यामामोतो, एसोरोकू ॲड्‌मिरल : (४ एप्रिल १८८४ – १८ एप्रिल १९४३). दुसऱ्या महायुद्धातील [⟶ महायुद्ध, दुसरे] जागतिक कीर्तीचा जपानी नौसेना सरसेनापती व नाविक प्रतिभूमंत्री (व्हाइस मिनिस्टर). जन्म होन्शू बेटाच्या नीईगाता प्रांतामधील नागाओका या गावी. सदायोशी नामक कुलनाम असलेल्या ताकानो या गरीब शिक्षकाला त्याच्या वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी हे मूल झाल्याने या मुलाचे नाव त्याने एसोरोकू (जपानी भाषेत ५६) असे ठेवले. एसोरोकूचा मन:पिंड व आचार-विचार त्याला बालपणी मिळालेल्या शिक्षण व अमेरिकाद्वेष्टी विचारांमुळे पक्का झाला, असे म्हणतात. मेईजी पुनर्प्रस्थापनेच्या राजकीय धोरणामुळे जपानवर पाश्चात्य संस्कृतीचा खोलवर परिणाम झाला होता. जपानला आधुनिक शक्तिशाली नौसेनेची निकड भासू लागली होती. अशा बहुप्रगतिशील परिस्थितीत इटाजिमा या नाविक अकादमीत एसोरोकूला नाविक शिक्षण व सागरी प्रत्यक्षानुभव मिळाला (१९०४). नौसेनापर्यटनाच्या वेळी परराष्ट्रांना दिलेल्या औपचारिक भेटीगाठींत त्याने भावी शत्रुराष्ट्राविषयी बरीच माहिती मिळविली. एसोरोकूला १९१५ साली यामामोतो कुलाने दत्तक घेतल्यावर त्याचे मूळ सदायोशी हे कुलनाम जाऊन त्याला यामामोतो हे कुलनाम मिळाले. १९१८ साली त्याचा विवाह झाला आणि १९१९ – २१ या कालात त्याने इंग्लिश भाषा व पेट्रोलियम तेलविद्येचा अभ्यास अमेरिकेच्या हार्व्हर्ड या सुप्रसिद्ध विद्यापीठात पूर्ण केला. आगामी युद्धात पेट्रोल इंधनाला आगळे महत्त्व लाभणार हे त्याने ओळखले होते. १९२१ अखेर तो जपानी नाविक स्टाफ कॉलेजात शिक्षक झाला व १९२४ च्या मार्चमध्ये कॅप्टन बनला. पुढे डिसेंबर १९२४ मध्ये कासूमिगाउरा या नौवायुसेना शिक्षण-संस्थेत त्याची नियुक्ती कार्यकारी अधिकारी पदावर झाली. त्यावेळी ‘वायुबळाचे सैनिकी उपयोग’ या त्याच्या अभिनव सिद्धांतप्रणालीस प्रसिद्धी मिळाली. १९२६ – २८ या दोन वर्षांत त्याने अमेरिकेत जपानचा राजदूत म्हणून काम केले. या कालातच त्याला वायुबलविकासातील विमानवाहू युद्धनौकांचे [⟶ विमानवाहू जहाजे] असाधारण महत्त्व पटले, मात्र त्याने त्याचवेळी अमेरिकन नौसेनेबद्दल अनिष्ट व अवास्तव असा पूर्वग्रह करून घेतला. १९२९ – ३० या वर्षांत नाविक जनरल स्टाफ कार्यालयात असताना त्याने पुष्कळ नवप्रवर्तन (इन्नोव्हेशन) कार्यान्वित केले. १९३० च्या लंडन येथील आंतरराष्ट्रीय नाविक परिषदेत त्याने भाग घेतला. या परिषदेत त्याने जपानला पाणबुड्या व हलक्या ⇨ क्रूझरच्या बाबतीत, ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांच्या बरोबरीने बळ मिळवून दिले त्यामुळे जपानी नौसेनेचा उद्‌गाता