चॅटरटन टॉमस : (२० नोव्हेंबर १७५२ – २४ ऑगस्ट १७७०). इंग्रज कवी. जन्म ब्रिस्टल येथे. शिक्षण कॉल्स्टन येथे. ब्रिस्टल येथील सेंट मेरी रेडक्लिफच्या चर्चमधील जुन्यापुराण्या हस्तलिखितांचा त्याने अभ्यास केला होता. एकलकोंड्या स्वभावाचा आणि मनाने मध्ययुगात वावरणारा हा कवी होता. मध्ययुगीन इंग्रजी शैलीचे अनुकरण करून त्याने काही कविता व लेख लिहीले आणि ते पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या टॉमस रोली नावाच्या एका धर्मोपदेशकाने लिहिले, असा दावा केला. वस्तुतः टॉमस रोली ही सर्वस्वी त्याच्या कल्पनेची निर्मिती होती. चॅटरटनच्या ह्या कवितांतील व लेखांतील मध्ययुगीन शैली अस्सल नव्हे, हे इंग्रजी साहित्याच्या व्यासंगी अभ्यासकांच्या ध्यानात येण्यासारखे होते. लवकरच वस्तुस्थिती स्पष्ट झाली आणि चॅटरटनने होलबर्न येथे आत्महत्या केली. तत्पूर्वी काही महिने त्याने लंडनमध्ये लेखनावर पैसा मिळविण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यातही त्याला फारसे यश आले नाही. उमलू पाहणाऱ्या एका समर्थ भावकवीचे दर्शन चॅटरटनच्या कवितांतून घडते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी कविता हळूहळू नव-अभिजाततावादाकडून स्वच्छंदतावादाकडे झुकू लागली होती. मध्ययुगाने भारावून गेलेला चॅटरटन आणि त्याची कविता हे ह्या परिवर्तनाचे एक गमक होय. कोलरिज, वर्ड्‌स्वर्थ, कीट्‌स, शेली ह्यांसारख्या स्वच्छंदतावाद्यांनी त्याच्याविषयी आदर व्यक्त केला. वॉल्टर विल्यम स्कीट ह्या इंग्रज भाषाशास्त्राज्ञाने चॅटरटनच्या कविता १८७१ मध्ये संपादून प्रसिद्ध केल्या.

संदर्भ : 1. Hare, M. E. Ed. Rowley Poems, Oxford, 1911.

           2. Meyerstein, E. H. W. A Life of Thomas Chatterton, London, 1930.

देवधर, वा. चिं.