सैय्यद मुहंमद बंदेनवाज : ( १३२१–१४२२). मध्ययुगीन उर्दू साहित्यिक व सूफी संत. ते दक्षिणी उर्दू साहित्याचे आद्य जनक मानले जातात. त्यांचे मूळ नाव सैयद मुहंमद बिन सैयद यूसुफुल अरूफ. ‘ख्वाजा बंदेनवाज’ व ‘गेसूदराज’ ह्या नावांनीही प्रसिध्द. ‘बंदानवाज’ म्हणजे भक्तवत्सल (आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवणारा) आणि ‘गेसूदराज’ (लंबकेश) म्हणजे लांब केस असलेले. बंदेनवाज हे लांब केस राखत असल्यामुळे त्यांना गेसूदराज या नावाने ओळखले जाऊ लागले. दिल्लीचे प्रसिध्द सूफी फकीर निजामुद्दीन औलिया ह्यांचे प्रमुख शिष्य आणि उत्तराधिकारी ख्वाजा नसीरुद्दीन चिराग देहली ह्यांचे ते शिष्य उत्तराधिकारी होते. बंदेनवाज हे वयाच्या चौथ्या वर्षी आपल्या वडिलांबरोबर दौलताबादेस (देवगिरीस) आले (१३२५). त्यांच्या वडिलांचे निधन तेथेच झाले. त्यानंतर अकरा वर्षांनी बंदेनवाज दिल्लीला परतले. त्यांना मानणाज्या अनुयायांची व भक्तगणांची संख्या उत्तर भारतात मोठी होती तथापि आपले विचार दक्षिणेकडे नेण्यासाठी १३९९ च्या सुमारास ते गुलबर्ग्यास आले आणि तेथेच राहिले. गुलबर्गा येथे त्यांचे निधन झाले. तेथे त्यांचा दर्गा आहे.

बंदेनवाज हे जसे एक थोर सूफी साधक व धर्मप्रसारक होते, तसेच मोठे विव्दानही होते. इस्लामी धर्मग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. दक्षिणेतही त्यांच्याबद्दल श्रध्दा व आदर बाळगणारे भक्त व अनुयायी बहुसंख्य होते. मुसलमानांप्रमाणेच हिंदूंनीही त्यांना संत मानले. अरबी आणि फार्सी भाषांत त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. हिंदी, उर्दू तसेच दक्षिणी भाषांतही त्यांनी लेखन केले. आपल्या शिष्यपरिवारासाठी व सामान्यजनांसाठी त्यांनी हिंदी भाषेत आध्यात्मिक विचार मांडले व हिंदीत काही लेखनही केले. पण, त्यांच्या हिंदी, उर्दू, दक्षिणी भाषांत नेमक्या किती रचना आहेत, हे ज्ञात नाही. त्यांचे पहिले उपलब्ध उर्दू पुस्तक मीराजुल आशिकैन (भक्तांची साधना) उर्दू भाषेतील सर्वांत आद्य गद्य पुस्तक मानले गेले. या ग्रंथात त्यांनी कुराणाच्या आधारे ईश्वरप्राप्तीचा मार्ग वर्णिला आहे. धर्म व भक्ती विषयक गूढ ज्ञानाचे प्रकटीकरण हा या पुस्तकांचा विषय आहे. त्याचा लेखनकाल इ.स. १४२२ पूर्वीचा मानला जातो. या पुस्कात अरबी-फार्सी शब्दांचा वापर विपुल प्रमाणात आहे. ‘ने’ या तृतीय प्रत्ययाचा वापर ही त्यात विशेषत्वाने आहे. हा ग्रंथ प्राचीन दक्षिणी उर्दू गद्याचा एक उत्तम नमुना आहे. त्यात सूफी तत्त्वज्ञान व धार्मिक परिभाषा प्राचुर्याने आढळते. त्यांच्या शैलीत एक प्रकारची दार्शनिक गूढता व जटिलता आहे, त्यामुळे ती दुर्बोध भासते. या ग्रंथाद्वारे दक्षिणेमध्ये सूफी तत्त्वज्ञान विशद करून सांगण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. मीराजुल आशिकैन खेरीज शिकारनामा, हिदायतनामा, दुर्रूल असरार, तिलावतुलवजूद, तर्जुमा वजुदुल आरफीन ही पुस्तके त्यांच्या नावावर दाखवली जातात. शिकारनामा या वेदान्तपर गद्य पुस्तिकेचा आशय व शैली यांवर महाराष्ट्रीय संतांचा प्रभाव जाणवतो. त्यात सगुण व निर्गुण विचारधारा इस्लामी सूफी तत्त्वज्ञानाच्या शैलीत व शब्दांत विशद केल्या आहेत. त्यात ज्ञानेश्वरांच्या ‘काट्याच्या अणीवर तीन गाव वसती’ या कूटाचा वापर केला आहे. दुसऱ्या दोन रिसाल्यांतूनही त्यांनी भक्तिमार्गाची चर्चा केली आहे बंदेनवाज यांच्या पुस्तकांची भाषा खडी बोल आहे व त्यावर पंजाबी व ब्रज भाषांचा प्रभाव दिसतो. केवळ उर्दू गद्यच नव्हे, तर काही पद्यरचनाही बंदेनवाज यांच्या नावावर दाखवली जाते पण त्यात विश्वसनीयता नाही. बंदेनवाज यांच्या परिवारात अशा आणखी काही समानधर्मी व्यक्ती होऊन गेल्या, की त्यांनी त्या भाषेत तशाच प्रकारच्या रचना केल्या. बंदेनवाज यांचे नातू अब्दुल्लाह हुसैनी हेही विख्यात सूफी संत होते. त्यांनी अब्दुल कादिर जीलानी यांच्या निशातुल-इश्क या प्रसिध्द ग्रंथाचा उर्दू अनुवाद केला. बंदेनवाज यांच्या एका शिष्याने हफ्त असरार या नावाने. त्यांच्या सिध्दांतकथनावर टीका लिहिली.

पहा : उर्दू साहित्य.

आजम, मुहंमद