कॉकेन, लेनर्ड : (१८५५–१९३४). ब्रिटिश वनस्पति–वैज्ञानिक. त्यांचा जन्म डर्बिशरमध्ये व शिक्षण मॅंचेस्टरमधील ओएन्स महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते इंग्लंड सोडून ऑस्ट्रेलियाला आले. (१८७९) आणि एका वर्षाने न्यूझीलंडमध्ये येऊन त्यांनी अध्यापनाबरोबरच शेतकी, बागाईत इ. कार्ये सुरू केली. १८९९ पासून पुढे न्यूझीलंडच्या पादपजातींसंबंधी (वनस्पतींच्या जातींसंबंधी) त्यांनी अनेक लेख व न्यूझीलंड प्लॅंट्स अँड देअर स्टोरी  (१९१०, तिसरी आवृत्ती- १९२८) व्हेजिटेशन ऑफ न्यूझीलंड (१९२१, दुसरी आवृत्ती- १९२८) इ. ग्रंथ लिहिले. विशेषतः नैसर्गिक संकरजांच्या (दोन भिन्न वंश, जाती वा प्रकार यांच्यापासून झालेल्या संततीच्या) अस्तित्वासंबंधी त्यांनी बरेच लेखन केलेले आहे. १९१२ मध्ये त्यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलोपद व १९३८ मध्ये डार्विन पदक देण्यात आले.

 

जमदाडे, ज. वि.