बॉन्ये, गास्ताँ : (? १८५३-३० डिसेंबर १९२२). फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वनस्पतिविज्ञानाचे वर्णनात्मक स्वरूप बदलून ते प्रायोगिक विज्ञान बनले. त्याला असे स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी बॉन्ये हे एक होत. त्यांनी लावलेल्या शोधांमुळे वनस्पतिनिज्ञानाच्या विकासाला हातभार लागला. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला व तेथील एकोल नॉर्मलमध्ये शिक्षण झाल्यावर बरीच वर्षे त्यांनी तेथेच अध्यापनाचे कार्य केले. १८८७ मध्ये सॉर्‌बॉन येथे त्यांना वनस्पतिविज्ञानाचे अध्यासन मिळाले. १८७९ मध्ये मकरंद ग्रंथीवरील (मध स्रवणाऱ्या ग्रंथींवरील) त्यांच्या प्रबंधामुळे त्यांना डी.एस्.एन्. ही पदवी मिळाली. १८८०-८२ या काळात त्यांनी व्हॅन फिलिप टीघेम यांच्या सहकार्याने बीजे, धान्ये व कंद यांच्या क्रियाशीलतेचा अभ्यास केला व पूर्वी समज असल्याप्रमाणे ती ‘मृत’ नसल्याचा शोध लावला. १८८३-८५ या काळात त्यांनी ल्वी मानझॅन यांच्या मदतीने वनस्पतींच्या श्वसनावर प्रदीर्घ लेख लिहिले. या काळात श्वसन व प्रकाशसंश्लेषण (सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी या साध्या संयुगांपासून ग्लुकोज, स्टार्च इ. जटिल संयुगे बनण्याची हरितद्रव्ययुक्त वनस्पतींमधील प्रक्रिया) या दोन भिन्न प्रक्रिया आहेत. हे वनस्पतिशास्त्रज्ञांच्या ध्यानात येऊ लागले होते. श्वसन व विविध पर्यावरणीय अवस्था यांतील परस्परसंबंध यांमध्ये त्या दोघांना विशेष रस होता. सूर्यप्रकाश नसताना श्वसन सर्वांत जलदपणे होते, हा त्यांचा शोध फार महत्त्वाचा होय. कोणत्याही क्षणी वनस्पतीने बाहेर टाकलेला कार्बन डाय-ऑक्साईड व शोषण केलेला ऑक्सिजन या वायूंचे गुणोत्तर निश्चित करण्यासाठी बॉन्ये यांनी एक उपकरणही तयार केले व हे गुणोतेतर कोणत्याही वेळी एका जातीच्या वनस्पतींच्या बाबतीत स्थिर असते, मग श्वसनाची त्वरा काहीही असो, हे त्यांनी दाखवून दिले. तसेच शैवाकविज्ञानाच्या (दगडफूलांच्या अभ्यासाच्या शास्त्राच्या) वेगळ्या क्षेत्रातही त्यांनी काम केले. शैवाक (दगडफूल) हे शैवाल व कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) यांचे सहजीवी [⟶ सहजीवन] रूप आहे, हे त्यांनी सिद्ध केले.

इ. स. १८९० मध्ये स्थापन झालेल्या एका वनस्पतिवैज्ञानिक नियतकालिकाचे ते संपादक होते. १८९६ मध्ये ते पॅरिस ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. १८९०-१९२२ या काळात त्यांनी वनस्पतींची संरचना व पर्यावरण यांच्यामधील संबंधाविषयी संशोधन केले.तसेच त्यांनी विपुल ग्रंथनिर्मिती केली. त्यांमध्ये फ्रान्स, स्वित्झर्लंड व बेल्जियम या देशांच्या पादपजातींवरील (समग्र वनस्पतींवरील) त्यांचा बारा खंडांचा ग्रंथ सर्वोत्कृष्ट होय. त्याचे काही खंड त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.