रज्जुमार्ग  :  खालून आधार देऊन भूपृष्ठाच्या वर पोलादी तारदोरांनी बनविलेल्या वाहन मार्गाला रज्जुमार्ग म्हणतात. या रज्जुमार्गावरून वाहने दुसऱ्या तारदोराच्या साहाय्याने ओढून मालाची व प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. ज्या प्रदेशात रेल्वेने वा मोटारगाडीने वाहतूक करणे व्यवहार्य नसते तेथे रज्जुमार्गाचा उपयोग करतात. दोरमार्ग व केबलमार्ग असे रज्जुमार्गाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकाराला अमेरिकेत ‘एरियल ट्रामवे ’ असे म्हणतात. दोरमार्गावरून प्रत्येकी ५ टनांपर्यंत भार असलेल्या अनेक ओझ्यांची अखंडितपणे वाहतूक करता येते आणि एका स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत दर ताशी सु. ५०० टन एकूण भार वाहून नेण्याइतकी त्याची क्षमता असते. केबलमार्गावरून २०० टनांपर्यंतचे एकच ओझे मार्गावरील कोणत्याही एका ठिकाणी चढवून दुस ऱ् या ठिकाणी नेता येते. दोरमार्गांची लांबी कितीही असू शकते ,  तर केबलमार्ग सामान्यतः एकाच गाळ्याचा असल्याने त्याची लांबी मर्यादित असते. केबलमार्गाचे एखाद्या ठिकाणचे काम संपले की ,  तो तशाच स्वरूपाच्या कामाकरिता थोडाफार बदल करून इतरत्र वापरता येतो. याउलट दोरमार्गाची उभारणी एखाद्या विशिष्ट प्रदेशाकरिता केली जात असल्याने त्याचा इतरत्र उपयोग करणे अवघड असते. दोरमार्गाची तुलना पट्टावाहकाशी ,  तर केबलमार्गाची तुलना क्षितिजसमांतर दृढ तुळईऐवजी ताण दिलेल्या पोलादी तारदोरावरून जाणाऱ्या उपरिवाही यारीशी करता येईल [⟶ मालवाहू यंत्रे व वाहक साधने] .

प्रारंभीचे दोरमार्ग हे नैसर्गिक धाग्यांपासून बनविलेल्या व मजबूत झाडांच्या खोडांना बाधलेल्या दोराच्या स्वरूपाचे होते. या दोरावरून माणसे वा माल झोळीतून सरकविण्यात येत असे. अशा प्रकारचे दोरमार्ग काही अविकसित डोंगराळ प्रदेशांत अद्यापही वापरण्यात येत आहेत. पोलादी तारदोराचा शोध लागल्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धात हवाई दोरमार्गाचा आणि केबलमार्गाचा झपाट्याने विकास झाला. अशा दोरमार्गाचा विकास प्रथम इटलीमध्ये झाला.

दोरमार्ग : दोरमार्गावरून वाहनांमधून प्रवाशांची व मालाची वाहतूक केली जाते. ही वाहने क्षितिजसमांतर किंवा कलत्या तारदोरांवरून खेचण्यात येतात. हे दोर अंत्य स्थानकांना सरळ रेषेत जोडतात व त्यांना मार्गावर मधूनमधून घडवंचीसारख्या संरचनांचे आधार दिलेले असतात. दोरमार्गाचे एक-दोरी व दोन- दो री असे दोन प्रकार आहेत. दोन- दो री प्रकाराला तीन-दोरी असेही म्हणतात कारण त्यात स्थिर वाहक दोर  ( किंवा मार्गदोर) व एक खेचणारा निरंत  ( अरुंद) दोर असे एकूण तीन दोन असतात. वाहक दोर एकमेकांना समांतर असून त्यांना टांगलेल्या प्रतिभारांच्या साहाय्याने ते जमिनीपासून वरच्या पातळीत ताणलेल्या स्थितीत ठेवलेले असतात. हे दोर मधल्या खेचणाऱ्या दोराच्या दोन बाजूंस असून एका बाजूचा दोर माल व प्रवासी यांच्या वाहतुकीसाठी ,  तर दुसऱ्या बाजूचा दोर परतणाऱ्या रिकाम्या वाहनांसाठी वापरण्यात येतो. तथापि बऱ्याचशा दोरमार्गांवर दोन्ही दिशांनी वाहतूक करण्यात येते. खेचणारा निरंत दोर मार्गाच्या प्रत्येक टोकाकडील खाचयुक्त कप्पीवरून नेलेला असतो. यांपैकी एक कप्पी चालक यंत्रणेचा व दुसरी ताण देणाऱ्या यंत्रणेचा भाग असते. वाहक दोर जमिनीपासून पूर्णपणे वरच्या पातळीत रहावा व चालक कप्पीवरून तो घसरण्यास प्रतिबंध व्हावा यासाठी तो ताणलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक असते. जरूर तेव्हा दोरमार्ग थांबविता यावा यासाठी विद्युत्‌ चलित्र  ( मोटर) व चालक कप्पी यांच्या दरम्यान गतिरोधकाची योजना केलेली असते.