यामामोतो हाच आहे, हे जगाला कळून चुकले. जपानी नौसेनेच्या नाविक वायुसेनेच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख असताना (१९३० – ३३) त्याने चिनी-जपानी युद्धानुभव लक्षात घेऊन लढाऊ विमानात सुधारणा घडवून आणल्या ⇨ पाणतीर आणि दूरपल्ल्याची ⇨ बाँबफेकी विमाने यांच्या निर्माण कार्यावर भर दिला. त्याच्याच आग्रहामुळे विमानवाहू युद्धनौकांसाठी अत्याधुनिक लढाऊ विमानाचे (त्यानंतर जे ‘झिरो झुंजविमान’ म्हणून प्रसिद्ध झाले) उत्पादन सरू झाले. १९३० च्या अखेरीस त्याला रिअर-ॲड्‌मिरलचा हुद्दा मिळाला होता. ऑक्टोबर १९३३ मध्ये तो विमानवाहू युद्धनौका क्र. १ चा आरमाराधिपती झाला. त्याने वायु-युद्धतंत्रातील (सागरी) समस्या सोडविल्या. समस्या सोडविण्याच्या प्रयत्नात पुष्कळ अपघात घडले व वायू-लढवय्ये ठार झाले. अशा गंभीर व मन खचणाऱ्या परिस्थितीतही त्याने सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी या प्रयोगात ठार झालेल्यांना ‘महावीर’ म्हणून त्यांच्या वीर मृत्युपथकाला सलामी देण्याची व त्यांना ‘सम्राट’ आणि ‘राष्ट्रभक्त’ म्हणण्याची प्रथा पाडली. त्याच्या शिकवणुकीतून पुढे ⇨ कामिकाझे तयार झाले. १९३४ – ३५ मध्ये लंडन येथील नाविक परिषदेत जपानचा प्रतिनिधी म्हणून त्याने भाग घेतला. तेथे जाण्यापूर्वी त्याने सागरी बळात सर्वांना कमाल बळमर्यादा, सर्व आक्रमणशील शस्त्रास्त्रांचे उन्मूलन आणि ब्रिटन, अमेरिका व जपान यांच्यातील ५ : ५ : ३ सागरी बळ गुणोत्तर तहाच्या अटी १९३५ अखेरपर्यंत रद्दबातल करणे, हे जपानचे मूळ उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले. लंडनची परिषद सुरू होण्यापूर्वीच तिचा बोजवारा उडाला. २९ डिसेंबर १९३४ रोजी जपानने वॉशिंग्टन नाविक तह अमान्य केला. भारी युद्धनौका नकोत म्हणणारा यामामोतो विमानवाहू युद्धनौका बांधण्यावर भर देतो याचे सर्वांना आश्चर्य वाटे. भारी युद्धनौकांचे उन्मूलन करण्याचे ठरल्यास, अमेरिका व ब्रिटन अतिपूर्व आशिया व पॅसिफिक महासागर या प्रदेशांतील त्याच्या हिताचे संरक्षण करू शकेल काय? या प्रश्नास न्याय्य व आंतरराष्ट्रीय मैत्री हेच सवोत्तम संरक्षण आहे असे तो उत्तर देई. आशियात जपानला जर स्वेच्छाचार करण्यास मोकळीक दिली तरच जपान कदाचित शि:शस्त्रीकरणास उद्युक्त होईल अशीही तो पुस्ती जोडे. नाविकबळ वाढविण्याच्या कार्यक्रमाची माहिती एकमेकांना पुरवावी याही सूचनेचा त्याने ‘जपान काय करीत आहे, हे कोणालाच कळणार नाही’, असे म्हणून अव्हेर केला. डिसेंबर १९३५ आरंभी तो व्हाइस-ॲड्‌मिरल आणि लगोलगच नाविक वायुसेनेचा प्रमुख म्हणून नियुक्त झाला व पुढे एक वर्षानंतर तो नाविक प्रतिभूमंत्री