मर्यादित राहते इतरांमध्ये ती डावा खांदा किंवा दोन्ही खांदे, पाठीचा मध्यभाग, डावा बाहू, हाताची बोटे यांपैकी एका अगर अनेक भागांत पसरत जाते. क्वचित प्रसंगी वेदना अथवा अस्वस्थता यांपैकी कुठेही (उदा., खांद्यामध्ये) निर्माण होऊन छातीत त्याची शंकाही येत नाही. वेदनेच्या निर्मितीस शारीरिक श्रम, मानसिक ताण यांसारखे घटक कारणीभूत होतात. कधीकधी जेवणानंतर व्यायाम करणे, थंड हवा किंवा झोपेत एखादे भयदायक स्वप्न अशी निमित्तेही उरोवेदनेस पुरेशी असतात. रक्तातील हीमोग्लोबिनाचे प्रमाण बरेच कमी असेल किंवा हृद् रोहिणींच्या संकोचनामुळे ६०–७०% क्षमता कमी झाली असेल, तर विश्रांत स्थितीमध्ये काही कारण नसतानाही हृद्शूल निर्माण होतो. 

 

विश्रांती घेतल्यावर हृद्शूल काही मिनिटांनी थांबतो. तसा तो कमी होत नसेल किंवा ताण नसतानाही निर्माण होत असेल किंवा त्याचे स्वरूप वरचेवर बदलत असेल, तर त्यास अस्थिर हृद्शूल म्हणतात. अशा रुग्णांना हृद्स्नायूंच्या अभिकोथाचा म्हणजेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. इतर रुग्णांना हृदयाचे इतर काही विकार नसल्यास कित्येक वर्षे काहीही गंभीर परिणाम होत नाहीत. 

 

हृदय विकाराच्या झटक्यांची लक्षणे काहीशी हृद्शूलासारखीच असली तरी त्यात वेदनेची तीव्रता अधिक असते. अवयव चिरडल्याप्रमाणे ही वेदना असते आणि ती दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकते. विश्रांती घेऊनही कमी होत नाही. वेदनेची प्रतिक्रिया म्हणून अनुकंपी तंत्रिका तंत्र सक्रिय होते. परिणामतः छातीत धडधडते आणि सबंध शरीरास घाम फुटतो. त्वचा थंड व दमट होते. कधीकधी उलटी होते. रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे श्वासोच्छ्वास जलद होऊ लागतो, व्यक्तीची शुद्ध जाते व तो कोसळून पडण्याची शक्यता असते. कोणत्याही प्रकारची हालचाल करण्याचा प्रयत्न केल्यास लक्षणांची तीव्रता वाढू शकते. त्वरित वेदनाहारक औषध देऊन स्वस्थ पडून राहणे आणि शक्य तेवढ्या जलद वैद्यकीय मदत मिळविणे अपरिहार्य असते. 

 

निदान : रुग्णाचा पूर्वेतिहास, लक्षणे निर्माण करणारी कारणे आणि वेदनेची सविस्तर माहिती यावरून हृद् रोहिणी विकाराची शंका घेता येते.विद्युत् हृल्लेखन करून या शंकेस पुष्टी मिळू शकते परंतु या आलेखातील बदल निर्माण होण्यास काही तासांचा विलंब लागू शकतो हे लक्षात घेऊन उपचार आधीच सुरू केले जातात. वारंवार विद्युत् हृल्लेखन करून हृदयातील हानिकारक बदलांची प्रगती तपासता येते. ऊतकांच्या झिजेमुळे त्यातून बाहेर पडणारे ट्रॉपोनीन व काही एंझाइमे (क्रिॲटीन कायनेज) यांची रक्तातील पातळी वाढते. ती पाहण्यासाठी रक्ततपासणी उपयोगी पडते. हृद्शूलाच्या रुग्णांमध्ये सतत निरीक्षण करण्यासाठी हॉल्टर (संतोलक) लावून हृद्लेखनाचा आलेख मिळविता येतो. तसेच श्रमसह्यता अजमावण्यासाठी काही चाचण्या करता येतात. 


 

स्वनातीत लहरींच्या उपयोगावर आधारलेली द्विमितीय प्रतिध्वनी हृल्लेखन (2D Echocardiography) ही चाचणी हृदयाचा आकार आणि विविध भागातील आकुंचनक्षमता पाहण्यास उपयोगी ठरते. या चाचणीमुळे रक्तप्रवाहातील दोष, झडपांमधील कार्यक्षमता आणि रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हृद्स्नायूंच्या क्षतिग्रस्त भागाची कार्यक्षमता यांची माहिती मिळते. त्यानुसार औषधोपचार किंवा शल्यचिकित्सेविषयी निर्णय घेता येतो. इलेक्ट्रॉन शलाका संगणकी छेददर्शन (इलेक्ट्रॉन बीम कॉम्प्युटेड टोमोग्राफी ईबीसीटी) या चाचणीमुळे झडपांवर साठलेल्या कॅल्शियमाच्या थरांबद्दल माहिती मिळते. चुंबकीय अनुस्पंदन प्रतिमा (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग MRI) ही चाचणीही उपयुक्त आहे. तिच्यामुळे अनावश्यक किरणसंपर्क टाळून हृदयाची हालचाल पाहता येते. हृद् रोहिणीतून वाहणारा रक्तप्रवाह आणि क्षतिग्रस्त भागातील कमी रक्त-पुरवठा यांची माहिती मिळविण्यास किरणोत्सारी समस्थानिकांचा समावेश केलेली थॅलियम (२०) किंवा टेक्नेशियम (९९) ही द्रव्येही अंतःक्षेपणाद्वारे देऊन गॅमाकॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रण केल्यास उपयुक्त ठरतात. या चाचण्या शस्त्रक्रियेनंतर किती सुधारणा झाली त्याचा अंदाज घेण्यासाठी उपयोगी असतात. 

