हेके मोनोगातारी : युद्धविषयक एक जपानी कथात्मक महाकाव्य. त्याला ‘हेकेची कथा’ किंवा ‘गुंकी मोनोगातारी’ असेहीम्हणतात. हेके किंवा टाइरा घराण्याचा उदय आणि अस्त यांची ही हकिकत होय. कामाकुरा (११८५–१३३३) आणि मुरोमाची (१३३३–१५६८) या कालखंडांतील या युद्धकथा आहेत. त्या साधारणतः तीन भागांत विभागलेल्या आहेत. पहिल्या भागातील केंद्रास्थानी टाइरा नो कियोमोरी ही रागीट, उद्धट आणि मिनामोटोविषयी तिरस्कार असणारी व्यक्ती अतीव दुःखात मृत्यू पावते. तिचा राग, लोभ, मत्सर व तद्विषयीचा मनस्ताप यात वर्णिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या भागांतील मुख्य व्यक्ती मिनामोटोच्या पक्षाचे सेनापती होत. प्रथम मिनामोटो नो योशिनाका आणि त्याच्या मृत्यू-नंतर पराक्रमी, तरुण मिनामोटो नो योशित्सुने याचा गैरसमजुतीने राजद्रोह केल्याचा संशय त्याचा ज्येष्ठ भाऊ मिनामोटो नो योरिटोमो घेतो याचे वर्णन त्यात येते. 

 

या कथात्मक ग्रंथांत युद्धविषयक अनेक दृश्यांचे वर्णन असून सैनिकांच्या पराक्रमाचे दाखले दिले आहेत आणि सामान्य शिपाई राजनिष्ठेपोटी जिवाचीही पर्वा न करता लढताना दिसतात. यात बारीकसारीक तपशील वर्णिले असून टाइरा आणि मिनामोटो यांतील वैर त्यातील चढ-उतार देऊन सांगितले आहेत. भावगीतात्मक आणि भावनाप्रधान मजकुरामुळे त्याला काहीजण महाकाव्य म्हणतात तथापि त्याविषयी मतभेद आहेत. त्यातील दुःखीकष्टी प्रेमवीरांची अनेक उपाख्याने किंवा प्रेमप्रकरणे हाइन दरबार साहित्यातील मोनो नो अवरेची आठवण करून देतात. सबंध काव्यात करुणरसावर भर दिला असून टाइरा लष्करी घराण्याचा उदय जेवढ्या जोमाने झाला, तेवढ्याच जोषात त्यांना पायउतार व्हावे लागले. सबंध काव्यात मानवाचे जीवन क्षणभंगुर असून मोहजालात तो अडकतो, हे बुद्धवचन उद्धृत केले आहे. याचे महत्त्व बासरीवादक भिक्षुकांनी( बिवाहोशी) देशभर भ्रमंती करून लोकांच्या मनात बिंबविले. हे भिक्षुक आंधळे असून त्यांच्याकडे पाठ्यपुस्तक नव्हते परंतु मौखिक परंपरेने ते त्यांनी प्रसृत केले. त्याचा लिखित पाठ तेराव्या शतकात एका दरबारी सरदाराने लिहिला. त्याने युद्धविषयक मौखिक कथा जमा केल्या. त्यांपैकी काही कथा सैनिकांच्या मृत्युसमयी केलेल्या कर्मकांडाच्या वेळी सांगितल्या असाव्यात. ही गेय परंपरा-रूढी मुरोमाची कालखंडापर्यंत चालू होती तथापि या काळापर्यंत हेकेच्या सु. १०० पाठभेदाच्या प्रती उपलब्ध होत्या. त्यातील प्रमाणभूत प्रत हेके सादर करणारा आकाशी काकुइची याने दिलेल्या श्रुतिलेखनाची होय (१३७१). हेके पाठ्यपुस्तकांत मजकुरात तसेच शाब्दिक रचनेत फरक आढळतो. 

 

हेके मोनोगातारी हे काव्य काळात एवढे लोकप्रिय झाले, की त्याने जपानी लेखकांना कथानक तर पुरविलेच पण स्फूर्तीही दिली. त्यातून ⇨ गेंजी मोनोगातारी (गेंजीची कथा) सारख्या साहित्यकृतींची निर्मिती झाली. त्याने अनेक नो नाट्यांना साधनसामग्री पुरविली. त्यांपैकी ‘अत्सुमोरी’ सारखी नो नाट्ये म्हणजे लढवय्यांच्या कहाण्या होत परंतु अनेक हताश प्रेमिकांच्या, विशेषतः तरुणींच्या (जिओ, सेन्जु आणि कांगो) भावगीतात्मक कथा होत. 

 

संदर्भ : Butler, K. D. The Heike Monogatari and the Japanese  Warrior Epic, Harvard, 1969. 

देशपांडे, सु. र.