क्लेप्स, एटव्हीन :(६ फेब्रुवारी १८३४–२३ ऑक्टोबर १९१३). जर्मन विकृतिवैज्ञानिक. त्यांनी घटसर्पाच्या सूक्ष्मजंतूंचे प्रथम वर्णन केले. लूई पाश्चर व रॉबर्ट कॉख यांच्याप्रमाणे त्यांना सूक्ष्मजंतुशास्त्राचे एक जनक म्हणून मानले जाते. सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ फ्रीड्रिख लफ्लर आणि क्लेप्स यांनी घटसर्पाच्या जंतूविषयी माहिती मिळवल्यामुळे त्या सूक्ष्मजंतूला ‘क्लेप्स-लफ्लर सूक्ष्मजंतू’ असे नाव देण्यात आले.

त्यांचा जन्म केनिग्झबर्ग येथे झाला. बर्लिन येथील विकृतिवैज्ञानिक संस्थेमध्ये ते प्रख्यात विकृतिवैज्ञानिक रूडोल्फ फिरखो यांचे १८६१–६७ मध्ये साहाय्यक होते. त्यानंतर ते बर्न (१८६६), वुर्ट्‍सबर्ग (१८७१), प्राग (१८७३) व झुरिक (१८८२) येथील विद्यापीठांत आणि शिकागो येथील रश मेडिकल कॉलेज (१८९६) या ठिकाणी विकृतिविज्ञानाचे प्राध्यपक होते.

हृदंतस्तरशोथ (हृदयातील अस्तर त्वचेची दाहयुक्त सूज) यांत्रिक पद्धतीने व सर्वसाधारण संसर्गाने संयुक्तपणे निर्माण करण्यात त्यांना १८७६ साली यश आले. १८७८ साली माकडांमध्ये उपदंश (गरमी) संक्रामित (कृत्रिम रीत्या उत्पन्न) करून दाखविला. त्यांनी क्षयरोगावर संशोधन केले व गोवंशीय क्षयरोग संसर्गित दुधापासून मानवात उत्पन्न होतो, हे सिद्ध केले. हिवताप, अग्निपिंडशोथ [उदराच्या वरच्या भागात असलेल्या पचनक्रियेत भाग घेणाऱ्या ग्रंथीचा शोथ → अग्निपिंड], सांसर्गिक काळपुळी इ. रोगाच्या सूक्ष्मजंतुशास्त्राविषयी त्यांनी संशोधन केले.

त्यांनी अनेक शास्त्रीय लेख लिहिले, तसेच त्यांचे हँडबुक ऑफ पॅथॉलॉजिकल ॲनॅटमी (१८६९–७६) व ट्रिटाइज ऑन जनरल पॅथॉलॉजी (१८८७–८९) हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. स्वित्झर्लंडला परतल्यानंतर ते बर्न येथे मरण पावले.

कानिटकर, बा. मो.