मोरी ओगाय : (१७ फेब्रुवारी १८६२–९ जुलै १९२२). आधुनिक जपानी साहित्यिक. मूळ नाव मोरी रिंतारो. जन्म त्सुवानोमाची, इवामी येथे. टोकिओ विद्यापीठातून वैद्यक विषयातील पदवी घेतल्यानंतर (१८८१) तो लष्करात शल्यचिकित्सक म्हणून काम करू लागला. पुढे वैद्यकीय अभ्यासासाठी तो जर्मनीत गेला असताना साहित्य आणि सौंदर्यशास्त्र ह्या विषयांकडे तो आकर्षित गेला. जपानमध्ये परतल्यानंतर तो लिहू लागला आणि एक वाङ्‌मयीन नियतकालिकही त्याने सुरू केले. लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर (१९१६) जपानच्या ‘इंपीरिअल म्युझीअम’ चा तो संचालक झाला. तसेच म्यूझीअमच्या ग्रंथालयाचा प्रमख ग्रंथपाल म्हणूनही तो काम पाहू लागला. ‘इंपीरिअल म्युझीअम ऑफ आर्ट’ चे संचालकपदही त्याला मिळाले. टोकिओ येथे तो निधन पावला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, एक उत्तम साहित्यसमीक्षक म्हणून त्याला ख्याती लाभली. ‘ए प्रोग्रॅम ऑफ ईस्थेटिक्स’ (इं. शी.) व ‘न्यू ओपिनिअन्स इन ईस्थेटिक्स’ (इं. शी) ह्या त्याच्या दोन ग्रंथांमुळे जपानमध्ये सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाला चालना मिळाली. ‘द डान्सिंग गर्ल’ (कथा, १८९०) व ‘यंग मॅन’, ‘वाइल्ड गूज’, ‘द ॲबी फॅमिली’, ‘द ताकासे रिव्हरबोट’ (सर्व इं .शी.) ह्यांसारख्या त्याच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. त्याचे काही समीक्षात्मक लेख ‘मूनग्रास’ (१८९६, इं. शी.) ह्या नावाने संगृहीत आहेत. जर्मन भाषेतील अनेक अभिजात ग्रंथही त्याने जपानीत अनुवादिले आहेत.

हिसामात्सु, सेन-इचि (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)