ॲल्सीअस: (इ.स.पू. सातवे शतक). एक ग्रीक भावकवी. जन्म आशिया मायनरच्या पश्चिम किनाऱ्यावरील लेझ्बॉस या बेटाच्या मिटिलीनीनामक राजधानीच्या शहरी. त्याची कविता त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहे. सॅफो या समकालीन कवयित्रीला उद्देशून लिहिलेली एक ओळ या उपलब्ध कवितेत आहे. त्याची सर्व कविता ईऑलिक बोलीत रचिलेली दिसते. आल्केइक छंदाशी त्याचे नाव कायमचे निगडित झाले आहे. प्रेम, मदिरा आणि राजकारण हे त्याच्या काव्याचे प्रमुख विषय.

हेलेस्पाँटच्या म्हणजेच दार्दनेल्झच्या मुखाशी असलेल्या सायजीअम (हल्लीचे येनिशेहर) येथील किल्ला अथेनिअनांनी घेतल्यामुळे त्यांच्याशी लेझ्बिअनांनी जो लढा दिला, त्यात ॲल्सीअसने भाग घेतला होता तसेच सामान्य लोकांची बाजू घेऊन त्याने जुलमी राज्यकर्त्यांविरुद्धही लढा दिला. पिटाकस सर्वाधिकारी झाला तेव्हा ॲल्सीअसने विजनवास पतकरला.

हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)