कोजीकी : जपानी साहित्यातील सर्वांत प्राचीन उपलब्ध कथाग्रंथ. त्यात जपानी पुराणकथा, आख्यायिका, ऐतिहासिक कथा, वंशावळी इत्यादींचे संकीर्ण संकलन आढळते. हिएदा-नो-आरे ह्या अलौकिक स्मरणशक्ती असलेल्या व्यक्तीने ज्या आठवणी सांगितल्या, त्यांवरून तसेच राजाज्ञेने ओ-नो-यासुमारो याने हा ग्रंथ ७१२ मध्ये लिहिला.

कोजीकी  ह्या ग्रंथाचे तीन खंड आहेत : पहिला खंड ‘दैवी युगाचा वृत्तान्त’ म्हणून ओळखला जातो. शिंतो पंथाच्या आद्य स्वरूपाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. ह्या खंडात सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते जिम्मू ह्या पुराणोक्त पहिल्या सम्राटाच्या कारकीर्दीपर्यंतचा भाग आहे. स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांची निर्मिती, मृत्यूचा उगम, स्वर्गदेवता व ऐहिक देवता ह्यांची माहिती आणि त्यांचे परस्परसंबंध, स्वर्गपौत्रांचे पृथ्वीवर अवतरण व त्यांच्या वंशजांनी ह्यूगा प्रांतात केलेली वसाहत ह्यांविषयीचा मजकूर त्यात आलेला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या खंडांत जिम्मूच्या कारकीर्दीपासून ते तेहतिसाव्या सम्राटाच्या कारकीर्दीपर्यंतची म्हणजे इ. स. ६२८ पर्यंतची माहिती आली आहे. हा भाग पौराणिक व ऐतिहासिक असा संमिश्र आहे. शेवटच्या दोन शतकांच्या आढाव्याचा अपवाद वगळता त्याचे स्वरूप बव्हंशी पौराणिकच आहे. तथापि जपानच्या प्राचीन इतिहासाचा एक साधनग्रंथ म्हणून, तसेच जपानमधील प्राचीन धर्म, समाजजीवन, साहित्य ह्यांवर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणून त्यास महत्व आहे. कोजीकी  ग्रंथाची शैली साधी, अकृत्रिम आहे. हा ग्रंथ चिनी लिपीत (कांजी) असून ती लिपी अर्थास अनुसरून न वापरता ध्वनिमूल्यांस अनुसरून वापरली आहे. त्यामुळे हा वाचनास अत्यंत अवघड बनलेला आहे. कोजीकी ग्रंथातील नैतिक व धार्मिक मूल्यांचे संशोधन व पुनर्मूल्यमापन मोतोरी नोरीनागाने ॲनोटेशन ऑफ द कोजीकी (१७९८) ह्या ४९ खंडांच्या बृहद्‌ग्रंथात केले आहे.

हिसामात्सु, सेन्‌-इचि (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)