कॉरी, कार्ल फर्डिनंड कॉरी, गर्टी थेरेसा (रॅडनिझ) : (५ डिसेंबर १८९६—    )  (१५ ऑगस्ट १८९६—२६ ऑक्टोबर १९५७). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ दांपत्य. अर्जेंटिनातील शरीरक्रियावैज्ञानिक बर्नार्ड ए. हौसे (ऊसाय) व कॉरी दांपत्य यांना १९४७ चे शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक विषयातील नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

 

कार्ल व गर्टी या दोघांचाही जन्म झेकोस्लोव्हाकियातील प्राग येथे झाला. तेथील जर्मन विद्यापीठात दोघेही सहविद्यार्थी होते. पहिला संशोधनविषयक लेख दोघांनी मिळून विद्यार्थीदशेतच लिहिला. १९२० मध्ये दोघांनाही प्राग विद्यापीठाची एम्.डी. पदवी मिळाली व त्याच वर्षी ते विवाहबद्ध झाले. नंतर ते व्हिएन्ना येथे गेले. तेथील ग्राझ विद्यापीठात औषधक्रियाविज्ञान विभागात कार्ल कार्य करू लागले. एका बालरोग रुग्णालयात गर्टी यांना काम मिळाले. १९२२ मध्ये हे दांपत्य अमेरिकेस गेले व त्यांना १९२८ मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाले. १९२२—१९३१ पर्यंत बफेलो येथील मारक रोगांच्या अभ्यासाकरीता काढलेल्या खास संस्थेत दोघेही काम करीत होते. १९३१ मध्ये दोघांनाही सेंट लूइस येथील वॉशिंग्टन औषधशास्त्र शिक्षणशाळेत जीवरसायनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. कार्ल १९४७ मध्ये या विभागाचे प्रमुख बनले.

 

कॉरी दांपत्याने कार्बोहायड्रेट चयापचयाबद्दल (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींबद्दल) महत्त्वाचे शोध लाविले. द्राक्षशर्करेपासून (ग्लुकोजापासून) मधुजन (ग्लायकोजेन) व मधुजनापासून द्राक्षशर्करा तयार होण्याची विक्रिया शरीरात कशी होते ते त्यांनी सप्रमाण दाखविले. या विक्रियेच्या मधल्या टप्प्यात ‘ग्लुकोज-१-फाॅस्फेट’ तयार होते, ते त्यांनी अलग करून दाखविले. याच पदार्थास ‘कॉरी एस्टर’ म्हणतात. द्राक्षशर्करा-मधुजन ही विक्रिया परिवर्तनीय (उलटसुलट घडणारी) असून ती एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या) साहाय्याने तीन टप्प्यांत होते. कॉरी दांपत्याने ही विक्रिया प्रयोगशाळेत शरीराबाहेर करून दाखविली. स्नायू ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) मधुजनापासून दुग्धाम्ल (लॅटिन अम्ल) तयार होते. रक्तप्रवाहातून ते यकृताकडे नेले जाते. तेथे ⇨ऑक्सिडीभवनामुळे या अम्लाचे कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी बनते किंवा पुन्हा मधुजन बनते. ही प्रक्रिया ‘कॉरी चक्र’ म्हणून ओळखली जाते.

 

कार्बोहायड्रेट चयापचाचा अभ्यास करीत असताना कॉरी दांपत्याला प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा पूर्ण करण्याकरीता विशिष्ट प्रथिन एंझाइमाची जरूरी असते असे आढळले. ‘फॉस्फोरिलेझ’ नावाच्या अशाच एंझाइमाकडे त्यांनी अधिक लक्ष पुरविले. मधुजनाचे ग्लुकोज-१-फाॅस्फेटमध्ये रूपांतर करण्याकरीता याच एंझाइमाची जरूरी असते. या चयापचयावर प्रवर्तकही (वाहिनीरहित ग्रंथीपासून स्रवणारे व रक्तात एकदम मिसळणारे पदार्थही, हॉर्मोने) परिणाम करतात, हेही कॉरी दांपत्याने सिद्ध केले.

कॉरी दांपत्याने दोघांनी मिळून आणि एकेकट्याने असे एकूण २०० पेक्षा जास्त शास्त्रीय निबंध लिहिले आहेत. दोघेही नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद म्हणून निवडले गेले होते. नोबेल पारितोषिकाशिवाय त्यांना अनेक पदके व बक्षिसे मिळाली आहेत. गर्टी कॉरी या सेंट लूइस येथे मृत्यू पावल्या.

 

कानिटकर, बा. मो.