दोन-दोरी दोरमार्गाचे आणखीही वर्गीकरण करण्यात येते. त्यातील पहिल्या म्हणजे ‘दृढ चापा ’च्या प्रकारात वाहन त्याच्या टांगणीच्या साहाय्याने खेचणाऱ्या दोराला कायमचे जोडलेले असते. दुसऱ्या ‘विलगक्षम पकडी ’च्या प्रकारात वाहन हे स्थिर वाहक दोरावर बसविलेल्या गाड्याला टांगणीने जोडलेले असते. गाड्याला चाकांची व पकडीसारख्या प्रयुक्तीची योजना केलेली असते. स्थानकावरून सुटणारे वाहन खेचणाऱ्या दोराला पकड-प्रयुक्तीने आपोआप घट्ट जोडले जाते आणि वाहन स्थानकात शिरल्यावर खेचणाऱ्या दोरापासून विलग केले जाते.

एक-दोरी दोरमार्गाकरिता खेचण्याचे व वहनाचे असे दोन्ही कार्ये करणारा एकच निरंत दोर वापरण्यात येतो. यामुळे त्याचा व्यास दोन-दोरी दोरमार्गावरील खेचणाऱ्या दोरापेक्षा मोठा असतो. एक-दोरी विलगक्षम पकडीच्या वाहनाची साधी रचना आणि त्याकरिता लागणाऱ्या दोराचे वजन दोन-दोरी दोरमार्गापेक्षा पुष्कळच कमी असल्याने एक-दोरी दोरमार्ग सुलभपणे उभारता येतो व त्याकरिता लागणारा खर्चही दोन-दोरी दोरमार्गापेक्षा सु. ४०% कमी असतो. याउलट दोन-दोरी दोरमार्ग अधिक लांब गाळ्याकरिता व जास्त चढासाठी वापरता येतो. एक-दोरी दोरमार्गाकरिता दृढ चापाचा प्रकारही उपयोगात आहे.

विलगक्षम पकडीच्या एक-दोरी दोरमार्गावरून एक टनी पृथक्‌ ओझ्यांची ताशी २०० टन याप्रमाणे वाहतूक करता येते. अशा मार्गावरील वेग मिनिटाला १८० मी.पेक्षा जास्त असून शकतो. विलगक्षम पकडीच्या दोन-दोरी दोरमार्गावरून ताशी ५०० टनांपर्यंत वाहतूक होऊ शकते व त्यावरील पृथक्‌ ओझी ५ टनांपर्यंत असू शकतात. एक-दोरी व दोन-दोरी मार्ग हे दोन्हीही दुहेरी मार्गाच्या स्वरूपात उभारता येतात व त्यामुळे दुप्पट वाहतूक करता येते. दृढ चापाच्या दोरमार्गावरील वाहतुकीचे प्रमाण कमी पडते. जर वाहतुकीचे अंतर जास्त असेल ,  तर दोरमार्ग सरळ रेषीय भागांत विभागण्यात येतो. प्रत्येक भागाकरिता स्वतंत्र चालक व ताण देणाऱ्या यंत्रणा वापरतात. प्रत्येक भाग १० किमी.पर्यंत लांब असू शकतो  पण भूप्रदेशाच्या स्वरूपानुसार व मार्गाच्या क्षमतेनुसार यात बदल करावा लागतो.

प्रवासी दोरमार्ग हे औद्योगिक उपयोगाच्या दोरमार्गापेक्षा मूलतः निराळे नसतात  मात्र त्यांच्या बाबतीत सुरक्षिततेची अधिक दक्षता घेण्यात येते. मोठे खोलीसारखे  ( केबिन) वाहन असलेले आणि १२० पर्यंत प्रवासी वाहून नेऊ शकणारे दोरमार्ग दोन्ही दिशांनी वाहतूक करणारे दोन-दोरी प्रकारचे असतात. प्रत्येक मार्गाकरिता दोन वाहक दोर व दोन खेचण्याचे दोर वापरण्यात येतात. जर मुख्य शक्तिपुरवठा बंद पडला ,  तर ताबडतोब जोडता येतील अशी चलित्रे वा एंजिने बसविली पाहिजेत असा प्रवासी दोरमार्गाकरिता नियम केलेला आहे. लहान खोलीसारखी वाहने  ( केबिन लिफ्ट्स) ,  खुचीसारखी वाहने  ( चेअर लिफ्ट्स) ,  उतारावरील बर्फावरून स्कींच्या  ( धातू ,  लाकूड वा प्लॅस्टिकच्या लांब अरुंद पट्ट्यांचा) साहाय्याने घसरत जाण्याच्या खेळाकरिता खेळाडूंना उताराच्या वरच्या बाजूस पोहोचविण्याकरिता वापरण्यात येणारी वाहने  ( स्की लिफ्ट्स) यांकरिता बहुधा एक-दोरी दोरमार्ग उपयोगात आणतात.

