क्लाइस्ट, हाइन्‍रिख फोन : (१८ ऑक्टोबर १७७७–२१ नोव्हेंबर १८११). जर्मन नाटककार. जन्म ओडरवरील फ्रँकफुर्ट येथे. काही काळ अनिच्छेनेच सैन्यात नोकरी. ज्ञानोपासनेसाठी ती सोडून देऊन तत्त्वज्ञान आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास. तथापि कांट वाचीत असताना सारे जग भ्रमाधिष्ठित असून अंतिम सत्य मानवी आकलनाच्या पलीकडेच आहे, असा ग्रह होऊन त्याचा ज्ञान आणि विवेकवाद ह्यांवरील विश्वास उडाला. ह्या घटनेनंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वातील सर्जनशील प्रेरणा मात्र विमुक्त झाल्या. पॅरिस व स्वित्झर्लंडमध्ये त्याने काही काळ वास्तव्य केले. रुसोचे निसर्गमाहात्म्याचे ध्येय समोर ठेवून स्वित्झर्लंडमध्ये कृषिव्यवसायाला वाहून घेण्याचा त्याचा संकल्प होता परंतु त्यात मन रमले नाही. स्वित्झर्लंडमध्ये असतानाच रॉबेअर गीसकार  ही एका नॉर्मन ड्यूकच्या जीवनावरील भव्य शोकत्मिका त्याने लिहावयास घेतली होती. पुढे एका निराशेच्या क्षणी त्याने तिचे हस्तलिखित जाळून टाकले. त्यानंतर कधी तरी स्मरणाने त्याने ह्या शोकत्मिकेचे काही प्रवेश पुन्हा लिहिले. त्यांवरून त्या नाटकासंबंधीच्या त्याच्या भव्य आराखड्याची कल्पना येऊ शकते, तसेच Die Familie Schroffentein (१८०३, इं. भा. द फ्यूड ऑफ द श्रॉफन्स्टाइन्स, १९१६) ही शोकात्मिकाही त्याने लिहून पूर्ण केली होती. जर्मनीत आल्यानंतर त्याने नोकरी केली परंतु तेथेही तो स्थिर राहू शकला नाही. त्याने काढलेली नियतकालिके (Phobus, १८०८ आडाम म्यूलरच्या सहकार्याने आणि Berliner Abendblatter, १८१०) अयशस्वी ठरली. त्याच्या नाट्यकृतींना त्याच्या हयातीत फारशी मान्यता मिळाली नाही. गटेसारख्या साहित्यश्रेष्ठींकडून त्याची उपेक्षा झाली. अत्यंत निराश मनःस्थितीत त्याच्याप्रमाणेच आयुष्याला कंटाळलेल्या एका स्त्रीसोबत पॉट्सडॅमजवळील व्हांझे येथे त्याने आत्महत्या केली.

त्याच्या नाट्यकृतींपैकी Die Familie Schroffenstein, आणि Penthesilea (१८०८) ह्यांत माणसाहून बलवत्तर शक्ती आणि माणसाचे अंगभूत दौर्बल्य त्याला एका अटळ अशा प्रमादव्यूहाकडे कशा खेचून नेतात, हे दाखविले आहे. त्याच्या सुखात्मिकांपैकी Amphitryon ही मोल्येरच्या एका सुखात्मिकेवर आधारलेली होती. Der Zerbrochene Krug (१८०८, इं. शी. द ब्रोकन जार) ही जर्मन साहित्यातील एक श्रेष्ठ सुखात्मिका. Das Kathchen von Heilbronn (१८१०, इं. शी. क्येथशेन ऑफ हाइलब्रोन) हे मध्ययुगीन रोमान्सची आठवण करून देणारे त्याचे एक अद्‍भुतरम्य नाटक. Die Hermannsschlacht (इं. शी. हर्मान्स बॅटल इन टोइटोबुर्क फॉरेस्ट) आणि Der Prinz von Homburg (इं. शी. द प्रिन्स ऑफ हाम्बुर्ग) ही त्याची दोन नाटके १८०८ ते १८१० च्या दरम्यान लिहिली गेली. तथापि १८२१ पर्यंत ती प्रसिद्ध होऊ शकली नाहीत. त्यांपैकी Der Prinz von Homburg ही त्याची सर्वश्रेष्ठ साहित्यकृती होय.

क्लाइस्टने आठ दीर्घकथा लिहिल्या. त्यांतील ‘Michael Kohlhaas’ आणि ‘Die Marquise von O…’ ह्या जागतिक कथासाहित्यात मान्यता पावल्या आहेत.

मेहता, कुमुद