रामधारी सिंह 'दिनकर'

‘दिनकर’–रामधारी सिंह : (२३ सप्टेंबर १९०८–२४ एप्रिल १९७४). हिंदीतील प्रख्यात कवी व लेखक. जन्म बिहारमध्ये मोंघीर जिल्ह्यातील सिमरिया नावाच्या गावी. वडिलांचे नाव रवी सिंह. लहानपणापासून त्यांना प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये रहावे लागले. इतिहास घेऊन बी. ए. झाल्यानंतर शिक्षक म्हणून त्यांनी काम केले (१९३३–३४). पुढे अनिच्छेनेच त्यांना सरकारी नोकरी करावी लागली (१९३४–५०). स्वातंत्र्योत्तर काळात मुझफरपूर येथील महाविद्यालयात ते हिंदीचे प्राध्यापक व विभाग प्रमुख झाले (१९५०–५२). काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली (१९५२–६३). चित्रपट पारितोषिक समिती, संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादेमी, आकाशवाणीची राष्ट्रीय सल्लागार समिती इ. विविध समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. भागलपूर विद्यापीठाचे ते कुलगुरूही होते (१९६४–६५). केंद्रीय गृह मंत्रालयाचे ते हिंदी भाषा सल्लागार होते (१९६५–७१).

दिनकर मुख्यतः कवी म्हणून प्रसिद्ध असले, तरी त्यांनी केलेले गद्यलेखनही मोलाचे आहे. त्यांच्या गद्यलेखनात सहजता व प्रासादिकता हे गुण असून शैलीत ओज व रसाळपणा आहे. संस्कृति के चार अध्याय (१९५६) या बृहद्‌ग्रंथात भारतीय संस्कृतीचा त्यांनी सुस्पष्ट आणि विचारप्रवर्तक आढावा घेतला आहे. हा ग्रंथ त्यांच्या व्यासंगाची साक्ष देतो, तर शुद्ध कविता की खोज (१९६६) यासारखा ग्रंथ त्यांच्या चिंतनशील वृत्तीची ग्वाही देतो. पंत, प्रसाद और मैथिलीशरण (१९५९) यासारख्या ग्रंथात समकालीन कवींबद्दल व त्यांच्या काव्याबद्दल त्यांनी केलेले लेखन त्यांच्या निःपक्षपाती आणि मर्मग्राही विश्लेषणक्षमतेची साक्ष देते, तर वेळोवेळी स्वतःच्या काव्याबद्दल अंतर्मुख होऊन त्यांनी केलेले चिंतन, आत्मविकास साधू पाहणाऱ्या जागृत प्रतिभावंताचे आत्मपरिक्षण ठरते (चक्रवाल–भूमिका १९५६). त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचे दर्शन मिट्टी की ओर (१९४६), अर्धनारीश्वर (१९५२) व वेणुवन (१९५८) मधील निबंधांतून घडते.

हिंदी काव्यात छायावादाच्या प्रभावाने अस्पष्टता, दुर्बोधता आणि आत्यंतिक वैयक्तिकता निर्माण झाली होती. या प्रभावकाळानंतर हिंदी काव्याला पुन्हा समाजोन्मुख, जीवनोन्मुख व लोकप्रिय करण्याचे कार्य करणाऱ्या हिंदी कवींमध्ये दिनकर यांना मानाचे स्थान द्यावे लागले. भारतीय संस्कृती आणि समाज यांच्याबद्दल रास्त अभिमान बाळगून सद्यःकालीन समस्यात्मक जीवनामध्ये काय करणे इष्ट आहे, याची स्पष्ट जाणीव दिनकरांना होती. त्यांच्या काव्यात राष्ट्रप्रेमाची भावना ओजस्वी व जोमदार भाषेत व्यक्त झाली आहे. गांधीवाद, समाजवाद व मानवतावाद या तिन्ही विचारसरणींचा त्यांच्यावर प्रभाव असला, तरी कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची बांधीलकी त्यांना मान्य झाली नाही. भारतीय संस्कृती, इतिहास व परंपरा यांबद्दल अभिमान, ज्वलंत राष्ट्रप्रेम, दलित व पीडित जनतेबद्दल अपार कणव, माणसाच्या ऐहिक प्रगतीबद्दल आस्था, समकालीन सामाजिक, राजनैतिक आणि आर्थिक अन्यायांबद्दल चीड, वीरत्वाविषयी अनिवार ओढ, हे दिनकर यांच्या आस्थेचे आणि काव्याचे प्रमुख विशेष आहेत. अन्याय, विषमता, दंभ व ढोंग यांच्यावर कडाडून प्रहार करणारी त्यांची लेखणी शृंगार व प्रेम या विषयांत हळुवारपणे रंगून जाते. त्यांच्या कुरुक्षेत्र या खंडकाव्यात अहिंसा की वीराची हिंसा, असा मध्यवर्ती प्रश्न त्यांनी धर्मराज व शरपंजरी पडलेल्या भीष्माच्या संवादातून मांडला आहे. रश्मिरथी (१९५२) मध्ये त्यांनी अकुलिनत्वचा शाप घेऊन आलेल्या दुर्दैवी कर्णाच्या महान व्यक्तिमत्त्वाला आकार दिला आहे. त्यांचे उर्वशी नावाचे महाकाव्य हिंदीमध्ये अनेक दृष्टींनी विवाद्य ठरले असले, तरी या काव्यामुळेच त्यांना महाकवीचा मान लाभला आहे. सद्यःकालीन परिस्थितीचे आव्हान त्यांच्यातील कवीने समर्थपणे स्वीकारले आहे.


