ईलँड : आफ्रिकेत आढळणारी हरिणाची सर्वांत मोठी जात. काहीसा बैलासारखा दिसणारा हा प्राणी गो-कुलातील टॉरोट्रॅगस वंशाचा आहे. याच्या दोन जाती आहेत. एक पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारी सामान्य ईलँड आणि दुसरी सूदान व पश्चिम आफ्रिकेत राहणारी डर्बी ईलँड. सामान्य ईलँडचे शास्त्रीय नावटॉरोट्रॅगस ऑरिक्स  आणि डर्बी ईलँडचे टॉरोट्रॅगस डर्बिॲनस असे आहे. 

सामान्य ईलँड भरदार शरीराचा असून खांद्यापाशी त्याची उंची सु. १·८ मी. आणि वजन ९०० किग्रॅ. पर्यंत असते. नराला आणि मादीला शिंगे असून ती सामान्यत: ६० सेंमी. लांब व काहीशी पिळदार असतात. खांद्यावर वशिंड आणि गळ्यावर पोळी असते. शरीराचा रंग फिक्कट तपकिरी असतो. मानेवर आखूड आयाळ असते. अंगावर बारीक, उभे, पांढरे पट्टे असतात खांद्यापाशी ते स्पष्ट असून ढुंगणाकडे पुसट होत जातात. गवताळ जंगलाच्या काठावर काटेरी झुडुपांच्या आसऱ्याला हा राहतो. यांचे लहान कळप असतात. हा अतिशय चपळ असून दोन मीटर उंचीच्या झुडपांवरून सहज उडी मारून जातो. झाडाझुडपांची कोवळी पाने याचे मुख्य खाद्य होय पण कधीकधी हा गवतसुद्धा खातो. पाण्याशिवाय हा पुष्कळ दिवस राहू शकतो. 

ईलँड गरीब व निरुपद्रवी असून सहज माणसाळतो. प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नाही. २५०–२७० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादीला एकच पिल्लू होते. सामान्य ईलँड १५–२० वर्षे जगतो. 

जमदाडे, ज. वि.