 

उपचार : हृद् रोहिणींच्या विकाराला पुढील प्रकारची औषधे आवश्यकतेनुसार वापरतात : 

 

(१) वेदनाहारक उदा., मॉर्फीन. 

(२) बिंबाणूंचा (प्लेटलेट) चिकटपणा कमी करण्यासाठी ॲस्पिरीन रक्ताचे क्लथन टाळण्यासाठी हिपॅरीन दीर्घकालिक परिणामकारी वारफेरीन इत्यादी. 

(३) वाहिनी संकोचन कमी करणारी नायट्रेटवर्गीय औषधे. 

(४) तयार झालेली रक्ताची गाठ विरघळण्यासाठी क्लथनलयीएंझाइमे उदा., स्ट्रेप्टोकायनेज, युरोकायनेज ऊतकातील प्लाझ्मिनोजेन सक्रिय करणारी द्रव्ये. 

(५) हृदयावरील भार कमी करणारी औषधे : रक्तदाब कमी करण्यासाठी वापरलेली औषधे ॲड्रेनॅलिनाच्या बीटा ग्राहीची रोधक औषधे, कोशिकांच्या अंतर्भागातील वाहिन्यांवर परिणाम करणारीऔषधे, उदा., कॅल्शियम वाहिनी रोधके रक्तातील दाब वाढविणाऱ्या घटकांची निर्मिती कमी करणारी अँजिओ टेन्सिनजनक एंझाइमाचीरोधके [अँजिओटेन्सिनोजेन कन्व्हर्टेज एंझाइम (एसीई) इनहिबिटर्स] उदा., कॅप्टोप्रिल. 

(६) रक्तातील कोलेस्टेरॉल आणि इतर वसा द्रव्यांचे परिणाम कमी ठेवणारी औषधे उदा., स्टॅटीन वर्गीय लोव्हास्टॅटीन. 

अस्थिर हृद्शूलावर औषधोपचाराने नियंत्रण न झाल्यास हृदय-विकाराचा झटका टाळण्यासाठी शल्यचिकित्सेने हृदयाचा रक्तपुरवठा सुधारता येतो. त्यासाठी खालील दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया शक्य असतात. 

 

(१) वाहिनी : (अँजिओप्लॅस्टी) . शरीरातील एखाद्या मोठ्या रोहिणीत (उदा., मांडीची रोहिणी) छेद घेऊन तिच्यात नलिका घालून ती सरकवत महारोहिणीत व पुढे हृद् रोहिणीत अडथळा असलेल्या जागेपर्यंत नेली जाते. नलिकेच्या टोकाला असलेला फुगा नंतर फुगवून रोहिणीतील अरुंद झालेला मार्ग पुन्हा रुंद केला जातो. अनेकदा त्या भागात कडक प्लॅस्टिक किंवा तारेच्या जाळीचा बनविलेला नलिकेचा तुकडा (स्टेंट) बसविला जातो. अशा प्रकारच्या शल्यकर्मासाठी छाती उघडावी लागत नाही परंतु अडथळा कोणत्या भागात आहे त्यावर तेथपर्यंत पोहोचण्याची शक्यता अवलंबून असते. 

 

(२) पर्यायी मार्ग निर्मिती : (बायपास सर्जरी) . पायातील एखाद्या नीलेचा तुकडा अथवा छातीमधील अंतर्गत स्तनरोहिणीचा तुकडा काढला जातो. महारोहिणी आणि हृद् रोहिणीचा अडथळ्यापलीकडील भाग यांना जोडून पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी हा तुकडा उपयोगी ठरतो. असे मार्ग करताना शक्य तेव्हा कमीत कमी एक मार्ग रोहिणी वापरून केल्यास सुधारलेला रक्तपुरवठा दीर्घकाळ टिकतो. कारण नीलेमध्ये क्लथन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कधीकधी ५–१० वर्षांनंतर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागते. 

 

पहा : हृदय हृदयविकार. 

 

संदर्भ : 1. Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, 12th Edition, 2011.

           2. Merck Mannual of Medical Information (Home Edition), New Jersy, 2008.

           3. Peters, Michael (Ed.), A-Z Family Medical Encyclopedia, 2004. 

 

श्रोत्री, दि. शं.