उर्वशी या महाकाव्याचे कथानक पौराणिक असले, तरी ते एक आशयाचे साधन म्हणूनच त्यांनी घेतले आहे. उत्तर–छायावादी कवींचा जीवनाकडे पाहण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन दिनकरांनी उर्वशीत व्यक्त केला आहे. पुरुरवा व उर्वशी यांच्या शारीरिक मीलनाच्या उत्कट अनुभवाचे अतिशय काव्यात्म चित्रण तिसऱ्या सर्गात त्यांनी केले आहे. ते इतके प्रभावी आहे, की दिनकरांचे प्रतिपाद्य तेवढेच असावे, अशी अनेकांची समजूत झाली. याच काव्यात प्रेमाविषयीचे विविध दृष्टिकोन प्रगट झाले असून गृहस्थधर्मातील पतिपत्नी प्रेमालाच त्यांनी महत्त्व दिले आहे. या प्रेमभावनेला आधुनिक काळातील वाढत चाललेल्या उच्छुंखल, वासनाप्रधान प्रणयभावनेचा एक संदर्भ असून तो कथानकाशी एकरूप झालेला आहे. वासना व प्रेम, उन्मुक्त प्रणय व गृहस्थ धर्मातील कर्तव्योन्मुख प्रेम, प्रकृती व परमेश्वर, जीवनाचा अंतिम अर्थ यांविषयी दिनकरांनी केलेले सखोल चिंतन यात जागोजाग प्रत्ययास येते. पुरुरवा, उर्वशी, औशीतरी, सुकन्या यांची चित्रणे काहीशी प्रतीकात्मक असली, तरी त्यांना जिवंतपणाही लाभलेला आहे. भाषा सहज, प्रांजळ, निर्मळ, लवचिक व प्रवाही आहे. दिनकरांचे सर्व सामर्थ्य उर्वशीत प्रगट होते तसेच त्यांच्या काही मर्यादाही. तथापि आधुनिक काळात संस्कृतीची धुरा वाहणाऱ्या सुशिक्षितांच्या समस्यांचे, मूल्यांचे पौराणिक मिथ्यकथेच्या माध्यमातून काव्यात्मक चिंतन करण्याचा दिनकरांचा प्रयत्न उर्वशीत यशस्वी झाला आहे. हिंदी साहित्यात साकेत, कामायनी या महाकाव्यांबरोबर दिनकरांच्या उर्वशीचाही गौरवाने उल्लेख करावा लागेल.

त्यांचे उल्लेखनीय काव्यग्रंथ पुढीलप्रमाणे: रेणुका (१९३५), हुंकार (१९३८), रसवंती (१९३९), द्वंद्वगीत (१९४०), सामधेनी (१९४६), कुरुक्षेत्र (१९४६), इतिहास के आँसू (१९५२), रश्मिरथी (१९५२), नील कुसुम (१९५५), नीम के पत्ते (१९५६),नए सुभाषित (१९५७), सीपी और शंख (१९५७), उर्वशी (१९६१), परशुराम की प्रतीक्षा (१९६२), कोयल औऱ कवित्व (१९६४), आत्मा की आँखे (१९६४), मृत्तितिलक (१९६४), दिल्ली (१९६५) इत्यादी.

भारत सरकारने १९५९ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. १९५९ मध्येच त्यांच्या संस्कृति के चार अध्याय ह्या ग्रंथास साहित्य अकादेमीपुरस्कार लाभला. भागलपूर विद्यापीठाने १९६२ मध्ये त्यांना सन्मान्य डी. लिट्. दिली. ज्वालापूर येथील गुरुकुलाने त्यांना ‘विद्यावाचस्पती’ हा किताब बहाल केला. विशेष उल्लेखनीय साहित्यनिर्मितीबाबत त्यांना साहित्यकार संसद, अलाहाबाद बिहार राष्ट्रभाषा परिषद, पाटणा नागरी प्रचारिणी सभा, वाराणसी यांच्याकडून पारितोषिके मिळाली. भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्याकडून त्यांना द्विवेदी सुवर्णपदक मिळाले. भारतीय ज्ञानपीठाने त्यांच्या उर्वशीस १९७२ चा एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. १९६१ मध्ये भारत सरकारने रशियास पाठविलेल्या पाच साहित्यिकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले.

दक्षिण भारताच्या प्रवासात असतानाच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

संदर्भ: १.त्रिपाठी, लालधर, दिनकर के काव्य, वाराणसी, १९५७.

२. शर्मा, शिवचंद्र, दिनकर और उनकी काव्यप्रवृत्तियाँ, कलकत्ता, १९५१.

३. श्रीवास्तव, मुरलीधर, दिनकर की काव्यसाधना, पाटणा, १९५१.

बांदिवडेकर, चंद्रकांत