हिवाळी पर्यटन स्थळी स्की लिफ्टसाठी वापरण्यात येणारा दोरमार्ग हवाई दोरमार्ग मध्यस्थ आधारांशिवाय दऱ्यांवरून नेता येतो. तसेच तो रस्ते ,  रेल्वे ,  नद्या व इतर नैसर्गिक अडथळे यांच्यावरून पार नेता येतो. उभ्या चढणीकरिताही त्याचा चांगला उपयोग होतो. त्याने दोन स्थानके सरळ रेषेत जोडता येतात. धुके ,  पूर ,  बर्फ किंवा हिमतुषार यांचा त्याच्या कार्यावर परिणाम होत नाही ,  तसेच तो दिवसा व रात्रीही चालू ठेवता येतो. अकुशल कर्मचारी किमान ठेवून तो कार्यक्षमतेने चालविता येतो. याखेरीज त्याच्या उभारणीचा ,  निगराणीचा व वाहतुकीचा खर्च कमी असतो.

काही उल्लेखनीय दोरमार्ग :  पहिला लांब एक-दोरी दोरमार्ग कोलंबियातील  ( द. अमेरिका) ला डोराडो येथे उभारण्यात आला व तो १९१९ मध्ये वापरात आला. त्याचे १५ भाग असून एकूण लांबी ७४ किमी. आहे. दुसऱ्या महायुद्धात उभारलेला स्वीडनमधील क्रिस्टीनबेर्य व बूलीडन यांच्या दरम्यानचा दोन-दोरी दोरमार्ग ८ भागांचा असून त्यांची एकूण लांबी ९६.५ किमी. आहे. सर्वांत लांब जड प्रकारचा एक-दोरी दोरमार्ग १९६२ मध्ये सुरू झाला आणि तो आफ्रिकेतील गा बाँ या देशात सुरू होतो आणि विषुववृत्तीय वनांतून जाऊन काँगो प्रजासत्ताकात संपतो. याचे १० भाग असून एकूण लांबी ७७·२४ किमी. आहे. भारतात निरुपयोगी झालेल्या कोळसा खाणी नदीतील वाळूने भरण्यासाठी १९६६-६७ मध्ये प्रत्येकी अनेक दोरमार्ग असलेले दोन मोठे संच उभारले होते.

उल्लेखनीय प्रवासी दोरमार्गांपैकी स्वित्झर्लंडमधील म्यूरन-शिल्डहॉर्न दोरमार्ग १९६६ मध्ये कार्यान्वित झाला. त्याचे ४ भाग असून एकूण लांबी ६ , ६३२ मी. आहे आणि वरचे स्थानक समुद्रसपाटीच्या वर २ , ९ ६ ९ मी. आहे. फ्रान्समधील शामॉनी येथील एग्वी द्यू मीदी दोरमार्ग १९५३ मध्ये उभारण्यात आला. त्याचे वरचे स्थानक समुद्रसपाटीपासून ३ , ८०२ मी. उंच असून ते खालच्या स्थानकापेक्षा २ , ७५० मी.हून अधिक उंचीवर आहे. व्हेनेझुएलातील मेरिडा येथे जगातील सर्वांत उंच असा द्विमार्गी प्रवासी दोरमार्ग १९५९ मध्ये बांधण्यात आला. त्याचे ४ भाग असून एकूण लांबी १२.५ किमी. आहे. त्याचा एक गाळा सु. ३ , ०६९ मी. लांबीचा आहे. त्याचे वरचे स्थानक समुद्रसपाटीच्या वर ४ , ७६३.५ मी. असून तो खालच्या स्थानकापेक्षा ३ , १२४ मी. उंच आहे. या दोरमार्गावरील वाहनात जास्तीत जास्त ४५ प्रवासी बसू शकतात व त्याचा वेग ताशी सु. ३५ किमी. असतो. एकाच गाळ्याचा सर्वांत लांब दोरमार्ग अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कॉचिला दरीपासून सॅन जसिंटो पर्वतापर्यंत  ( उंची ३ , २९८ मी.) १९६३ साली चालू करण्यात आला. त्याची लांबी ४ , ११४ मी. असून त्याच्या वरच्या आणि खालच्या स्थानकांच्या उंचीतील फरक १ , ८३० मी. आहे. भारतात गुलमर्ग  ( जम्मू व काश्मीर) ,  दार्जिलिंग  ( पश्चिम बंगाल) ,  नैनिताल  ( उत्तर प्रदेश) ,  राजगीर  ( बिहार) इ. ठिकाणी प्रवासी दोरमार्ग उभारलेले आहेत.

