मेहरअली, यूसुफ जाफर : (२३ सप्टेंबर १९०३–? १९५०). भारतातील युवक चळवळीचे नेते, उत्तम वक्ते व स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक. त्यांचे खोजा मुस्लिम कुटुंब मूळचे गुजरातच्या कच्छ संस्थानातील. त्यांचे वडील व्यापारानिमित्त मुंबई व कलकत्ता या शहरांत राहत. यूसुफ यांचा जन्म मुंबईत झाला पण त्यांचे प्राथमिक शिक्षण कलकत्यात झाले. नंतर त्यांनी सर्व शिक्षण मुंबईतच घेतले. विद्यार्थि दशेतच रस्पूट्यीन क्लब नावाची युवक संघटना मिनू मसानी, उपेंद्र देसाई, के एफ्. नरिमन आदी मित्रांच्या साह्याने त्यांनी स्थापन केली. एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून (मुंबई विद्यापीठ) त्यांनी पदवी घेतली (१९२५). त्यानंतर ते एल्‌एल्‌. बी झाले पण त्यांच्या युवक चळवळीमुळे त्यांना वकिलीची सनद नाकारण्यात आली. तेव्हा त्यांनी आ. रा. भटांच्या मदतीने बाँम्बे यूथलीगची स्थापना केली (१९२८). पुढे तिचेच रूपांतर बॉम्बे प्रसिडेन्सी यूथ लीगमध्ये झाले. या लीगने काँग्रेसच्या ध्येयधोरणात बदल करण्याचे ठरवले आणि पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. परिणामतः या लीगचे लोण साऱ्या देशभर पसरले. स्वातंत्र्य, समता आणि बं धुत्व या तत्त्वांवर यूथ लीगची श्रद्धा होती. लीगच्या निवडक चारशे स्वयंसेवकांनी मेहरअलींच्या नेतृत्वाखाली मुंबई बंदरात सायमन कमिशनविरुद्ध निदर्शने केली. त्यात मेहरअलींना मार बसला. १९२९ मध्ये त्यांनी लष्कराच्या धर्तीवर नॅशनल मिलिशा नावाची सैनिकीसम संघटना स्थापन केली. या संघटनेचे ध्येय लोकांना शिक्षित करून स्वातंत्र्याची जाणीव करून द्यावयाची आणि नंतर त्यांना कृतीसाठी उद्युक्त करावयाचे, हे होते. या सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी चर्चासत्रे, बौद्धिके आयोजित केली आणि व्याख्याने दिली. हॉलंडमधील जागतिक युवक काँग्रेसमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले (१९२८). कलकत्त्याच्या अखिल भारतीय युवक काँग्रेसचे ते महासचिव झाले (१९२९). बार्डोलीचा साराबंदी सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह आदींतून त्यांनी सक्रिय भाग घेतला. म.गांधीजींच्या असहकार चळवळीनंतर त्यांनी स्वदेशी वस्तूंचा सर्वत्र प्रसार केला आणि मुंबईत स्वदेशी वस्तू विकल्या. या सुमारास व्हॅनगार्ड या नियतकालिकाचे संपादकपद त्यांच्याकडे आले (१९२९–३३). यात त्यांनी म.गांधींची परखड मुलाखत छापली. परिणामतः ते नियतकालिक बंद पडले व मेहरअलींना शिक्षा झाली. यानंतर कट केल्याच्या आरोपावरून पुन्हा त्यांना नासिक येथे दोन वर्षे कारागृहात डांबण्यात आले. यावेळी जयप्रकाश नारायण, ना. ग. गोरे, एस्‌. एम्. जोशी, अशोक मेहता आदी समाजवादी प्रभृतींशी त्यांचा परिचय झाला आणि त्यातूनच पुढे काँग्रेस समाजवादी पक्षाचा जन्म झाला (१९३४). या पक्षाचे ते सरचिटणीस झाले. या पक्षाच्या प्रसारार्थ त्यांनी १९३५–३६ मध्ये भारतभर दौरा केला. १९३८ मध्ये त्यांनी यूरोप-अमेरिका खंडांचा सदिच्छा दौरा करून तेथील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. त्यांना वैयक्तिक  सत्याग्रहासाठी पुन्हा अटक झाली (१९४०). ते तुरुंगात असतानाच त्यांची मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली (१९४१). मुंबईच्या कामगारांना संघटित करून त्यांनी कामगार चळवळीचा पाया घातला. मुंबईतील असंघटित व विखुरलेल्या गुमास्त्यांना त्यांनी एकत्र आणले आणि त्यांचे कामाचे तास, सुटी आणि वेतन हे प्रश्न धसास लावले. यामुळे ब्रिटिश सरकारला गुमास्ता कायदा करणे भाग पडले. १९४२ मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. भूमिगत राहून त्यांना जनजागृती करावयाची होती पण ते सापडले व त्यांना शिक्षा झाली. तुरुंगातील वातावरणात त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. पुढे उपचारार्थ ते अमेरिकेला गेले (१९४७) पण फारसा उपयोग झाला नाही. अखेर ऐन उमेदीतच ते मुंबई येथे मरण पावले.

अखेरच्या दिवसांत ते काँग्रेस समाजवादी पक्षाचे जनता मासिक चालवीत असत. स्वातंत्र्य चळवळीत गुंतलेले असूनही, त्यांनी तरुणांसाठी विचारप्रवर्तक लेखन केले. वृत्तपत्रांतील स्फुटलेखनाशिवाय त्यांनी लीडर्स ऑफ इंडिया (दोन खंड–१९४२), ए ट्रिप टू पाकिस्तान (१९४३), द मॉडर्न वर्ल्ड (१९४५), द प्राइस ऑफ लिबर्टी (१९४८) इ. पुस्तके लिहिली. ते आजन्म अविवाहित राहिले. आणि सर्व जीवन त्यांनी देशासाठी वाहिले. ते नास्तिक होते. अनेक पारशी व हिंदू त्यांचे सच्चे मित्र होते. मुंबईच्या कामगार चळवळीतील व भारतीय युवक संघटनेतील त्यांचा वाटा संस्मरणीय आहे.

संदर्भ : 1. Chattopadhya, Kamaladevi, At the Crossroads, Bombay, 1942.

             2. Dev, Acharya Narendra, Socialism and the National Revolution, Bombay, 1946.

             3. Yusuf Meherally Centre, Pub. Souvernir, Bombay,1966.

देशपांडे, सु. र.