माकुरा नो सोशी : जपानी  भाषेतील एक प्रसिद्ध ग्रंथ. रचनाकाळ सु. १०००. सेई शोनागुन (९६६ किंवा ९६७–१०१३) ह्या दरबारी स्त्रीने तो लिहिला. जपानी सम्राट इचिजो ह्याची राणी सादाको हिच्या सेवेत ती होती. रोजनिशी, संस्मरणिका अशा लेखनप्रकारांत मोडणारे ह्या ग्रंथातील लेखन आहे. त्यात सु. २४० नोंदी  असून त्यांपैकी काहींवर तारखा आहेत, तर काहींवर नाहीत. तिच्या काळातील दरबारी जीवनाचे वेधक चित्र ह्या ग्रंथातून  उभे राहते. निरनिराळ्या विषयांवरील आपली मतेही तिने स्पष्टपणे मांडलेली आहेत. लेखिकेची तल्लख बुद्धिमत्ता, तिचे प्रगल्भ व्यक्तिमत्व ह्या ग्रंथात प्रतिबिंबित झाले आहे. तिच्या लेखनाची  शैली जिवंत, लवचिक, वेधक आणि काव्यात्म आहे. जपानी साहित्यात ह्या ग्रंथास मानाचे स्थान आहे.

कुलकर्णी, अ. र.