बनला. १९३७ साली जपानने अमेरिका व ब्रिटन यांच्या संयुक्त बळाशी टक्कर देण्याची शामत जपानमध्ये नाही आणि त्यांच्या वाटेला जाण्याचा जपानचा मनसुबाही नाही, असे जाहीर केले, तरीही ७४,००० टनी भारी युद्धनौका बांधणीचा जपानचा कार्यक्रम जारी होताच, यामामोतो मात्र भारी युद्धनौकांच्या विरुद्ध होता. शत्रुप्रदेशात सैनिकी शक्ती खोलवर घुसविण्यासाठी विमानवाहू युद्धनौकाच उपयुक्त आहेत असे त्याचे मत होते व अखेर हेच तत्त्व मान्य झाले. जपानची युद्धशक्ती वाढवावयाची असेल, तर अमेरिकेशी युद्ध टाळले पाहिजे, असे त्याचे ठाम मत असल्याने त्याच्या खुनाची भीती निर्माण झाली व तसा एक कटही उघडकीस आला. यामामोतोला ॲड्‌मिरल हुद्दा देऊन त्याला पॅसिफिक आरमाराचे सरसेनापद देण्यात आले (जुलै १९३९). याच साली सप्टेंबरात जर्मनीने पोलंडवर हल्ला केला व दुसऱ्या महायुद्धास तोंड लागले. जर्मनी वगैरे राष्ट्रांशी तह करून जपानने युद्धात पडू नये, पडल्यास ते त्याला महाग पडेल, जपानचे संरक्षण करण्यासाठी नाविक युद्धशक्ती संपादन करणे, हेच नौसेनेचे एकमेव कार्य आहे, असा त्याचा सल्ला होता तथापि जपानी भूसेनेच्या दबावामुळे जपानी सरकारने जर्मनीशी हातमिळवणी केली (२७ सप्टेंबर १९४०). आता अमेरिकेशी युद्ध व जपानचा नाश अटळ झाल्याची त्यास खंत वाटू लागली आणि तो निवृत्तीच्या गोष्टी बोलू लागला. १८ सप्टेंबर १९४१ रोजी त्याने अमेरिकेशी कोठल्याही बाबतीत उदा., सैनिकी वा औद्योगिक-नैसर्गिक साधनसंपत्तीत चढाओढ करण्यास जपान असमर्थ आहे, असे म्हणून अमेरिका जपानचा पराभव करणार, असे सांगितले. यामामोतो हा सम्राट व स्वदेश यांच्याशी एकनिष्ठ असल्याने त्याने आपली वैयक्तिक मते बाजूस सारून पॅसिफिकचा पश्चिमी सागरी प्रदेश नाविक शक्तीने जिंकून घेतला तथापि जपानी गुप्तसंदेश पद्धती अमेरिकेला अवगत झाल्याने अमेरिकी ॲड्‌मिरल ⇨ निमित्सला यामामोतोच्या सागरी कार्यवाहींची पूर्वसूचना मिळाली व जपानचे पारडे उलटे फिरले.

अखेर १८ एप्रिल १९४२ रोजी अमेरिकी विमानवाहू युद्धनौकांवरील बाँबफेकी विमानांनी टोकिओवर हल्ला केला. यामामोतोने जपानी युद्धखात्याच्या नव्या योजनेला कार्यवाहीत आणण्यापूर्वीच, पॅसिफिक महासागरातील काही नाविक ठाण्यांच्या तयारीच्या रेडिओवरील निरीक्षण कार्यक्रमाचा गुप्त संदेश (१८ एप्रिल १९४३) अमेरिकी सेनापतीला समजला व यामामोतोचे विमान उडवून देण्याचा त्याने हुकूम केला. त्याप्रमाणे सॉलोमन बेटावर यामामोतोचे विमान उतरत असताना त्यावर १६ अमेरिकी विमानांनी हल्ला केला व त्यात यामामोतोचा अंत झाला. तो ‘शोगी’ (जपानी बुद्धिबळ) खेळण्यात तसेच कसरतीत पटाईत होता.

दीक्षित, हे. वि.