साइग्यो : (१११८–२३ मार्च ११९०). जपानी बौद्घ संतकवी. खरे नाव सातो नोरीकियो. क्योटो येथे एका सामुराई कुटुंबात जन्मला आणि वाढला. ह्या कुटुंबात सैनिकी पेशाची परंपरा होती. शाही कुटुंबाचे संरक्षक म्हणून ह्या कुटुंबातले पुरुष काम करीत. स्वतः साइग्यो हाही शाही प्रासादाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत होता तथापि ११४० मध्ये त्या सेवेतून बाहेर पडून तो बौद्घ धर्मोपदेशक बनला. माउंट कोया आणि योशिनो येथे त्याने बौद्घ धर्मोपदेशकासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण घेतले. तो धर्मोपदेशक असला, तरी त्याने आपल्या मित्र-मंडळींशी संपर्क तोडलेला नव्हता. धर्मोपदेशकाच्या भूमिकेतून कार्यरत असतानाच त्याची कविताही विकसित होत होती. त्याच्यात आणि त्याच्या मित्रां मध्ये कवितांची देवघेव चाले. धर्मोपदेशक म्हणून अनेकदा एकांतवासात राहात असतानाही बाह्य जगातील निसर्गाची भव्यता आणि सौंदर्य त्याला भारुन टाकत असे. आपल्या एकांतवासातील मनः स्थिती सशब्द करणाऱ्या, त्याचप्रमाणे नजरेसमोर उलगडत जाणाऱ्या विलोभनीय निसर्गरूपांना भावनिक प्रतिसाद देणाऱ्या कविता त्याने लिहिल्या. धर्मोपदेशक झाल्यानंतर त्याने लिहिलेल्या शंभर कवितांतील उत्कट आत्मपरता, तसेच आत्मचरित्रात्मकता व्यक्तिनिरपेक्ष स्वरूपाच्या दरबारी कवितेपेक्षा वेगळी उठून दिसते. ही आत्मपरता त्याच्या एकूण कवितेचेही एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. ऐहिकतेच्या पलीकडे जाणारी एक विमुक्त वृत्तीही त्याच्या कवितेतून आढळते. आपले अंतःकरणही कोणत्याही प्रकारच्या मलीनतेपासून मुक्त करून ते शुद्घ राखावे, ही तळमळही त्याच्या कवितेने व्यक्त केलेली आहे.

त्याच्या सु. २,१०० कविता आज उपलब्ध आहेत. साइग्योच्या आत्मपर कविता –सान्काशू (इं. शी. ‘द माउंटन हर्मिटिज’)- तीन पुस्तकांत विभागल्या गेल्या आहेत. पहिल्या पुस्तकात एकेका ऋतूशी संबंधित अशा निसर्गकविता आहेत. दुसऱ्या पुस्तकात त्याच्या प्रेमकविता, त्याचप्रमाणे काही संकीर्ण विषयांवरील कविता आहेत. तिसऱ्या पुस्तकात सर्व कविता संकीर्ण विषयांवर आहेत. मात्र ह्या कविता म्हणजे विशिष्ट कालखंडातील रचना होत. त्यामुळे त्याची संपूर्ण कविता या तीन पुस्तकांत नाही. किकीगाकिशू (इं. शी. ‘कलेक्शन रिटन् डाउन ॲझ हर्ड’) आणि किकागाकी झांशू (इं. शी. ‘सप्लिमेंट टू द कलेक्शन रिटन् डाउन ॲझ हर्ड’) हे दोन छोटे संग्रह आधुनिक काळात सापडलेले आहेत. त्यांचा रचनाकाळ निश्चित नाही पण सान्काशू च्या त्या पुरवण्या असाव्यात. साइग्योच्या उत्तरकालातील काही कविता या संग्र हांत अंतर्भूत आहेत. किकीगाकिशू मध्ये ‘तांका’ या नावाच्या छंदोरचनेतल्या २६१ कविता असून दोन रेंगा या काव्यप्रकारातल्या आहेत. किकीगाकी झांशू मध्ये २५ तांका आणि १४ रेंगा आहेत. तांका हा जपानी भावकवितेचा एक प्रकार आहे. रेंगा हा काव्यप्रकार जपानमधील दरबारी कवितेतून विकसित झाला. त्या कवितेची शब्दकळा, सौंदर्यदृष्टी आणि अन्य काही पैलूंचा प्रभाव ह्या काव्यावर होता. प्रमाण रेंगामध्ये १०० कडवी असतात. इहोन सान्काशू (इं. शी. ‘व्हरायंट सान्काशू’) या संग्रहात मूळ सान्काशू मधील ४२८ कविता पुन्हा अंतर्भूत करण्यात आलेल्या असून किकीगाकिशू मधील १६ आणि किकीगाकी झांशूमधील दोन कविता समाविष्ट केलेल्या आहेत. ह्याशिवाय या संग्रहात साइग्योच्या अन्य कुठेही न मिळणाऱ्या १३९ कवितांचा समावेश केलेला आहे. शांका-शिंचू-शू मध्ये (इं. शी. ‘कलेक्शन ऑफ द एसन्स ऑफ द सान्काशू’) त्याच्या काही वेचक कविता आहेत. राजाज्ञेने तयार करण्यात आलेल्या चिनी कवितांच्या संकलनांत साइग्योच्या अनेक कविता अंतर्भूत आहेत. साइग्यो हा जपानी अभिजात साहित्यात ‘तांका’ (पारंपरिक जपानी काव्यप्रकार) नावाची छंदोरचना करणारा एक श्रेष्ठ कवी मानला जातो.

साइग्यो हा जसा कवी, तसा कवींचा मार्गदर्शकही होता. त्याचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी अनेक होतकरू कवी त्याच्याकडे येत. त्याने त्यांच्यापुढे कवितेवर दिलेली व्याख्याने त्याच्या एका शिष्याने लिहूनघेऊन ती साइग्यो शोनिन दान्शो (इं. शी. ‘नोट्स ऑन द डिस्कोर्सिस ऑफ द व्हेनरेबल साइग्यो’) ह्या नावाने संकलित केली आहेत. त्यावरून त्याच्या काव्यविषयक विचारांची कल्पना येते.

ओसाका येथे तो निधन पावला.

हिसामात्सु, सेन्-इचि (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)