काट्स, याकोप: (१० नोव्हेंबर १५७७-१२ सप्टेंबर १६६०). डच कवी. झीलंड प्रांतातील ब्रौअर्सहेवन ह्या शहरी जन्मला. लायडन आणि ऑर्लेआं शहरी कायद्याचे शिक्षण घेतले. मिडलबर्ग आणि हेग येथे वकिली केली. १६३६ ते १६५१ पर्यंत तो हॉलंडचा `ग्रॅंड पेन्शनरी’ (हॉलंडचा पहिल्या क्रमांकाचा मंत्री) होता. राजनैतिक कामगिरीसाठी त्याला दोन वेळा इंग्लंडला पाठविण्यात आले होते. तो कॅल्व्हिनवादी होता. हेग येथे तो मरण पावला.

काट्स हा मुख्यतः बोधवादी कवी. डच कॅल्व्हिनवाद्यांच्या प्रेम व विवाह ह्या विषयांसंबंधीच्या नैतिक कल्पना त्याच्या कवितांतून आढळून येतात. प्रेम, समाज आणि धर्म ही त्याच्या दृष्टीने मानवी जीवनाची पायाभूत मूल्यत्रयी. अभिनव प्रतिमा हे त्याच्या काव्याचे एक महत्वाचे वैशिष्टय. तथापि सर्वसामान्यांना सहज समजेल, अशीच त्याची भाषाशैली असल्यामुळे तो बराच लोकप्रिय झाला. त्याच्या कवितांतीत अनेक वचनांना म्हणींचे आणि वाक्प्रचारांचे स्स्थान प्राप्त झाले आहे. त्या दृष्टीने Spieghel van den ouden ende nieuwen Tijdt (१६३२, इ.शी.द मिरर ऑफ ओल्ड ऍंड न्यू टाईम्स) हा त्याचा काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय आहे. Houwelyck (१६२५, इं.शी.मॅरेज) आणि Trouringh (१६३७, इं.शी.द वेडिंग रिंग) हे त्याचे आणखी काही महत्वपूर्ण काव्यसंग्रह. झीलंडमधील कवींनी १६३२  मध्ये प्रसिध्द केलेल्या De Zeeuwsche Nachtegaal ह्या कवितासंग्रहाचा तो संपादक असून त्यात त्याच्याही काही कविता समाविष्ट आहेत. डच साहित्यात हा काव्यसंग्रह अतिशय महत्वाचा मानला जातो. हेग येथील त्याचे घर एक वाङ्मयीन केंद्रच झाले होते. त्याचे सर्व ग्रंथ संकलित स्वरुपात १९ खंडात प्रसिध्द झाले आहेत (१६५५).

जगताप, दिलीप