 केबलमार्ग : याच्या सर्वांत साध्या प्रकारात दोन दृढ पोलादी मनोऱ्यांनी एक वा अधिक वाहक दोरांना आधार दिलेला असतो. या दोरांवर ये-जा करणारा गाडा मार्गाच्या गाळ्यावरून प्रवास करतो. त्याला गती मिळण्यासाठी एका निरंत दोराच्या एका टोकाला प्रतिभाराने ताण दिलेला असून दुसऱ्या टोकाला चालना दिली जाते. गाडा या दोराला कायमचा जोडलेला असून वाहून न्यावयाचे ओझे या गाड्याला आकडा व कप्पीसंच यांच्या साहाय्याने टांगलेले असते. ओझे याच दोराने अथवा दुसऱ्या उच्चालक दोराने जरूरीप्रमाणे वर वा खाली करता येते. दोर अशा प्रकारे ओवलेले असतात की ,  सर्व क्रिया मुख्य मनोऱ्याला जोडलेल्या खोलीतून नियंत्रित करता येतात. या मनोऱ्याच्या पायापाशी ये-जा करणाऱ्या व उच्चालक अशा दोन्ही दोरांची  ( म्हणजेच गाड्याची व त्याला टांगलेल्या ओझ्याची) चालक यंत्रसामग्री व नियंत्रक साधने बसविलेली असतात. आकड्याला टांगलेले ओझे जितके जास्त तितका वाहक दोराचा व्यास जास्त असावा लागतो. यामुळे दोराचे वजन व झोळ वाढतो आणि परिणामी मनोऱ्यांची उंचीही त्या प्रमाणात अधिक असावी लागते. ही उंची केबलमार्गाच्या उद्देशावर अवलंबून असते. जमिनीच्या विस्तृत क्षेत्रावर उपयोग करण्यासाठी गतिमान केबलमार्ग वापरावा लागतो. अशा केबलमार्गाचे दोन प्रकार आहेत. पहिल्यात दोन्ही मनोरे समांतर रुळांवरून सरकतात ,  तर दुसऱ्यात एक मनोरा स्थिर असून दुसरा वर्तुळाकार रुळावरून फिरतो.

केबलमार्ग प्रवासी वा माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात येतात. हवाई दोरमार्गांप्रमाणेच प्रवाशांसाठी वापरण्यात येणारे केबलमार्ग हे रचनेच्या दृष्टीने औद्योगिक उपयोगाच्या केबलमार्गाप्रमाणेच पण सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक दक्षता घेतलेले असतात. पूल ,  धरणे ,  व गोद्या यांच्या बांधकामात काँक्रीट व पोलाद योग्य ठिकाणी नेण्यासाठी ,  जहाजावर माल चढविण्यासाठी वा त्यांतून उतरविण्यासाठी ,  दगडांच्या खाणकामात ,  उघड्यावर माल रचून साठविण्याकरिता ,  जंगलातील लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी तसेच नदीवरून मालाची व प्रवाशांची ने-आण करण्यासाठी केबलमार्गाचा उपयोग करतात.

इटलीतील कारारा येथे २० टनी संगमरवराचे ठोकळे वाहून नेण्यासाठी बांधलेला केबलमार्ग ,  अमेरिकेतील व्हूव्हर धरणाच्या बांधकामाच्या वेळी उभारलेला ३८२ मी. गाळ्याचा व १५० टन क्षमतेचा केबलमार्ग आणि टायग्रिस नदीपार एकूण १२·८ मी. लांबी व २८ टन वजन असलेली वाहने पोहोचविण्यासाठी १९५१ मध्ये उभारलेला व दोन स्थानकांमधील लांबी ५०३ मी. असलेला केबलमार्ग ही केबलमार्गांची काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत.

संदर्भ  : 1. Dean, F. E. Famous Cableways of the World. London, 1958.

2. Schneigert, Z. Trans. Jacobwics, E. Iwinski, W. Ed. Frenkiel, Z. Aerial Ropeways and Funicular Railways, Oxford, 1966.

3. Stubbs, F. W. Ed. Handbook of Heavy Construction, New York, 1959.

हाटे ,  ज. ना.  भदे व. ग.