चार्ल्स पर्सी स्नो

स्नो, चार्ल्स पर्सी : (१५ ऑक्टोबर १९०५ — १ जुलै १९८०). ब्रिटिश कादंबरीकार, वैज्ञानिक आणि सरकारी प्रशासक. जन्म लायसेस्टर येथे एका श्रमिक कुटुंबात. लायसेस्टर विद्यापीठातून त्याने विज्ञानातली पदवी घेतली. १९३० मध्ये त्याने केंब्रिज विद्यापीठातून भौतिकीमध्ये डॉक्टरेट मिळवली. ह्याच विद्यापीठात त्याने अधिछात्र ( फेलो ) आणि प्रशासक म्हणूनही १९५० पर्यंत सेवा केली. रेणवीय भौतिकीमध्ये त्याने संशोधन केले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारचा वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्याने काम केले. १९३० च्या दशकात केवळ  मनोविनोदनार्थ त्याने कादंबरीलेखन करावयास सुरुवात केली. डेथ अंडर सेल (१९३२) आणि द सर्च (१९३४) ह्या त्याच्या आरंभीच्या दोन कादंबऱ्या. ह्यांपैकी डेथ अंडर सेल ही एक गुप्तहेरकथा होती आणि संशोधनक्षेत्र हा द सर्च ह्या कादंबरीचा विषय होता. त्यानंतर ब्रिटिश समाजातील व्यावसायिक आणि बुद्धिमंत वर्गांतील व्यक्तींच्या व्यक्तिगत जीवनांचा, त्यांच्या महत्त्वाकांक्षांचा आपल्या कादंबरीलेखनाच्या दृष्टीने त्याने अभ्यास सुरू केला. त्यातूनच ‘ स्ट्रेंजर्स अँड ब्रदर्स ’ ही कादंबरीमालिका निर्माण झाली. मालिकेचे हे नाव ज्या कादंबरीमुळे निश्चित झाले, ती ह्या मालेतली स्ट्रेंजर्स अँड ब्रदर्स ही पहिली कादंबरी १९४० मध्ये प्रसिद्ध झाली. एकूण अकरा कादंबऱ्यांच्या ह्या मालिकेतल्या अन्य दहा कादंबऱ्या १९७० पर्यंत प्रसिद्ध झाल्या. ह्या मालिकेतल्या पहिल्या कादंबरीत पुढल्या कादंबऱ्यांतल्या अनेक व्यक्तिरेखांची — विशेषतः ल्यूइस एलियटची — ओळख तो आपल्याला करून देतो. ल्यूइस हा ह्या मालिकेतील सर्व कादंबऱ्यांचा निवेदक असून दोन कादंबऱ्यांचा विषय आहे. नोकरशाहीचा भाग असलेला माणूस आणि त्याला भ्रष्ट करणारी सत्ता ह्यांचे अत्यंत काळजीपूर्वक केलेले विश्लेषण ह्या कादंबऱ्यांतून आढळते. इन देअर विजडम (१९७४) आणि कोट ऑफ व्हार्निश (१९७९) ह्या त्याच्या अन्य काही कादंबऱ्या.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने लेखन थांबवले होते. ब्रिटनच्या मजूर-मंत्रालयात तो तांत्रिक कर्मचारीवर्ग विभागाचा संचालक झाला. १९४३ मध्ये त्याला ‘ कमांडर ऑफ द ब्रिटिश एंपायर ’ करण्यात आले, तर १९४५ मध्ये नागरी सेवा आयुक्तपदाची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली. वेगवेगळ्या सरकारी प्रकल्पांसाठी शास्त्रज्ञांची निवड करणे हे महत्त्वाचे काम त्याच्याकडे सोपविले गेले. ह्या पदावर तो १९६० पर्यंत होता. १९५७ मध्ये त्याला ‘ नाइट ’ करण्यात आले.

दुसरे महायुद्ध संपल्यावर स्नो पुन्हा लेखनाकडे वळला. १९५० मध्ये इंग्रज कादंबरीकर्त्री पामेला हॅन्सफर्ड जॉन्सन हिच्याशी त्याने विवाह केला.

स्नो हा जसा एक साहित्यिक, तसाच एक वैज्ञानिकही होता. त्यामुळे ह्या दोन्ही क्षेत्रांबद्दल त्याला विचारपूर्वक काही लिहिणे शक्य होते. द टू कल्चर्स अँड द सायंटिफिक रेव्हलूशन (१९५९)  आणि सेकंड लुक (१९६४) ह्या दोन पुस्तकांतून ह्या दोन्ही क्षेत्रांबद्दल त्याने लिहिले आणि आपली एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका मांडली. त्याच्या मते, ह्या दोन क्षेत्रांत वावरणाऱ्या व्यक्तींचा परस्परांशी दळणवळण वा संवाद होऊ शकत नाही किंवा तो अवघड असतो कारण त्यांना परस्परांच्या क्षेत्रांबद्दल असलीच तर फार कमी माहिती असते. पश्चिमी संस्कृतीच्या दोन प्रमुख शाखांमधला हा दूरस्थपणा ह्या दोन्ही शाखांतील एका नामवंत व्यक्तीने स्पष्टपणे सांगावा, असे ह्या निमित्ताने पहिल्यांदाच घडत होते. स्नोच्या ह्या भूमिकेवर टीकाही झाली तथापि स्नोने आणखी एका—तिसऱ्या—संस्कृतीच्या उदयाचीही दखल घेतली ती म्हणजे माणसे कशी राहतात आणि राहत आली ह्या विषयाशी निगडित असलेली. सामाजिक शास्त्रे आणि कला, विज्ञान आणि संस्कृती या विषयांवरचे त्याचे लेखन ह्या ग्रंथांत आढळते. पब्लिक अफेअर्स (१९७१), ट्रॉलप : हिज लाइफ अँड आर्ट (१९७५) आणि द रिॲलिस्ट्स : एट पोटर्र्ट्स (१९७९) हे त्याचे साहित्यसमीक्षात्मक ग्रंथ होत.

लंडन शहरी तो निधन पावला.

संदर्भ : 1. Karl, Frederick R. C. P. Snow : The Politics of Conscience, 1963.

           2. Thale, Jerome, C. P. Snow, 1964.

कुलकर्णी, अ. र.