मायर, युलिउस लोतार : (१९ ऑगस्ट १८३०–११ एप्रिल १८९५). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. ⇨ आवर्त सारणी व रसायनशात्रातील विविध शाखांतील संशोधनाबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण फारल (जर्मनी) येथे झाले. १८५१ साली त्यांनी पदवी मिळविल्यावर झुरिक विद्यापीठात वैद्यकाच्या अभ्यासाला सुरूवात केली व १८५४ मध्ये त्यांनी एम्. डी. पदवी संपादिल्यानंतर हायडल्‌बर्ग येथे बन्सल यांच्या हाताखाली शरीरक्रियावैज्ञानिक रसायनशास्त्राचे अध्ययन केले. १८५६ साली त्यांनी डॉक्टरेट पदवीसाठी लिहिलेल्या Veber die Gase des Blutes हा ग्रंथ वुर्ट्‌सबर्ग फॅकल्‍टी ऑफ मेडिसीनने मान्य केला. किरखोप यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन त्यानी भौतिकीय रसायनशास्त्राच्या अध्ययनास सुरूवात केली. १८५६ साली ते कोमिग्झबर्गला गेले व तेथे त्यांनी एफ्. नॉयमान यांच्या हाताखाली गणितीय भौतिकीचा अभ्यास केला. १८५८ साली ब्रेस्लो येथे आल्यावर त्यांनी ‘ कार्बन मोनॉक्साइडाचा रक्तावरील परिणाम’ या विषयावर संशोधन करून पीएच्. डी. पदवी मिळविली व तेथे ते अधिधात्र झाले. या काळात त्यांनी रसायनशास्त्राच्या कार्बनी, अकार्बनी, शरीरक्रियावैज्ञानिक व जैव या शाखांमध्ये काम केले. १८६६ साली ते नाउस्टाट-एबर्स्वाल्ड येथील स्कूल ऑफ फॉरेस्ट्रीमध्ये व्याख्याते, तर १८५८ साली कार्लझूए येथील पॉलिटेक्‍निक इन्स्टिट्यूटमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक व रासायनिक प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. १८७६ पासून मृत्यूपावेतो ते ट्यूबिंगेन येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.

रक्ताकडून होणारे वायूचे शोषण हे त्यांचे पहिले शरीरक्रियावैज्ञानिक संशोधन होय. फुफ्फुसांत रक्ताद्वारे ऑक्सिजनाचे होणारे शोषण हे दाबावर अवलंबून नसते. यावरून त्यांना असे सुचले की, रक्तामधील कोणत्या तरी घटकाशी ऑक्सिजन रासायनिक दृष्ट्या असा सैलसर जोडला जातो की, तो सहज मुक्त होऊ शकतो. कार्बन मोनॉक्साइडचे विषारी परिणाम यांवर संशोधन केले असता वरील गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखविली. रक्तातील हा घटक शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यात ते अयशस्वी झाले. पुढे एफ्. होपेझायलर यांनी तो घटक म्हणजे हीमोग्‍लोबिन होय, हे शोधून काढले.

डी. आय्. मेंडेलेव्ह व मायर यांनी जवळजवळ एकाच वेळी पण स्वतंत्र रीत्या १८६९ मध्ये आवर्त सारणीवरील निबंध प्रसिद्ध केले. आवर्त सारणीच्या मांडणीत रासायनिक मूलद्रव्यांच्या अचूक अणुभारांची आवश्यकता ओळखून त्यांनी त्या वेळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचे अचूक अणुभार काढले आणि आणवीय घनफळ व अणुभार यांचा संबंध दाखविणारा आलेख तयार केला. आवर्त सारणीतील एक ते सात गटांचे ‘अ’ व ‘ब’ असे दोन उपगट प्रथमच मायर यांनी सुचविले.

कार्बनी रसायनशास्त्र व भौतिकीय रसायनशास्त्र यांतही त्यांनी संशोधन केले. त्यांनी बेंझिनाची संरचना, बेंझिनाचे नायट्रीकरण व कार्बनी संयुगांचे उकळबिंदू व रेणवीय संरचना यांचा संबंध इ. विषयांसंबंधी मौलिक संशोधन केले.

Die Modernen Theorien der Chemie und ihre Bedeutung Fiilr die Chemische Statik हे पुस्तक त्यांनी १८६४ मध्ये लिहिले. पुढे त्याच्या पाच आवृत्या निघाल्या व इंग्रजी, फ्रेंच, रशियन या भाषांत त्याचे भाषांतर करण्यात आले. यांशिवाय त्यांनी अनेक निबंध लिहिले व बऱ्याच विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन केले.

आवर्त सारणीबाबतच्या त्यांच्या संशोधनामुळे मेंडेलेव्ह व त्यांना १८९२ मध्ये रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक मिळाले. १८८३ मध्ये केमिकल सोसायटी (लंडन) चे सन्माननीय परदेशी सभासद, तसेच १८८८ मध्ये प्रशियन सायन्स अकॅडेमीचे व १८९१ मध्ये सेंट पीटर्झबर्ग सायन्स अकॅडेमीचे ते सभासद झाले. ट्यूबिंगेन येथे ते मरण पावले.

मिठारी, भू. चिं. घाटे, रा. वि.