काणूक : भारतात आढळणाऱ्या रानटी बदकांपैकी ही सगळयांत लहान जात आहे. सगळया बदकांना ॲनॅटिडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. काणुकाचे शास्त्रीय नाव नेट्टूपस कॉरोमांडलियानस असे आहे. भारतात जवळजवळ सर्व भागांत काणूक आढळतो. तलाव, नद्यांचे डोह, पाण्याचे भरलेली भाताची खाचरे इ. ठिकाणी हा राहतो. पाण्याच्या काठावर दाट गवत व झुडपे असली, तरी त्यांच्या जवळपास रहाणे याला जास्त आवडते. यांच्या टोळया अथवा लहान थवे असतात.

काणूक कबूतरापेक्षा मोठा असून लांबी सु.३५ सेंमी. असते. विणीच्या हंगामात नराची वरची बाजू तकतकीत गडद तपकिरी असते. डोके, मान व शरीराची खालची बाजू पांढरी मानेच्या मागच्या भगाभोवती ठळक काळे वजय पंखावर पांढरा पट्टा मादीचे रंग नराच्या रंगापेक्षा फिक्के असतात तिच्या मानेभोवती वलय नसते व पंखावर पांढरा पट्टाही नसतो.

काणूक

विणीचा हंगाम नसताना नराचा रंग मादीच्या सारखाच असतो, मानेभोवतालचे वलय नाहीसे होते पण पंखावरचा पांढरा पट्टा मात्र कायम असतो. चोच आखूड असते बुडाशी ती बरीच उंच असून टोकाकडे निमुळती होत जाते ती तपकिरी व पिवळी असते, पण विणीच्या हंगामात नराची चोच काळी होते.

आपला बराच वेळ हा पाण्यातच घालवितो कधीकधी तो झाडावरही जाऊन बसतो पण त्याला नीट चालता येत नसल्यामुळे जमिनीवर तो क्वचितच येतो. खेडयापाडयांच्या शेजारी असणाऱ्या तलावांच्या काठावर राहणाऱ्या काणुकांना सवयीने माणसांची भीती वाटेनाशी होते. हा मुख्यतः शकाहारी आहे पण झिंगे, किडे वगैरे देखील तो खातो. जूनपासून ऑगस्टपर्यंत यांचा विणीचा हंगाम असतो, पाण्यात किंवा पाण्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या ढोलीत गवत, काडया व पिसे घालून मादी घरटे बनविते. दर खेपेला ती ६-१२ हस्तिदंती पांढऱ्या रंगाची अंडी घालते.

कर्वे, ज.नी.