शिमाझाकी तोसोन : (२५ मार्च १८७२–२२ ऑगस्ट १९४३). जपानी कवी आणि कथा कादंबरीकार. मूळ नाव शिमाझाकी हारूकी. जन्म जपानमधील मागोमे ह्या गावी. शिक्षण टोकियो येथे. १८९१ साली तो पदवीधर झाला. त्यानंतर आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी शिक्षकाची नोकरी करून त्याने चरितार्थ चालवला.

‘यंग ग्रीनरी’ (इं. शी. १८९७) ह्या त्याच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ‘लीफ बोट’ (इं. शी. १८९८) ‘समर ग्रासेस’ (इं. शी. १८९८) आणि ‘फॉलन लीव्ह्ज’ (इं. शी. १९०१) हे त्याचे नंतरचे काव्यसंग्रह. यौवनातील भावनांचा उत्कट, भावगेय आविष्कार तोसोनच्या कवितांत आढळतो. पश्चिमी साहित्य-संस्कृतीच्या प्रभावातून ‘नव्या शैली’ची जपानी भावकविता आकाराला आली, तिचे आरंभीचे रूप तोसोनच्या कवितेत दिसते.

‘ए चिकुमा रिव्हर स्केच’ (इं. शी.), ‘वॉटर कलर पेंटर’ (इं. अर्थ) ह्यांसारख्या काही कथा लिहिल्यानंतर हाकाई (१९०६) ही आपली पहिली कादंबरी त्याने लिहिली. ह्या कदंबरीचा नायक कनिष्ठ सामाजिक स्तरातील परंतु सामाजिक परिवर्तनातून नागरिकाचे हक्क लाभलेला आहे, हे ह्या कादंबरीचे एक सामाजशास्त्रीय वैशिष्ट्य म्हणता येईल. ह्या कादंबरीनंतर ‘स्प्रिंग’ (इं. शी. १९०८), ‘द फॅमिली’ (इं. शी. १९१०-११) ‘न्यू लाइफ’ (इं. शी. १९१८-१९) आणि ‘बिफोर द डॉन’ (इं. शी. १९३५) ह्या कादंबऱ्या त्याने लिहिल्या. ‘द ईस्टर्न गेट’ (इं. शी.) ही त्याची अपूर्ण कादंबरी. ह्या लेखनावर निसर्गवादाचा प्रभाव आहे.

तोसोनने लिहिलेल्या विशेष उल्लेखनीय कथांत – सर्व इं. शी. – ‘द टाइम व्हेन द चेरीज राइपन’, ‘स्टॉर्म’, ‘डिस्ट्रिब्यूशन’, ‘ए वुमन्स लाईफ’ यांचा समावेश होतो. काही प्रवासवर्णने आणि निबंधही त्याने लिहिले आहेत.

साहित्यातून एक माणूस म्हणून त्याची स्वतःची प्रतिमाही स्पष्ट होत गेलेली दिसते. मानवी जीवनातील दु:ख-वेदनांचे चित्रण तो करतो पण तो निराशावादी नाही. उद्याच्या ‘वसंत ऋतू’कडे त्याची आशावादी नजरही लागलेली दिसते. निसर्गवादाकडून हळूहळू मानवतावादाकडे त्याची वाटचाल झाल्याचा प्रत्यय त्याच्या साहित्यातून येतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जपानी साहित्याच्या झालेल्या विकासात त्याचे योगदान मोठे आहे.

हिसामात्सु, सेन्-इचि (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)